ही जिंदगी नाही पुन्हा, मळ गायछाप लाव चुना…

हे वाक्य तुम्ही कित्येकदा ऐकलं असेल. खोटं कशाला बोला, कधी कळत्या-नकळत्या वयात बारही लावला असेल. कित्येकांची सकाळ बार लावल्याशिवाय होत नाही. कुणी त्याला बार म्हणतं, तर कुणी इडा, तर कुणी आर. पट्टीचा गायछाप खाणारा कधी दारुला शिवत नाय… कट्टर गायछाप खाणारे कार्यकर्ते काही नियमही पाळतात त्याचीच ही स्टोरी.

त्याच्या आधी एक बॅक स्टोरी सांगतो…

आमच्या चौकात एक बारकं पोरगं आहे. आत्ता आत्ता कुठं भावाला मिश्या फुटायला लागल्यात. पण बाता मारण्यात गडी व्हॉट्सअपवरचे काका लोक, किम जोंग उन आणि फेसबुकवरचे जाणकार सगळ्यांना कच्चा खाऊ शकतोय.

आम्ही जरा थोरली पोरं असंच रात्रीचं शेकोटीला बसलो होतो. हा भाऊ आमच्या ढुंगणाला ढुंगण लाऊन बसला. मग भाऊचे बोलबच्चन सुरू झाले. आता ते त्याच्या शब्दात सांगतो.

“मी एकदा माझ्या फ्रेंड्ससोबत (इथं भावानं बोट नाकाला लावलं) बसलो होतो. त्यांना काय सेन्सच नव्हता रे. चियर्स केल्यावर ग्लास खाली ठेवणं, दोन थेंब बाहेर शिंपडणं, लव्ह पॅक पण घोट घोट मारून पिणं.. हे असलं असतंय होय? बाद कंपनी होती एकदम.”

आता हा तुर्रमखान अनादी काळापासून बसत असल्यासारखे बच्चन देत होता. पण आम्ही गप ऐकून घेतलं. घरी निघायच्या आधी पोरांनी गायछाप काढली आणि मळायला घेतली, हा गडी म्हणाला… “भावा घे की डबल.”

आता पाखरु आमच्या तावडीत घावलं… कारण त्याला बसण्याचे नियम माहित होते, पण गायछाप खाण्याचे नाही. मग म्हणलं सुट्टी नॉट. त्याला दिलेलं ज्ञान तुमच्यासाठीही सादर करत आहोत.

डबल घेणं म्हणजे, एकाच वेळी दोन जणांचे बार मळणं. सच्चा गायछाप खाणारा मात्र डबल घेत नाही. आम्ही काही उत्साही कार्यकर्त्यांना याबद्दल विचारुन घेतलं, तर ते म्हणाले. आपण ज्याच्यासोबत डबल घेतो, त्याची आणि आपली भांडणं होऊ शकतात, अशी आमची श्रद्धा असती, त्यामुळं आम्ही डबल मळत नाही.

समजा कधी डबल बार मळलाच, तर तो देण्या-घेण्याची पद्धतही वेगळी असती. एक कार्यकर्ता दुसऱ्या कार्यकर्त्याला तंबाखू कधीच चिमटीत देत नाय. समोरचा डायरेक्ट पंजात घेतो, नायतर मग स्वतःच्या चिमटीनं काढून घेतो.

शौकीन माणूस ज्याप्रकारे स्वतःचा पेग स्वतःच भरतो, त्याप्रमाणं कट्टर गायछाप प्रेमी स्वतःचा बार स्वतःच मळतो आणि त्यामागचं कारण लई सोपं आहे. आम्ही एका कार्यकर्त्याला विचारलं, तर तो म्हणाला, ‘किती गायछाप घ्यायची, त्यात किती चुना टाकायचा याचं माझं मिश्रण ठरलेलं असतंय. दुसऱ्या कुणी माझा बार मळला तर त्याला माझी रेसिपी माहीत नसती आणि मला परफेक्ट तार बसत नाही. सगळं जग एकीकडे गेलं तरी चालतंय, पण मला माझी तार परफेक्ट बसलीच पाहिजे.’ आता असंल बाबा त्याचं कायतर गणित. शेवटी नियम ते नियम.

गायछाप खाणारे हवामान तज्ञही असतात. जरा वातावरण दमट किंवा पावसाचं झालं की, या भावांची गायछाप पुडी नरम पडते आणि हे भिडू तुम्हाला ठणकावून सांगतात, रेनकोट, छत्र्या वापरा आज फिक्स पाऊस पडणार आणि खरंच पाऊस पडतो.

सध्या वातावरण कोरोनाचं आहे, त्यामुळे गायछाप खात असाल, तर शेअर करु नका. आपली आपली खा. कसंय उगा हाताला विषाणू असतील, तर तुमचा बाजार उठायचा. आणि हा आम्ही गायछाप खायला प्रोत्साहन अजिबात देत नाहीये. कुणी काय खायचं आणि काय नाय हे आम्ही काय ठरवू शकत नाय. त्यामुळं खात असाल, तर काळजी घेऊन खा आणि बोलबच्चन टाकायला जाणार असाल, तर हे नियम वाचून जा.

कारण कसंय…ही जिंदगी नाही पुन्हा, मळ गायछाप लाव चुना!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.