५०० च्या खोट्या नोटा १०० टक्क्यांनी वाढल्यात, चुकून तुमच्याकडे खोटी नोट आली तर काय कराल ?

मस्त रविवार आहे. प्रथेप्रमाणे उठल्या उठल्या घरच्यांनी हातात पिशवी देउन मटण आणायला पाठवलं. तिथं गेलो तर आपली नेहमीप्रमाणेच लाईन. मग राहिलो तसंच मोबाइल स्क्रोल करत लाईनीत उभा. स्क्रोल करता करता बातमी वाचण्यात आली 500 रुपयांच्या खोट्या नोटांमध्ये 100 टक्क्यांनी वाढ झाली आहे.लागलीच लक्ष गेलं घरून आणलेल्या खिशातल्या तीन पाचशेच्या नोटांवर.

अन् तेवढ्यात विचार आला जर का ह्यातली एखादी तरी खोटी निघाली तर… नेहमीचाच मटनवाला असल्याने अब्दुल भैनं कसला विचार करताय ?  असं विचारला पण. मला मात्र कधी त्या तीन नोटा भैंच्या हातात देतो तिथून काढता पाय घेतो असं झालं होतं

मग घरी आल्यावर बातमी सविस्तर वाचली आणि जर आपल्याकडं खोट्या नोटा आल्या तर त्याचं काय करायचं हे देखील शोधलं तेच तुम्हाला सांगतो.

शुक्रवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या अहवालानुसार आर्थिक वर्ष 2021-22  मध्ये सर्व मूल्यांच्या बनावट नोटांचे प्रमाण वाढले आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार 500 रुपयांच्या  बनावट नोटांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत रिझर्व बँकेला 500 रुपयांच्या 101.9% अधिक बनावट नोटा सापडल्या आणि  त्याचवेळी 2,000 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये 54.16% वाढ झाली आहे.

मोदी सरकारने डेमॉनेटाझेशन करताना बनावट नोटा कमी होतील असं सांगितलं होतं मात्र आता तसं काही घडताना दिसत नाहीये.

आता राजकारणात नं जाता आपण येऊ आपल्या मुद्दयावर. जर एवढ्या बाजारात एवढ्या प्रमाणात नकली नोटा फिरतायत आणि त्यातली एकादी आपल्याकडे सापडली तर?

तर याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही नियम बनवले आहेत तेच जाणून घेऊया.

सुरवात करू जिथं आपल्याकडची खोट पकडली जाण्याचे सगळ्यात जास्त चान्स असतोय त्या बँक काउंटरवरून

जर तुम्ही बँकेत रोख रक्कम करायला गेल्यावर तुमच्यकडे बनावट नोट सापडली तर ती नोट तुमच्या खात्यावर जमा होत नाही. त्यावर तुम्ही म्हणाला मला माझी नोट परत द्या मी बाहेर चालवून दाखवतो तर ते तसंही चालत नाही.

बँक ती खोटी नोट तुम्हाला परत करत नाही. 

कारण आरबीआयच्या नियमांनुसार जर एखाद्या ग्राहकाने खोटी नोट त्याला परत करण्याचा आग्रह धरला आणि तो बँकेने मान्य केला तर  ते सापडलेली खोटी नोट जप्त करण्यात बँकेला आलेले अपयश मानले जाईल आणि एवढेच नाही तर बँकेला त्यासाठी दंड आकारला जाईल.

जप्त केल्यावर बँक त्या नोटांवर  “बनावट नोटांचा” शिक्का मारते आणि जप्त केलेल्या नोटांची बँकेकडून रजिस्टरमध्ये नोंद ठेवली जाते. त्यानंतर अशा बनावट नोटा जप्त केल्यानंतर त्या पोलिसांकडे पाठवल्या जातात. जर बँकेत पैसे जमा करणाऱ्याकडे  पाचपेक्षा जास्त बनावट नोटा असल्यास बँकेला चौकशीसाठी एफआयआर देखील दाखल करावा लागतो.

आता दुपारी एक शक्यता म्हणजे बँकेच्या ATM मधून तुम्हला खोटी नोट मिळाली.

