एका ओव्हरमध्ये त्या बॉलरने बॅट्समनला ७७ रन्स काढू दिल्या, ते ही ठरवून..!
एखाद्या बॉलरने आपल्या एका ओव्हरमध्ये जास्तीत जास्त किती मार खाल्लेला बघायला तुम्हाला आवडेल..?
तुमचं उत्तर असणार फार फार तर ६ बॉल ६ सिक्सर म्हणजे ३६ रन्स.
६ बॉल ६ सिक्सर म्हंटल की आपल्याला आठवतो तो २००७ सालचा टी-२० वर्ल्ड कप आणि त्यात युवराज सिंगने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडची केलेली धुलाई किंवा मग त्यापूर्वी गॅरी सोबर्स आणि रवी शास्त्री यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये फटकावलेले ६ सिक्सर्स.
पण आज आम्ही तुम्हाला जी स्टोरी सांगतोय त्यात बॉलरने आपल्या एका ओव्हरमध्ये ३६ च्या डबलहून अधिक म्हणजे तब्बल ७७ रन्स आपल्या एका ओव्हरमध्ये मोजलेत. ते देखील ठरवून. शिवाय या ओव्हरमध्ये फक्त ५ बॉलच टाकण्यात आले होते. कारण बॉल मोजण्यात गोंधळलेल्या अम्पायरने पाच बॉलनंतरच ओव्हर संपल्याचं जाहीर करून टाकलं होतं.
२० फेब्रुवारी १९९०. शेल ट्रॉफीतील वेलिंग्टन व्हर्सेस कँटरबरीची मॅच.
शेल ट्रॉफीत खेळवली जात असलेली एवढी मॅच जिंकली की वेलिंग्टनचा संघ शेल ट्रॉफीवर नाव कोरणार हे जवळपास निश्चित झालं होतं. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत सामना जिंकायचाच एवढंच वेलिंग्टनच्या संघाच्या डोक्यात होतं.
मॅच सुरु झाला आणि टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करताना वेलिंग्टनच्या टीमने काढल्या ऑल आउट २०९ रन्स. प्रत्युत्तरात कँटरबरीच्या संघाने आपल्या पहिल्या डावात काढल्या ७ बाद २२१ रन्स. १९ रन्सची आघाडी घेऊन कँटरबरीच्या संघाने आपला डाव घोषित केला.
वेलिंग्टनच्या संघाकडून दुसऱ्या डावात ‘जॉन ऐकन’ने शानदार शतक ठोकलं (नॉट आउट १५६). या शतकाच्या जोरावरच वेलिंग्टनने स्कोअर बोर्डवर ३०६ रन्स असताना आपला डाव घोषित केला.
मॅचच्या शेवटच्या दिवशी आपली पहिल्या डावातील आघाडी वजा कँटरबरीला जिंकण्यासाठी हव्या होत्या ५९ ओवर्समध्ये २९१ रन्स. २९१ रन्स चेस करण्यासाठी मैदानात उतरलेल्या कँटरबरीच्या संघाची घसरगुंडी उडाली आणि अवघ्या १०८ रन्समध्ये त्यांनी आपल्या ८ विकेट्स गमावल्या.
आता वेलिंग्टनची टीम सहजच मॅच जिंकतेय असं वाटत असतानाच ‘ली जर्मोन’ आणि ‘रॉजर फोर्ड’ कँटरबरीच्या मदतीला धावून आले. त्यांनी संघाचा डाव सावरत ५७ व्या ओव्हरच्या अखेरीस टीमचा स्कोरबोर्ड ८ बाद १९६ पर्यंत नेला. आता फक्त सामन्याच्या शेवटच्या २ ओवर्स शिल्लक उरल्या होत्या.
कँटरबरीला जिंकण्यासाठी हव्या होत्या ९५ रन्स आणि वेलिंग्टनला हव्या होत्या फक्त २ विकेट्स. २ ओवर्समध्ये ९५ रन्स ही केवळ अशक्यप्राय गोष्ट होती. सहाजिकच कँटरबरीचा संघ मॅच वाचविण्यासाठी शेवटच्या २ ओव्हर्स खेळून काढणार होता.
मॅच जिंकण्यासाठी काहीही करायची तयारी असलेल्या वेलिंग्टनच्या संघाने आपले सगळे प्रयत्न करूनही त्यांना काही शेवटच्या २ विकेट्स मिळत नव्हत्या. अशा वेळी वेलिंग्टनचा कॅप्टन ‘इर्व्ह मॅकस्विनी’ आणि कोच ‘जॉन मॉरीसन’ यांनी एक आयडियाची कल्पना लढवली. आयडिया अशी की ५८ व्या ओव्हरमध्ये कँटरबरीच्या टीमला इतक्या जास्त रन्स काढू द्यायच्या की विजय कँटरबरीच्या संघाच्या आवाक्यात येईल.
शेवटच्या ओव्हरमध्ये विजय जर समोर दिसला तर जिंकण्यासाठी कँटरबरीचा संघ रिस्क घेईल आणि त्या नादात कदाचित २ विकेट्स मिळतीलही. वेलिंग्टनचा संघ मॅच आणि शेल ट्रॉफीही खिशात घालेल.
