रेल्वेत आपलं सामान हरवलं तर रेल्वे प्रशासन त्या सामानाचं पुढे काय करतं ?

चित्रपट आणि ट्रेन म्हटलं तर एक सिन सगळ्यात पहिले आठवतो. हा तोच, DDLJ वाला… हिरोईनची ट्रेन सुटत असते आणि हिरो तिला हात देऊन ट्रेनमध्ये घेतो. आता या सिननंतर दुसरा सिन कोणता आठवत असेल तर तो म्हणजे, ट्रेन सुटण्याचा. हा जब वी मेट वाला… तसा हा सिन अनेक चित्रपटांमध्ये वापरण्यात आलाय, जो बघून अनेकांना साहजिक पडलेला प्रश्न म्हणजे

आता ट्रेनमध्ये राहिलेल्या सामानाचं काय? 

हा प्रश्न पडतो याचं कारण म्हणजे हा सिन अनेकांसोबत रिअल लाईफमध्ये झालाय. आपण ट्रेनने प्रवास करत असतो आणि ट्रेनमध्ये काही तरी सामान विसरून येतो किंवा ट्रेन सुटल्याने सामान देखील सुटतं. त्यात अनेकदा खूप महत्वाच्या गोष्टी असतात, ज्या परत कशा मिळवाव्या याच्या विचारातच अर्ध डोकं खराब होतं आणि उरलं सुरलं त्या वस्तू परत मिळवण्याच्या भानगडीत. 

म्हणूनच हा विषय सोप्पा करण्याचा विचार आला आणि जर अशा परिस्थितीत तुम्ही सापडलात तर काय प्रक्रिया करून आरामात सामान परत मिळवू शकतात? याचं उत्तर घेऊन आलोय… 

रेल्वेच्या नियमानुसार गाडीच्या डब्यांमध्ये जर प्रवाशांचं सामान राहिलं असेल, सुटलं असेल तर ते सामान त्याच्या मूळ मालकापर्यंत पोहोचवण्याची संपूर्ण प्रक्रिया असते.

प्रत्येक गाडी आपल्या ठरलेल्या स्टेशनपर्यंत पोहोचल्यानंतर रिकाम्या गाडीची तपासणी केली जाते. स्टेशन स्टाफद्वारे हे काम केलं जातं. यावेळी रेल्वे सुरक्षा बलाचा अधिकारी त्यांच्या सोबत असतो. या तपासणीत गाडीच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याबरोबरच सीटवर कोणत्या प्रवाशाचं महत्वाचं सामान तर राहिलं नाहीये ना? याची शाहनिशा केली जाते.

जर या तपासणीमध्ये सामान आढळलं तर ते संबंधित स्टेशन मास्तरकडे जमा केलं जातं. याशिवाय ट्रेनमध्ये किंवा स्टेशनवर बेवारस किंवा ज्यांची बुकींग नाहीये अशा वस्तू आढळल्या असतील तर त्याची लिस्ट बनवली जाते आणि ती स्टेशन मास्तरांकडे जमा केली जाते. 

यानंतर आरपीएफ किंवा अन्य रेल्वे कर्मचारी यांच्या मार्फत जमा केलेल्या मालाची नोंद हरवलेल्या मालमत्तेच्या रजिस्टरमध्ये केली जाते. इथे त्या वस्तूचं नाव, वजन, अंदाजे किंमत काय असेल, अशा गोष्टींची नोंद केली जाते. एखादा बॉक्स किंवा पेटी मिळाली असेल तर रेल्वे सुरक्षा दल किंवा रेल्वे पोलिसांच्या उपस्थितीत त्यातील सामानाची यादी तयार केली जाते. 

या लिस्टच्या तीन कॉपी बनवल्या जातात. पहिली कॉपी मालाच्या रजिस्टरमध्ये असते, दुसरी त्या पेटीमध्ये ठेवली जाते आणि तिसरी रेल्वे सुरक्षा बलाकडे दिली जाते. त्यानंतर ती पेटी सीलबंद केली जाते.

