भाजपचं कसब्यात नेमकं इथंच गणित चुकलंय….

भाजपच्या हातून अखेर कसबा गेला….! कसब्याच्या मैदानात भाजपकडून हेमंत रासने तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर आधी थेट लढत होती. पण धंगेकरांनी हि जागा आपल्याकडे खेचून आणली. गेल्या ३० वर्षांपासून कसबा भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे. 

त्यामुळे पक्षाने हेमंत रासने यांच्यावर कसब्याचा गड राखण्याची जबाबदारी सोपवली होती. पण हि जबाबदारी एकट्या हेमंत रासनेंची नव्हती. म्हणूनच भाजपने सर्व बड्या नेत्यांना प्रचारात उतरवलं.  इतकंच नाही तर गिरीश बापट आजारी असूनही प्रचारात दाखल झाले होते. एकनाथ शिंदे २ दिवसांच्या मुक्कामाला होते. पण तरीही भाजपच्या हातून कसबा गेलाच. 

सर्वात सेफ आणि स्ट्रॉंग बालेकिल्ल्यात भाजपचा पराभव होण्याचं काय कारण असेल ? अशा कोणत्या उणीवा भाजपकडून राहून गेल्या ज्यामुळे भाजपला कसबा गमवावा लागला. भाजपचं कसब्यात नेमकं कोणतं गणित चुकलं ? याची कारणीमिमांसा झालीच पाहिजे…

कसब्यात भाजप पराभूत झाली त्यामागची कारणं, भाजपाच्या उणीवा, भाजपच्या चुका असं सगळं पाहायला गेलं तर भाजप दरबारी राजकारणात अडकली आणि त्यामुळे उमेदवार घोषित करायला उशीर झाला. ही भाजपची पहिली चूक म्हणता येईल. 

जशी कसब्याची पोटनिवडणूक जाहीर झाली तसं सगळ्याच पक्षातून इच्छुक समोर येऊ लागले होते. भाजपचा उमेदवार ठरवण्यासाठी भाजपने बराच वेळ घेतला. पुण्याच्या पालकमंत्री या नात्याने चंद्रकांत पाटलांनी पहिल्यांदा माहिती दिली कि, उमेदवारीसाठी बैठक पार पडेल पण तितक्यात देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीतून उमेदवार ठरेल असं जाहीर केलं. 

तोच इथे काँग्रेसने हुशारी केली. नेहेमी दरबारी राजकारणात अडकणाऱ्या काँग्रेसने यावेळेस त्यांचा उमेदवार दिल्लीतून न ठरवता पक्षाकडून निरीक्षक म्हणून आमदार संग्राम थोपटेंना नियुक्त केलं. उमेदवारीसाठी संग्राम थोपटेंनी १६ इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आणि धंगेकरांना उमेदवार म्हणून फिक्स केलं. पक्षाने राज्याच्या नेत्यांना कामाला लावलं, प्रचार सुरु झाला..  

तेच भाजपने रासनेंची उमेदवारी दिल्लीतून ठरवली, दिल्लीतून रासनेंच्या उमेदवारीची बातमी येईपर्यंत इकडे काँग्रेसच्या धंगेकरांनी प्रचारही सुरु केलेला. पण रासनेंना प्रचारासाठीची रणीनीती आखायला वेळ कमी पडला. 

दुसरी चूक म्हणजे ब्राह्मण समाजच्या नाराजीमुळे भाजपचा पारंपरिक मतदार दुरावला गेला.

मुक्ता टिळकांचे पती शैलेश टिळक यांना किंव्हा मग बापटांच्या घरात उमेदवारी न देण्यामुळे कसबा मतदारसंघात पहिल्यांदाच उघडपणे उमेदवारांची जात चर्चेत आली होती. टिळकांना आणि बापटांना उमेदवारी टाळल्यामुळे कसब्यात भाजपाविरोधी नाराजी निर्माण झाली. ब्राह्मण महासंघाकडून अपक्ष आनंद दवेंचं निवडणुकीच्या रिंगणात उतरणं हा देखील त्याचाच भाग होता. 

आनंद दवेंनी भले २९७ मतं मिळवली असली, तरी त्यांच्या रुपाने ब्राह्मण समाजाची भाजपविरोधी नाराजी वाढण्यास हातभारच लागला. आणि हीच नाराजी काँग्रेसच्या पथ्यावर पडल्याचं बोललं जातंय.  कसब्यात भाजपने यावेळेस काही ठराविक जातिवर्गाच्या मतांवर फोकस न करता इथे असलेल्या सर्वाधिक ओबीसी आणि मराठा मतदारांवर फोकस दिलं पण याच कसब्यात १३. टक्के ब्राम्हण मतदारांचा जे कि भाजपचा आजवरचा पारंपरिक मतदार राहिलाय, तोच मतदार दुरावल्याचा फटका भाजपला बसला हे मतांच्या आकडेवारीवरून लक्षात येतं

तिसरी चूक म्हणजे भाजपने कसब्यात वेगळं समीकरण -चिंचवडमध्ये वेगळं समीकरण आजमावलं. 

कसब्यात भाजपने काय केलं ? तर कसब्यात ज्यांनी भाजप स्ट्रॉंग केली त्या बापटांच्या घरात उमेदवारी द्यायचं टाळलं. दुसरं म्हणजे मुक्ता टिळकांच्या पश्च्यात शैलेश टिळकांनी उमेदवारी मागितली पण त्यांना उमेदवारी देण्याचं टाळण्यात आलं आणि हेमंत रासने यांच्या रूपाने ब्राम्हणेत्तर तसेच नवीन चेहरा समोर आणला. 

