२०११ साली शून्य, २०१६ साली फक्त तीन आणि आत्ता थेट ७८ हा भाजपचा नैतिक विजय

२०११ सालच्या प. बंगालच्या विधानसभा निवडणूकीत भाजपला भोपळा फोडता आला नव्हता. तसा तो यापूर्वी देखील कधीच फोडता आला नव्हता. पण ही फार काही जूनी गोष्ट नाही. फक्त दहा वर्षांपूर्वीच्या निवडणूकीची आहे.

त्यानंतर २०१६ साली निवडणूका झाल्या. देशात मोदी आलेले. मोदी लाट कायम होतीच. अशा वेळी बंगालच्या निवडणूका झाल्या. तेव्हा भाजपला बंगालमध्ये ३ जागांवर विजय मिळाला. ३ जागांवर विजय मिळाला या घटनेला पाच वर्ष झाली.

आणि आज.

२०२१ च्या निवडणूकीत भाजपला ७८ इतक्या आकड्यांवर समाधान मानावं लागलं आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये फक्त ३ जागा असणाऱ्या भाजपने थेट सत्तेची स्वप्न पहावित हे अतिरंजिक होतं. सत्तेची स्वप्न पहातच त्यांनी ७८ जागांवर आघाडी घेतलेली आहे.

पश्चिम बंगाल कधीकाळी डाव्यांचा गड होता. त्यानंतर तो ममतांच्या हातात गेला. आजच्या निवडणूकीनंतर ममतांनी या गडावर आपलच वर्चस्व असल्याचं सिद्ध केलं आहे. मात्र भाजप बंगालचा हा गड फोडून काढायला सक्षम आहे हे चित्र मात्र आजच्या निकालानंतर स्पष्ट झालं आहे.

पण भाजप ने पहिल्यांदा हा प्रयत्न केला का? भाजप कधीपासून बंगाल जिंकू पाहतोय हे पाहण्यासाठी आपल्याला इतिहासात जावं लागेल….

भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली ती १९८२ मध्ये. या निवडणूकीत त्यांना १ लाख २९ हजार मते मिळाली होती. त्यानंतरच्या १९८४ सालच्या लोकसभेत भाजपने ९ जागांवर आपले उमेदवार उभा केले होते. यात त्यांना १ लाख १ हजार मते मिळाली होती. एकूण मतांच्या तुलनेत ही आकडेवारी फक्त ०.४ टक्के इतकी होती.

म्हणजेच पहिल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणूकीत भाजपचा वोट शेअर हा अर्धा टक्का देखील नव्हता.

१९८७ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणूकीत भाजपने ५७ जागांवर उमेदवार उभा केलेले. यामध्ये त्यांना १ लाख ३४ हजार ८६७ मते मिळाली होती. १९८९ सालच्या लोकसभेच्या निवडणूकीत भाजपने १९ जागांवर उमेदवार उभा केले आणि त्यामध्ये ५ लाख २९ हजार मते घेतली. ही आकडेवारी एकूण मतांच्या १.६७ टक्के होती.

१९९१ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने राज्यभर २९१ उमेदवार उभे केले आणि मतांचा आकडा १९८७ पासून ०.५१ % वरून ११.३४ %  म्हणजेच ३,५१३,१२१ मतांपर्यंत वाढवला.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाने प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवार उभे केले होते. एकाच वेळी विधानसभा निवडणुकीबरोबर झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील पक्षाने ४२ उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीत भाजपाला ३६,२४,९७४ (११.६६%) मते मिळाली.

१९९६ मध्ये विधानसभा आणि लोकसभा दोन्ही निवडणुका एकाच वेळी झाल्या. पक्षाने २९२ विधानसभा मतदारसंघांवर निवडणूक लढविली आणि २,३७२,४८० (६.४५%) मते मिळवली आणि लोकसभेच्या ४२ जागा लढविल्या आणि राज्यभरात २५,२५,८६४ (६.८८%) मते मिळवली.

१९९८ च्या लोकसभा निवडणूकी मध्ये भाजपने १४ जागांवर निवडणूक लढविली आणि पश्चिम बंगालमध्ये प्रथमच दमदममधून लोकसभेची १ जागा जिंकली. त्यादरम्यान ३७,२४,६६२ (१०.२ टक्के) मते मिळवली.

पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले तपन सिकंदर यांनी दम दम मतदारसंघात माकपचे निकटवर्ती प्रतिस्पर्धी निर्मल कांती चटर्जी यांचा पराभव करून ६,३१,३८३ मते मिळविली होती.

१९९९ मध्ये भाजपाने अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेसबरोबर युती करून १३ जागा लढवल्या आणि लोकसभेच्या २ जागा जिंकल्या आणि त्यांना ३९,२८,४२४ (११.१३ टक्के) मते मिळाली होती.

लोकसभेचे दोन निवडलेले सदस्य कृष्णानगरचे सत्यब्रत मुखर्जी हे ४३.८२% मते आणि दम दममधून तपन सिकदार ५१.५९% मते घेऊन जिंकले होते.

२००१ च्या विधानसभा निवडणुकीत, भाजपाने राज्यभरात २६६ मतदारसंघांवर निवडणूक लढविली आणि १९,०१,३५१ (५.१९) मते मिळविली. २००४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत माकपच्या नेतृत्वात डाव्या आघाडी आणि आयएनसीच्या नेतृत्वात संयुक्त पुरोगामी आघाडीद्वारे राष्ट्रीय लोकशाही आघाडी पूर्णपणे नष्ट झाली होती.

भाजपाला एकही जागा जिंकता आलेली नाही आणि तिचा मित्रपक्ष अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस केवळ एका लोकसभेच्या जागेवर मागे यावे लागले होते आणि भाजपाला मात्र २९,८३,९५० (८.०६%) मते मिळविण्यात यश आले होते.

२००६ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेसशी युती केली आणि २९ मतदारसंघांवर निवडणूक लढविली. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला ७,६०,२३६ (१.९३ टक्के) मते मिळाली आणि त्यांनी लढवलेल्या जागांवर १९.८९ % मते मिळाली.

२००९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत, गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या पाठिंब्याने भाजपचे उमेदवार जसवंत सिंह यांनी दार्जिलिंग लोकसभा मतदारसंघात एकूण ४ लाख ९७ हजार मते मिळवून विजय मिळवला. या निवडणूकीत भाजपने लोकसभेसाठी १ जागा जिंकली होती.

२०११ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने जीजेएमशी युती केली, मात्र तेंव्हा त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने केवळ २ जागा जिंकल्या. या वेळी देशभरात मोदी लाट होती. भाजपला न भूतो न भविष्यती असं यश मिळालं होतं. तेव्हा देखील भाजपला बंगालमध्ये मात्र २ जागांवरच समाधान मानावं लागलं होतं.

२०१६ च्या १५ व्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच भाजपा उमेदवारांनी ३ जागांवर विजय मिळवला आणि त्यांना राज्यभरात १७.२ % मते मिळाली, हा विजय भाजपासाठी नक्कीच मोठा होता.

पश्चिम बंगालमधील २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एक मोठा राजकीय बदल झाला तो म्हणजे, भारतीय जनता पक्षाने ४२ मतदारसंघांपैकी १८ जागांवर विजय मिळवला. ही आकडेवारी धक्कादायक तर होतीच पण त्याहून अधिक म्हणजे प. बंगालमध्ये भाजपने लावलेला सुरूंग म्हणून गणली गेली. या निवडणूकीच्या विजयानंतर स्टेट्समॅनने अहवाल दिला की,

भाजपाने तब्बल 18 जागेवर विजय मिळवून सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसला कठोर आव्हान उभे केले आहे.

या निवडणूकीनंतर दोनच वर्षात पश्चिम बंगालची निवडणूक आली. या निवडणूकीत झालेल्या अनेक घडामोडी आपल्या समोर आहेतच. यामध्ये भाजपला ७८ जागांवर आघाडी मिळाल्याचं चित्र आहे. अखेरपर्यन्त काही जागा कमी जास्त होतीलच, पण शून्य वरून ३ आणि ३ वरून ७८ ही संख्या देखील काही कमी नाही.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.