२२९ वर्षांपूर्वी एका मराठी माणसानं पुण्यात प्लॅस्टिक सर्जरी केली होती…

१७९३ च्या मार्च महिन्यात म्हणजेच तब्बल २२९ वर्षांपूर्वी भारतात ‘प्लॅस्टिक सर्जरी’ झाली असेल यावर आपला सहजासहजी विश्वास बसणार नाही. कारण आपल्यापेक्षा इतर राष्ट्रातलं विज्ञान-तंत्रज्ञान आणि वैद्यकशास्त्र फार प्रगत असल्याची आपली धारणा असते. 

मात्र या ऑपरेशनची धक्कादायक कहाणी १७९४ साली लंडनमधल्या ‘द जन्टलमन्स मॅगझिन ॲन्ड हिस्टॉरिकल क्रोनिकल’ मध्ये ‘Chirurgical Operation’ या नावाने प्रसिद्ध झाली आहे. 

त्या लेखात उल्लेख केलेल्या भारतातल्या एका ‘कुंभारांची कला’ बरंच काही सांगून गेली आहे. इतकंच नाही तर तो कुंभार चक्क पुण्यातला आहे यावरसुद्धा आपला विश्वास बसणार नाही.

भारतात अठराव्या शकतात अनेक लढाया सुरु होत्या. तशीच एक लढाई इंग्रज आणि टिपू सुलतान यांच्यात १७९२ साली झाली. ती लढाई ‘तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध’ म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. या लढाईत ‘कावसजी’ नावाचा एक मराठा बैलगाडीवान इंग्रजांच्या बाजूने लढत होता. 

त्याला टिपूच्या सैनिकांनी पकडून कैद केलं होते. कैदेत असताना टिपूच्या सैनिकांनी ब्रिटिश फौजेतील सैनिकांचा छळ सुरू केला होता. तसाच कावसजीचासुद्धा छळ केला होता. 

कावसजी हा सैनिक नव्हता मात्र सैन्यात बैलगाडीवान म्हणून तो कार्यरत होता. तो कैदेत असताना टिपूच्या सैनिकांनी शिक्षा म्हणून त्याचे नाकच कापले. त्यामुळे तब्बल १२ महिने कावसजी हा बिन नाकाचा होता. त्यानंतर कावसजीने कैदेतून पलायन करून पुणे गाठले. पुण्यात आल्यानंतर १७९३ च्या मार्च महिन्यात एका मराठा शल्यचिकित्सक कुंभाराने (Mahratta Surgeon Kumar) त्याच्यावर उपचार करून नवीन नाक बसवले.

म्हणजे त्या काळात ‘प्लॅस्टिक सर्जरी’ अस्तित्वात होती आणि ती सुद्धा चक्क पुण्यात….

Rhinoplasty म्हणजेच कृत्रिम नाक बसवण्याची ही शस्त्रक्रिया होय. त्याकाळी भारतात ही शस्त्रक्रिया काही नवीन नव्हती, अशी माहिती या लेखातच आहे. फार प्राचीन काळापासून अशी शस्त्रक्रिया चालत असल्याची नोंद बॉम्बे प्रेसिडेन्सीतले दोन ब्रिटीश डॉक्टर्स थॉमस क्रुसो (Thomas Cruso) आणि जेम्स फिन्डले (James Findlay) यांनी करून ठेवली आहे.

त्यांच्या माहितीच्या आधारेच १७९४ साली ‘द जन्टलमन्स मॅगझीन’मध्ये ‘Chirurgical Operation’ नावाने कावसजीच्या फोटोसह या माहितीचा लेख प्रसिद्ध झाला होता.

अलिकडे त्याची नोंद ‘The Cambridge Illustrated History of Medicine’ या पुस्तकात २०३ नंबरच्या पानावर आहे.