- वडिलांसाठी क्रिकेट सोडून इंजिनिअरींग केलं, परत येऊन जागतिक क्रिकेटला फिरकीच्या तालावर नाचवलं !
- भारतासाठी खेळलेला विदेशी खेळाडू, ज्याला भारतीय क्रिकेट महान ऑल राउंडर म्हणून लक्षात ठेवील !
- भारतीय क्रिकेटमधील खलनायक, ज्याने स्वार्थापोटी देशहित फाट्यावर मारलं !
एका ओव्हरमध्ये ७७ धावांचा पाऊस
कागदावर ठरलेल्या वेलिंग्टनच्या या प्लॅनला मैदानात मूर्त रूप देण्याची जबाबदारी उचलली ‘बर्ट व्हेन्स’ यानं.
५८ वी ओव्हर टाकायला बर्ट व्हेन्स आला अन एकामागून एक नो-बॉल्स टाकत सुटला. परिणाम असा झाला की ओव्हर सुरु होण्यापूर्वी ७५ रन्सवर खेळणाऱ्या जर्मोननं शतक झळकावलं.
संपूर्ण ओव्हरमध्ये मिळून जर्मोन आणि फोर्ड यांनी ७७ रन्स फटकावल्या.
त्यात एकट्या जर्मोनने ८ सिक्स आणि ५ फोरच्या मदतीने ७० रन्स फटकावल्या होत्या तर फोर्डच्या ५ रन्स काढून भागीदारीत आपलं योगदान वाढेल याची काळजी घेतली होती. एक्स्ट्रा २ रन्स होत्या नो-बॉलच्या स्वरूपातील.
आता तुम्हाला प्रश्न पडेल की एवढे सगळे नो-बॉल टाकूनसुद्धा नो-बॉलचे फक्त २ रन्स कसे..? या प्रश्नाचं उत्तर असं की त्यावेळच्या नियमांनुसार नो-बॉलवर जर बॅटसमनने रन्स काढले नसतील तरंच बॅटिंग करणाऱ्या संघाला नो-बॉलचा रन मिळत असे म्हणून.
आत्ता सुरू झाला तो शेवटच्या ओव्हरमधला थरार.
आता मॅचची शेवटची ओव्हर होती आणि कँटरबरीला जिंकण्यासाठी हव्या होत्या १८ रन्स. शेवटची ओव्हर टाकण्यासाठी बॉल होता ‘इव्हान ग्रे’च्या हाती. दोन्ही संघाला अनपेक्षितपणे सुरुवातीच्या ५ बॉलवरच ली जर्मोनकडून १७ रन्स वसूल करण्यात आल्या. पण जिंकण्यासाठी केवळ १ धाव हवी असताना फोर्डने शेवटचा बॉल अक्षरशः खेळून काढला.
खरं तर आता या गुन्ह्यासाठी कँटरबरीचे समर्थक फोर्डला फक्त शिव्याच घालू शकत होते पण गंमत अशी की यात फोर्डचाही काही दोष नव्हता. किस्सा असा की ५८ व्या ओव्हरमध्ये जो काही गोंधळ झाला होता, त्यामुळे स्कोरबोर्ड अपडेटच करण्यात आला नव्हता. त्यामुळे जिंकण्यासाठी शेवटच्या बॉलवर फक्त एकच रन पाहिजे होता याची कल्पनाच फोर्डला नव्हती.
फोर्डने निवांतपणे शेवटचा बॉल खेळून काढला अन मॅच ड्रॉ करण्यात यश मिळविल्याच्या आनंदात ‘जर्मोन-फोर्ड’ जोडी पॅव्हेलीअनमध्ये परतली. पॅव्हेलीअनमध्ये आल्यानंतर सहकाऱ्यांकडून फोर्डला समजलं की आपण काय करून बसलो आहोत ते…
…..आणि अशाप्रकारे नाट्यमय मॅच ड्रॉ अवस्थेत संपला.
पुढच्या घडामोडीत वेलिंग्टनने शेल ट्रॉफी जिंकली देखील पण मॅच जिंकण्यासाठी म्हणून त्यांचीच आखलेली रणनीती त्यांच्यावरच उलटली होती. सहज ड्रॉ करणं शक्य असलेली मॅच अविचारामुळे त्यांना पराभवाच्या तोंडावर घेऊन गेली होती. केवळ सुदैवानेच त्यांचा पराभव टळला होता. क्रिकेटच्या इतिहासात मात्र यानिमित्ताने एका नाट्यमय घटनेची नोंद झाली होती.
हे ही वाच भिडू
- क्रिकेटच्या इतिहासातील अशी टेस्ट मॅच ज्यामध्ये खेळाडूंना रविवारची सुट्टी देण्यात आली
- भारतीय क्रिकेटमधील ‘राज कपूर’, ज्याने संघाला ऑस्ट्रेलिया विरुद्धचा पहिला कसोटी विजय मिळवून दिला
- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०० विकेट्स घेणारा पहिला स्पिनर, ज्याने एकही नो-बॉल टाकला नाही !
- क्रिकेटचा शोध लावणारा इंग्लंड, इतिहासातील पहिल्याच कसोटीत पराभूत झाला होता !!