थोडक्यात स्वतःच्याच बालेकिल्ल्यात ब्राम्हण समाजाची नाराजी पत्करून प्रस्थापित कुटुंबाच्या बाहेर उमेदवारी देण्याचा प्रयोग भाजपने राबवला. पण तेच चिंचवड मध्ये भाजपने नेमकं दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबातूनच त्यांच्या पत्नी अश्विनी जगतापांना उमेदवारी जाहीर केली. कदाचित भाजपने जे चिंचवडमध्ये समीकरण राबवलं तेच कसब्यात देखील टिळकांच्या कुटुंबात उमेदवारी देऊन राबवलं असतं तर कदाचित निकाल वेगळा लागला असता का अशी चर्चा भाजपच्याच कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहेत.    

भाजपची चौथी चूक म्हणजे पक्षाचं नेतृत्व इथे कमी पडलं. 

राज्यातली कोणतीही निवडणूक असो देवेंद्र फडणवीस प्रत्येक निवडणुका अगदी स्ट्रॅटेजीवाईज जिंकून आणतात. पण यात एकटे फडणवीस पुरेसे नाहीत. पुण्याचे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांचा फारसा प्रभाव कसब्याच्या निवडणुकीत दिसून आला नाही. 

रासनेंच्या पराभवासाठी स्थानिक पातळीवर चंद्रकांत पाटलांना जबाबदार धरण्यात आलं. फक्त चंद्रकांत पाटीलच नाही तर प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावणकुळे यांच्या नेतृत्वाची छाप देखील या पोटनिवडणुकीत पडलेली दिसली नाही. फक्त कसबाच नाही मूळचे नागपूरचे असलेले बावणकुळे  यांच्याच नेतृत्वाखाली भाजपच्या बालेकिल्लला  नागपूर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवली गेली मात्र तिथेही काँग्रेसने भाजपला मात दिली. 

पाचवी चूक म्हणजे भाजपने एक साधी पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनवली.

जरी कसब्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर पराभूत झाले असते तरी काँग्रेसकडे गमवण्यासारखे काहीच नव्हतं पण तेच ही निवडणूक प्रतिष्ठेची करून भाजपने आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय. भाजपकडून केंद्रीय मंत्र्यांपासून सर्व बड्या नेत्यांना प्रचारात उतरवलं गेलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २ दिवस कसब्यात मुक्काम ठोकून होते. 

मनसेने कसब्यात रासने यांचाच प्रचार केला. यामुळे या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं. आणखी कोणतीच कसर नको म्हणून भाजपने आजारी गिरीश बापटांना प्रचाराला आणलं आणि हीच भाजपच्या प्रतिमेला धक्का देणारी कृती ठरली. बापटांच्या जीवाशी खेळण्याचं काम भाजपकडून केलं गेलं, त्यांना प्रचारात आणणं ही असंवेदनशील कृती असल्याची टीका भाजपला सहन करावी लागली.

भाजपची शेवटची चूक म्हणजे शेवटच्या टप्प्यात पक्षाने केलेला हिंदुत्वाचा प्रचार.

निवडणूकीच्या अगदी पहिल्या दिवसापासूनच कसब्याची निवडणूक हिंदूत्वाच्या मुद्द्यावर जाणार हे स्पष्ट होतं. तसंच घडलं. कसब्यात मतदानाला अगदी दोन दिवस शिल्लक राहिले असताना फडणवीसांनी थेट हा हिंदुत्ववादी कसबा आहे, कलम ३७० समर्थक विरुद्ध कलम ३७० विरोधक अशी ही लढाई आहे असं म्हणत उघड हिंदूत्वाचा नारा दिला होता. 

त्याचा भाग म्हणून कसब्याच्या पोटनिवडणूकीत पुण्येश्वर मंदीर, हिंदुत्व विरुद्ध काँग्रेस, हिंदुत्ववाद, कलम ३७० चे मुद्दे चर्चेला आणले गेले. अमित शहांची भेट देखील औंकारेश्वर मंदिरात झाली. भाजपनं एका बाजूला हिंदुत्वाचा मुद्दा प्रतिष्ठेचा केलेला असताना दुसरीकडे धंगेकरांनी स्थानिक प्रश्न आणि विकासाचे मुद्दे चर्चेत आणले. आणि याचा परिणाम निकालात दिसून आला. 

थोडक्यात शेवटच्या टप्प्यात ध्रुवीरकरणाचा झालेला प्रयत्नही हा परिणामकारक ठरला.  याशिवाय भाजपनं या निवडणुकीत मोठ्या धनशक्तीचा वापर केल्याचा आरोपही करण्यात आला.  

थोडक्यात उमेदवारी जाहीर करायला भाजपने केलेला उशीर, त्यात हेमंत रासने यांचा मर्यादित संपर्क,  चिंचवडमध्ये वेगळं समीकरण आणि कसब्यात आणि वेगळं समीकरण अजमावणं, पक्षाअंतर्गत नाराजी आणि अगदी प्रत्येक निवडणुकांना प्रतिष्ठेचं बनवणं याच सर्व चुकांमुळे भाजपचे एकेककरून बालेकिल्ले ढासळत चालले आहेत. त्यात आता कसब्याचा नंबर लागलाय.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.