आता सामान सुरक्षित करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली असते. यानंतर एखादा प्रवासी आला आणि त्याने हरवलेल्या, विसरलेल्या मालाबद्दल विचारलं तर सगळ्यात पहिले स्टेशन मास्तर त्याच्याशी बातचीत करतात. तेव्हा सामनाबद्दल सर्व संभाव्य प्रश्न त्या व्यक्तीला विचारले जातात. त्यानंतर स्टेशन मास्तरांचं समाधान झालं तर संबंधित वस्तू त्या व्यक्तीला दिली जाते. 

मात्र ही वस्तू देताना हरविलेल्या मालमत्तेच्या रजिस्टरमध्ये त्या दावेदाराचा पूर्ण पत्ता नोंदवला जातो. शिवाय रेल्वेकडून माल व्यक्तीला सुपूर्द केल्यानंतर त्या रजिस्टरमध्ये दावेदाराची सही देखील घेतली जाते.

इतकं सोपं असतं सगळं. पण अशात जर एक गोष्ट झाली… एखादा व्यक्ती सामान घ्यायला गेला आणि स्टेशन मास्तरांनी त्याला प्रश्न विचारले, ज्याची त्यांना समाधानकारक उत्तरं नाही मिळाली तर? 

अशात तो माल न देण्याचा पूर्ण अधिकार स्टेशन मास्तरला असतो. स्टेशन मास्तराने नकार दिल्यानंतर काय करायचं हा प्रश्न मग पडतो? कारण त्यांनी दिलं नाही म्हणजे मग वस्तू कधीच मिळणार नाही का? असं वाटू शकतं. तर अशात दुसरा चान्स मिळतो. स्टेशन मास्तराच्या नकारानंतर हे प्रकरण विभागीय वाणिज्य अधीक्षकांकडे (डिवीजनल कमर्शियल सुपरिटेंडेंट) जातं.

इथे सखोल चौकशी केली जाते आणि मग खात्री पटल्यावर माल परत केला जातो. 

बरं हे ठीक आहे… आपण गेलो आणि सामान मागितलं तर ते मिळू शकतं. पण जर एखादा व्यक्ती गेला नाही तर त्याला वस्तू मिळणारच नाही का? म्हणजे रेल्वे प्रशासन त्याच्यासाठी काही प्रयत्न करणार नाहीत का?

तर प्रयत्न केला जातो. कारण तसा नियमच आहे. हरवलेली मालमत्ता त्याच्या खऱ्या मालकाला मिळावी यासाठी स्टेशन मास्तरांनी प्रयत्न करण्याचा नियम असतो. जेव्हा एखाद्या वस्तूवर मालकाचं नाव किंवा ओळखीची माहिती मिळते तेव्हा ती वस्तू संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचवणं अजून सोपं होतं.

या प्रोसेससाठी काही पैसे आकारले जातात का?

सामान मिळवण्याच्या प्रक्रियेत पैसे तेव्हाच आकारले जातात जेव्हा सामान लॉस्ट प्रॉपर्टी ऑफिसमध्ये पाठवलं जातं. मात्र त्याच्या आधी जर मालकाने सामान घेतलं तर कोणत्याही प्रकारे पैसे घेतले जात नाहीत. सामान हरवल्यानंतर किंवा सुटल्यानंतर स्टेशन मास्तर ते ७ दिवस आपल्या देखरेखीखाली ठेवतात. त्यादरम्यान सामान घेऊन गेलात तर ठीक नाहीतर त्यानंतर सामान लॉस्ट प्रॉपर्टी ऑफिसमध्ये पाठवलं जातं. आणि तिथून सामान घेताना चार्जेस लागतात. 

अशाप्रकारे सगळी प्रक्रिया असते बघा. म्हणून आता नेक्स्ट टाइम तुमचं सामान राहिलंच तर लोड घेऊ नका. ते परत मिळेल. 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.