नगरच्या बहुरूपी कलावंताने सुभाषचंद्र बोस यांचं सोंग घेऊन सरकारला फसवलं होतं पण…

लग्नाला चला तूम्ही लग्नाला चला

ठकूताई, सकुताई, लग्नाला चला

चला काकू चला काकू लग्नाला चला ||

जेवायला केली चिखलाची कढी

दगडाची वडी, मस्करी लोणचं

गाढवाचं भजं, तरसाच्या पोळ्या

लांडग्याची खीर, जेवायला चला

तुम्ही जेवायला चला ||

असं एकदम खतरनाक वर्णन तुम्ही गावात येणाऱ्या बहुरूपी कलावंतांकडून ऐकलं असेल. बर चला अजून एक जब्राट वर्णन सांगतो,

बहुरूप्याच्या सामाजिक सोंगांच्या वेळी त्यांनी म्हटलेल्या गीतांमध्ये अद्भुत आणि बीभत्स रसाचं प्रामुख्याने दर्शन होतं. आता हे तुंबडीमधल वर्णन बघा…

लग्नाला निघा लवकर निघा

लग्नाला जेवायला केली बरबट्याची पोळी

थूक लावून बोटं आंबाड्याची भाजी

मिठाचे लाडू निंबाडचा शिरा

शेंबडाचं तुम बेडकीचा खर

अजगराचं सांगड घुशीच वरण

ढेकणाची उसळ पंक्तीला बसा

लग्नाला निघा मध्ये मध्ये बसा शेंबूड पुसा…..

रायरंद किंवा बहुरूपी म्हणजे अनेक रूपे घेऊन लोकांचे मनोरंजन करणारे लोककलावंत. संत तुकारामांच्या एका अभंगात ‘ बहुरूपे नटला नारायण | सोंग संपादून जैसा तैसा ‘ असा उल्लेख आहे म्हणजे भगवान विष्णू बहुरूपी असून त्याने दहा अवतार घेतले आहेत.

बहुरुपी ही लोककला आजच्या काळात दुर्मिळ झाली असली तरी भल्या भल्या हिरोना, लांब लांब पल्लेदार संवाद बोलणाऱ्या नटांना चाट पाडणारी ही कला आहे.

एकदा नगरच्या बहुरूप्याने सुभाषचंद्र बोस यांचं सोंग घेऊन सरकारला फसवलं होतं त्याचा हा किस्सा. 

रुपचंद खरात हे बहुरूपी होते आणि महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात ते एक प्रकारचे सेलिब्रिटीच होते.

नगर जिल्ह्यातील दोंडाईचा ही त्यांच्या भावाची सासरवाडी होती. चालत चालत नगरहून एकदा ते कुलताबादला पोहचले. जयदेव खरात, दगडु खरात या त्यांच्या बांधवांनी त्याकाळी एक जबरदस्त जय भीम वाडा बांधला होता. त्या वाड्याचं उद्घाटन रुपचंद खरात यांनी करावं असं सगळ्याचं मत होतं. पण इथ एक खोच होती ती म्हणजे रुपचंद खरात यांची आणि म्हणाली उद्घाटन करायचं असेल तर त्याला मोठेमोठे अधिकारी आले पाहिजे तरच त्याला उद्घाटन म्हणता येईल. 

हा तर मोठा पेच निर्माण झाला, सगळे लोकं विचार करायला लागले. शेवटी आजीच म्हणाली एक रुपचंद एक काम कर, तु सुभाषचंद्र बोसचं सोंग घे आणि गावभर जाहीर करुन टाक की सुभाषचंद्र बोस उद्घाटनाला येणार आहे. सगळया अधिकाऱ्यांना फसवायचं असेल तर सुभाषचंद्र बोस बनावचं लागेल. कारण सुभाषचंद्र बोस आजवर आहेत बघा, मेले नाही. सुभाषचंद्र बोस अजर अमर आहेत.

आजीच्या सांगण्यावरून रुपचंद खरात आणि त्यांचे इतर बांधव पुण्याला आले. नाटकाच्या कपड्यातून सुभाषचंद्र बोस यांचा पार्ट पाहिजे म्हणून सांगितलं आणि तो पोशाख त्यांनी विकत घेतला. ड्रेस घातल्यावर आपण छत्रपती शिवाजी महाराज बनू शकतो, सुभाषचंद्र बोस बनू शकतो. तो ड्रेस घेऊन सगळे परत आले. सुभाष बाबूंच्या उपस्थितीत उद्घाटन झालं. सगळा कार्यक्रम शांतपणे पार पडत होता. मोठमोठे सरकारी अधिकारी या कार्यक्रमाला आलेले होते.

रुपचंद खरात यांचे बंधू स्टेजवर हळूच गेले आणि सुभाषचंद्र बोस यांच्या कानात त्यांनी सांगितल की काम झालंय. हे ऐकताच एका मुस्लिम पोलिस अधिकाऱ्याला काहीतरी गडबड दिसली आणि त्याने सुभाष बाबूंच्या छातीवर बंदूक लावली. सगळया कार्यक्रमात गदारोळ झाला.

सगळी बहुरपी जमात थरथर कापू लागली. बंदूक छातीवर लावून तो अधिकारि म्हणाला मेरेको फसाया तुम लोगोने. पण हे रुपचंद खरात एकदम मनमौजी माणूस होते. त्यांनी जराही न घाबरता त्या अधिकाऱ्याच्या समोर आपला आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही.

सगळं निवांत होत असताना अचानक रुपचंद खरात यांचे बंधू बोलले की विश्वास नसेल तुमचा तर सुभाष बाबूंवर गोळी चालवून दाखवा. मग रुपचंद खरात सुद्धा म्हणाले चलाव गोली. अधिकाऱ्याने नेम धरला, ट्रिगर दाबणार तोच तिथले तहसीलदार धावत आले आणि त्यांनी रुपचंद खरात यांना वाचवलं. रुपचंद खरात यांनी कबुली दिली आणि त्या सरकारी अधिकाऱ्यांना सांगितलं की मी बहुरूपी आहे, इंग्रजीत मला कॉमिक म्हणतात.

मी 12 सोंगं काढतो त्यातलच एक हे होतं. वर्गणी गोळा करून आम्ही पोट भरतो.

असं बरच बोलण्याच्या कलेतून त्यांनी सगळया अधिकाऱ्यांना भावूक करून टाकलं. 

रुपचंद खरात आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर प्रभावित होऊन तिथल्या अधिकाऱ्यांनी 5-5 एकर जमीन त्यांना देऊन टाकली. त्या जमिनीवर पूढे हे बहुरूपी लोकं शेती करु लागले. पण हा सुभाषचंद्र बोस यांचं सोंग घेऊन सरकारला फसवून त्यांच्याकडूनच बक्षीस या बहुरूपी लोकांनी मिळवलं होतं. 

संदर्भ : महाराष्ट्राच्या प्रयोगात्म लोककला. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.