चाणक्यानं जे काही केलं ते चंद्रगुप्तासाठीच केलं…

यंदाच्या वर्षी महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडी देशभर गाजल्या. शिंदेंनी ५० आमदार सोबत घेऊन बंड  केलं आणि त्यांची वर्णी मुख्यमंत्रीपदावर लागली. विधानसभा अध्यक्ष निवडणूक आणि बहुमत चाचणीही पार पडली.

यावेळी विधिमंडळात भाषणं देताना पहिला दिवस गाजवला तो अजित पवारांनी आणि दूसरा दिवस गाजवला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. अजित दादांनी कोपरखळ्या मारत आपल्या जुन्या सहकार्‍यांना चिमटे काढले, तर देवेंद्र फडणवीसांनी आपले एकेकाळचे मित्र आणि आत्ताचे प्रतिस्पर्धी उद्धव ठाकरे यांना कानपिचक्या दिल्या. उद्धव यांना उद्देशून बोलताना फडणवीस म्हणाले की,

धनानंदाची सत्ता निरंकुश होते तेव्हा तेव्हा चाणक्याला चंद्रगुप्त शोधावाच लागतो

भारतीय राजकारणात कित्येकदा उदाहरणं देताना चाणक्याचा दाखला दिला जातो. आजकाल कुठल्याही नेत्याने राजकारणात वेगवेगळे डावपेच खेळून सत्ता मिळवली की, त्याला चाणक्याची उपमा दिली जाते.

पण चाणक्य नक्की कोण होते आणि दरवेळी राजकारणात त्यांचा दाखला का दिला जातो..?

असं सांगतात, इसवीसन पूर्व ३५० मध्ये चाणक्यांची कारकीर्द सुरू झाली. चाणक्य हे अतिशय बुद्धिमान आणि हुशार व्यक्ती होते. सोबतच एक महान शिक्षकही होते. त्यांचे थोर विचार आणि नीति यामुळे ते खूप लोकप्रिय होते. चाणक्य हे विष्णुगुप्त आणि कौटिल्य या नावानंही प्रसिद्ध आहेत.

तक्षशिला विद्यापीठात शिक्षण पूर्ण केल्यानंतर चाणक्य यांनी तक्षशिला विद्यापीठातच राजकारण आणि अर्थशास्त्र या विषयांवर अध्यापन सुरू केले व अत्यंत प्रभावी शिक्षक म्हणून आपली ओळख निर्माण केली. राजकारण व अर्थशास्त्र हे विषय शिकवत असल्याने तत्कालीन भारतातील अनेक राज्यांचे मंत्री चाणक्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले. 

त्यामुळं कुठलंही राज्य असलं तरी, राजकारणाचा विषय निघाला की चाणक्यांचंच नाव भारताच्या राजकीय वर्तुळात चर्चेत असायचं.

हे नाव इतकं गाजलं की, अजूनही भारताच्या राजकारणात प्रत्येक मोठ्या राजकीय घटनेनंतर खरा चाणक्य कोण? याची चर्चा रंगतेच. 

चाणक्य आणि सम्राट सिंकदराची एक थेअरी आहे, जेव्हा सम्राट सिकंदराने भारतावर आक्रमण केलं तेव्हा चाणक्यानं कूटनीती वापरत (सोप्या भाषेत गेमा खेळत) सिकंदराला परत जाण्यास भाग पाडलं. चाणक्यामुळेच सिकंदराला जग जिंकूनही भारत जिंकता आला नाही, असं म्हणतात.

जेव्हा जेव्हा चाणक्याचं नाव येतं, तेव्हा चंद्रगुप्त मौर्याचंही नाव येतं. 

चंद्रगुप्त मौर्य हा ‘मौर्य’ वंशाचा संस्थापक आणि पहिला राजा होता. एक धाडसी आणि कार्यकुशल संघटक आणि सेनापती म्हणून त्याची ख्याती होती. लहानपणी त्याची चाणक्य यांच्याशी गाठ पडली. चाणक्यांच्या तालमीत तो घडला आणि उत्कृष्ट राजा म्हणून उदयास आला, असं सांगितलं जातं. 

गंगेच्या खोऱ्यामधल्या मगध राज्यापासून उगम झालेल्या या साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र (आजचं पाटणा) ही होती. इसवी ३२२ मध्ये चंद्रगुप्त मौर्य याने नंद घराण्याला पराभूत करून मौर्य घराणं स्थापन केलं. मौर्य साम्राज्य हे तत्कालीन सर्वांत मोठ्या साम्राज्यांपैकी एक आणि भारतीय उपखंडातील सर्वांत मोठे साम्राज्य होते. 