बँकेला जरी RBI ने ATM मधून फेक नोटा जाणार नाहीत याची काळजी घेण्याची तंबी दिली असली तरी अनेकदा बँकेच्या ATM मधुनच फेक नोटा लोकांच्या हातात आल्याच्या घटना घडल्या आहेत. अशावेळी पुढे दिलेली उपायोजना करण्याचा सल्ला RBI कडून ग्राहकांना देण्यात आला आहे.

पाहिलं तर नोट बनावट नाही ना याची खात्री करून घ्या. जर शंका आलीच तर त्या नोटेचा अनुक्रमांक लिहून घ्या. त्याचबरोबर ATM मधून मिळालेली स्लिप आणि बँक पासबुक घेऊन पोलिसांकडे जावा. त्यानंतर मग पोलिसांकडून एफआयआर नोंदवला जाईल आणि तपास केला जाईल.

जर बँक यामध्ये दोषी आढळली तर तुम्हला तुमचे पैसे परत मिळतील.

यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी ATM च्या वॉचमनला दाखवलं होतं हा पुरावा ग्राह्य धरला जात नाही. त्याऐवजी ATM मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तुम्ही त्या खोट्या नोटा दाखवाव्यात असा सल्ला दिला जातो.

अजून मनात प्रश्न आहेत? सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील फक्त शेवटपर्यंत वाचा.

अजून एक बनावट नोटा बाळगल्या म्हणून तुम्हाला कोणती शिक्षा होऊ शकते?

IPC च्या कलम 489A ते 498E नुसार,बनावट चलन बाळगणे किंवा प्रसारित करणे हा गुन्हा आहे. कलम 498A नुसार  कोणतीही व्यक्ती जो बनावट नोटा बनवण्याचा प्रयत्न करेल किंवा त्यासंबंधीत कोणतेही कार्य करेल त्याला जन्मठेपेची शिक्षा होईल आणि दंड भरावा लागेल.

कलम 489B नुसार जर कोणी  त्याच्याकडे असणाऱ्या नोटा खोट्या आहेत असं माहित असूनदेखील बनावट चलन वापरून दुस-याकडून काहीही विकत घेतो त्याला  जन्मठेपेची शिक्षा होईल आणि दंड भरावा लागेल.

कलम 498C सांगते की की खोटे चलन माहित असून देखील बाळगणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला  दंडासह जन्मठेपेची शिक्षा होईल.

मग चुकून जरी नोट आली तरी  जन्मठेपच होईल का?

जर तुम्हाला माहीतच नसेल की तुमच्यकडे खोट्या नोटा कशा आल्या तर तुमच्यावर गुन्हा दाखल होत नाही. गुन्हा दाखल करण्याआधी तुम्हाला नोटा खोट्या होत्या हे माहित होतं का? त्या नोटांचा वापर करण्यामागे तुमचं इंटेन्शन काय होतं? या सर्व गोष्टी विचारता घेतल्या जातात.

जर कोणी तुम्हाला बनावट नोटा दिल्या तर काय करायचं ?

जर तुम्हाला एखाद्याकडून बनावट नोट मिळाली आणि तर ती तशीच पुढं पास करण्याच्या लफड्यात पडू नका. फुकटचं अडकाल. त्याऐवजी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करा. मग पोलीस पुढचा काय आहे  कार्यक्रम करतील.

आता एक महत्वाचा प्रश्न अशा खोट्या नोटा कशा ओळखायच्या ?

तर RBI ने नोटांवरील कोणत्या खुणा चेक कराव्यात हे सांगितलं आहे हे त्याच्या खाली लिन देतोय त्या चेक करा.

२०००च्या नोटेसाठी

https://paisaboltahai.rbi.org.in/rupees-two-thousand.aspx

५००च्या नोटेसाठी

https://paisaboltahai.rbi.org.in/rupees-five-hundred.aspx

तर तुम्हाला जेवढी माहिती द्यायची होती तेवढी दिली बाकी ही माहिती वापरात आणण्याची जबाबदारी तुमची.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.