जेव्हा कॉमन मॅनला भेटण्यासाठी बाळासाहेबांनी पुण्यात धडक मारली होती…

जिंदगीत कितीही पैसे कमवा, लई मोठं नाव कमवा, पार दूर देशात जाऊन हवा करा… आपल्या संकट काळात आपल्यासोबत असणारा मित्र जेव्हा खांद्यावर हात टाकतो आणि घट्ट मिठी मारतो, तेव्हाच सगळं जग जिंकल्याची भावना तयार होते. आता हे मित्र क्रिकेटमधले असोत, बॉलिवूडमधले असोत किंवा राजकारणातले… मैत्री हे सगळ्यात भारी नातं.

रेषांच्या आधारे अशीच एक मैत्री जोडली गेली होती, दोन व्यंगचित्रकारांची. हे दोघेही कायम हसतमुख… एकाचा पेशा फक्त चित्रकला, तर दुसरा मित्र म्हणजे सगळ्या महाराष्ट्रात दबदबा असणारा… फायरब्रॅन्ड. अर्थात हे मित्र होते ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे.

आपल्या कुंचल्यातून फटकारे मारण्यात दोघेही वस्ताद. आर. के. कधीकधी हळूच चिमटा काढायचे, सामान्य माणसाचे प्रश्न छोट्याश्या चित्रातून मांडायचे, तर दुसऱ्या बाजूला बाळासाहेबांचं व्यंगचित्र म्हणजे वाघाचा पंजाच. मुंबईपासून दिल्लीपर्यंत सगळं राजकारण हलवण्याची ताकद बाळासाहेबांच्या ब्रशमध्ये होती.

या दोन अवलियांची मैत्री झाली, ती फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करताना. १९४७ मध्ये या दोघांची तिथं मैत्री जमली, दोघेही राजकीय व्यंगचित्र काढायचे आणि दोघांच्याही ब्रशमध्ये अफाट ताकद. पुढे बाळासाहेबांनी फ्री प्रेस मधलं काम सोडलं. कालांतराने आर. के. ही तिथून बाहेर पडले, पण दोघांच्या मैत्रीमधली वीण रेषेसारखीच आणखी गडद होत गेली.

फ्री प्रेसमध्ये काम करताना त्यांना कम्युनिस्ट विचारधारेशी निगडित चित्र काढायला सांगण्यात आलं, आपल्या तत्वांशी एकनिष्ठ असणाऱ्या या जोडीला ते मंजूर नव्हतं. पुढे बाळासाहेबांनी मार्मिक हे व्यंगचित्राला वाहिलेलं स्वतःचं साप्ताहिक सुरू केलं, तर आर. के. लक्ष्मण यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये ‘You said it,’ या नावानं व्यंगचित्र मालिका सुरू केली.

१९६६ मध्ये बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. मराठी मुलांच्या नोकऱ्या, भूमिपुत्रांचे हक्क यासाठी लढणाऱ्या सेनेनं मुंबईतल्या दक्षिण भारतीय लोकांना लक्ष्य केलं. बाळासाहेब तर जाहीर सभेतही दक्षिण भारतीय लोकांवर जहरी टीका करायचे. मात्र तरीही या दोघांच्या मैत्रीत अंतर पडलं नाही. पूर्णपणे राजकारणात व्यस्त झाल्यावरही, बाळासाहेब खासगीत लक्ष्मण यांना सांगायचे, ‘की मी व्यंगचित्र काढणं मिस करतो गड्या.’

दोघांच्या मागचे व्याप वाढत गेले आणि अर्थात वयही. पुढे तब्येतीच्या कारणामुळे लक्ष्मण पुण्यात शिफ्ट झाले. ८६ वर्षांच्या बाळासाहेबांच्याही तब्येतीच्या तक्रारी सुरू होत्याच. जवळपास दोन वर्ष ते मातोश्रीमधून बाहेर पडले नव्हते. त्यातच लक्ष्मण यांची तब्येत खालावली होती.

एक दिवस थेट बातमी धडकली, की बाळासाहेब आर. के. लक्ष्मण यांना भेटायला पुण्यात येणार. ही बातमी अफवाही नव्हती, फोर व्हीलरमध्ये बसून बाळासाहेबांनी खरंच पुण्यात धडक मारली. त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेही होते. बाळासाहेब लक्ष्मण यांच्या घरी गेले, त्यांची तब्येत ठीक नव्हती… त्यांना फारसं बोलताही येत नव्हतं. पण हे जुने मित्र अगदी पहिल्यासारखे रमले, लक्ष्मण यांनी रेखाटलेला कॉमन मॅन बाळासाहेबांना भेट म्हणून दिला. ही भेट भले अर्ध्या तासाची होती, पण प्रेमानं आणि जिव्हाळ्यानं भरलेली होती.

आर. के. लक्ष्मण यांच्या पत्नी कमला लक्ष्मण यांनी, एका ठिकाणी फार सुंदर आठवण सांगितली आहे. वृद्धापकाळात हे दोघे जेव्हाही भेटायचे, तेव्हा दोघांपैकी एकाच्या डोळ्यांत पाणी असायचं. मग दोघेही रडायचे आणि कुणीतरी एक जण हसायला लागला.. की हसू मात्र थांबायचं नाही, अगदी कागदावरच्या रेषांसारखीच!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.