चंद्रगुप्तचा कार्यकाळ भारतीय संस्कृतीचा सुवर्ण काळ मानला जातो. पण त्यानं ज्या धनानंद राजाचा पराभव केला, त्याचाच उल्लेख देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेतही केला.

हा नंदवंशाचा धनानंद राजा नक्की कोण होता, हे थोडक्यात बघू.. 

धनानंद हा मगध देशाचा राजा होता. त्याचा प्रदेश बियास नदीपर्यंत पसरला होता. मगधच्या लष्करी सामर्थ्याच्या भीतीने सिंकदराच्या सैनिकांनी व्यास नदीच्या पलीकडे जाण्यास नकार दिला. पैशाच्या लोभासाठी धनानंद कुप्रसिद्ध होता. त्याच्याकडे जवळपास ८० कोटी इतकी संपत्ती होती. तरीही त्याला धनाची भूक होती म्हणून लोकांनी त्याचं नाव धनानंद असं ठेवलं होतं.

फडणवीस याच धनानंदाचा संदर्भ देत, सत्ता निरंकुश होते तेव्हा तेव्हा चाणक्याला चंद्रगुप्त शोधावा लागतो, असं म्हणाले…

या वाक्यामागची स्टोरी नक्की काय होती..?

असं सांगतात की, चाणक्याची आर्थिक परिस्थिती फार बेताची होती. एकदा त्याच्या बायकोचा कुणीतरी गरीबीवरुन अपमान केला. मग तिनं चाणक्याकडे धनानंद राजाला भेटण्याचा हट्ट केला आणि भेट म्हणून काही पैसे मिळवण्याचा सल्लाही दिला. 

अखंड भारताबद्दल सूचना देऊन राजा धनानंद यांच्याकडून काही भेटवस्तू घेण्याच्या इच्छेने चाणक्यही भेटायला गेला.

पण धनानंद हा अत्यंत गर्विष्ठ राजा होता, त्यानं चाणक्याचं कुरूप रूप पाहून त्याचा अपमान केला आणि त्याच्या सूचना नाकारल्या. तेव्हा चाणक्याला खूप राग आला आणि त्याने नंद साम्राज्याचा नाश करण्याची शपथ घेतली.

सुडाच्या भावनेने पेटलेला चाणक्य धनानंदांच्या नंद घराण्याला मुळापासून नष्ट करू शकेल अशा व्यक्तीचा शोध घेत होता. त्याचवेळी चाणक्याला चंद्रगुप्त दिसला. चंद्रगुप्तजवळ राजा बनण्याचे सर्व गुण त्याला दिसून आले. त्यानं चंद्रगुप्ताच्या आईला ही गोष्ट सांगितली आणि चंद्रगुप्ताला आपल्या सोबत नेण्याची विनंती केली, त्यानं चंद्रगुप्ताला शिक्षण देण्याचं ठरवलं.

चाणक्याने त्याला सात वर्षे कठोर लष्करी प्रशिक्षण दिले. चाणक्याच्या मार्गदर्शनाखाली, चंद्रगुप्त एक सक्षम योद्धा बनला. योग्य प्रकारे नियोजन आखून त्याने चंद्रगुप्तला धनानंदच्या राज्यावर स्वारी करण्यासाठी तयार केले आणि त्यानंतर चंद्रगुप्तानं धनानंदच्या राज्यावर स्वारी केली आणि त्याचा पराभव करुन त्याला कायमचं संपवून टाकलं..

अशाप्रकारे चाणक्यानं राजकारण खेळलं आणि आपल्या अपमानाचा बदला पूर्ण केला. या गेममधून त्यानं एक उदाहरण सेट केलं. त्यानं अर्थशास्त्र आणि राजकारणावर लिहिलेली पुस्तकं आजही संदर्भ ग्रंथ म्हणून मानले जातात. 

एका तरुणाला घेऊन त्यानं त्याकाळच्या सगळ्यात मोठ्या साम्राज्याला संपवलं, पण साम्राज्य चंद्रगुप्ताला मिळालं त्यामुळं लोकं म्हणू लागली…

  चाणक्यानं जे काही केलं ते चंद्रगुप्तासाठीच केलं.

आपल्या बुद्धीच्या जोरावर एवढा दबदबा निर्माण केला की, सगळ्या भारतातले राजे सल्ला घ्यायला चाणक्याकडे जमू लागले. धनानंदाचा गेम चर्चेत आला म्हणून आपल्याला माहीत आहे, बाकीही त्याच्या राजकीय खेळ्या इतिहासाच्या पानात लपल्यात, असं सांगितलं जातं.

आता सध्याच्या राजकारणात नेमके चाणक्य कोण? हे मात्र प्रत्येकानं आपल्या आपल्या हिशोबानं ठरवलेलं बरं असतंय…     

हेही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.