WhatsApp Image 2022 09 29 at 10.18.44 PM
The Cambridge Illustrated History of Medicine या पुस्तकातील लेख

 

 

या पुस्तकात ‘सुश्रुतसंहिता’ या ग्रंथाचादेखील उल्लेख आहे. ‘सुश्रुतसंहिता’ हा आयुर्वेद व शस्त्रक्रियेचा प्राचीन संस्कृत ग्रंथ आहे. सुश्रुतसंहिता आयुर्वेदाच्या तीन मूलभूत ग्रंथांपैकी एक मानला जातो. यात शरीरशास्त्र आणि शस्त्रक्रियांबद्दल सखोल विश्लेषण केले आहे. त्यामुळे हा ग्रंथ महत्वाचा मानला जातो.

त्याच्या आधारे भारतातल्या शस्त्रक्रिया झाल्याची नोंद आहे.

भारतीय आयुर्वेदात अशा शल्यचिकित्सेसाठी ‘सुश्रुतसंहिता’ सर्वात महत्वाचा ग्रंथ मानला जातो. त्यामुळे पुण्यातल्या कुंभाराला या शस्त्रक्रियेचं ज्ञान अवगत झालं असणार, यात शंका नाही. 

जेव्हा या कुंभाराने कावसजीवर शस्त्रक्रिया केली तेव्हा मि. थॉमस क्रुसो आणि मि. जेम्स फिन्डले तिथं उपस्थित होते. त्यांच्यासमोरच ही शस्त्रक्रिया घडली होती. त्यावेळी दोघांच्या डोळ्यांसमोर जे घडलं ते पुढीलप्रमाणे…..

कावसजीच्या नाकावरील शस्त्रक्रियेत पहिल्यांदा कापलेल्या नाकाच्या मापाचा मेणाचा आकार बनवून तो कपाळवर बसवला गेला. या शस्त्रक्रियेसाठी ज्या ठिकाणची त्वचा वापरायची त्या ठिकाणी तो मेणाचा भाग बसवून त्याच्या भोवतीचा आकार रेखाटून कपाळावरची त्वचा कापून घेतली. पण ही त्वचा पूर्णपणे बाजूला न करता दोन डोळ्यांच्या मधला त्वचेचा भाग अखंडपणे तसाच ठेवला. नंतर मेणाला नाकाचा आकार देवून ते कापलेल्या भागावर ठेवले आणि कपाळावरून कापलेली त्वचा त्या मेणावर पसरली. 

त्यानंतर खैराच्या झाडापासून बनवलेला कात पाण्यात उगळून त्याचा लेप कापडावर लावला. कापडाच्या पाच-सहा पट्ट्या त्या जोडलेल्या भागावर ठेवून त्या ४ दिवसानंतर काढून टाकल्या. पुढे सर्जरी केलेल्या भागावर तूपात भिजवलेला कपडा ठेवून दिला. २५ व्या दिवशी सर्जरी केलेला भागाची जखम भरून आली. त्यानंतर नाकाला हवा तसा आकार देवून सुधारणा केली. पुढे ५-६ दिवस कावसजीला झोपून रहावे लागले.

WhatsApp Image 2022 09 29 at 10.18.53 PM

ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १० व्या दिवशी पुन्हा त्याच्या नाकपुड्यांमध्ये मऊ कापडाचे बोळे घातले गेले. थोड्या दिवसानंतर कपाळावरील काढलेली त्वचा भरून आली आणि कपाळावरचे व्रणही निघून गेले. 

कालांतराने कृत्रिम नाक सुरक्षित आणि नैसर्गिक दिसू लागले अगदी पूर्वीसारखे….

त्यामुळे कृत्रिम नाक बसवण्याची ही शस्त्रक्रिया यशस्वी मानली गेली. या शस्त्रक्रियेनंतर दहा महिन्यानंतर म्हणजेच १७९४ च्या जानेवारीत जेम्स वेल्स याने हे पेंटिंग काढले. सध्या हे पेंटिंग लंडनच्या ब्रिटिश म्युझियममध्ये आहे. त्या पेंटिंगमुळेच भारतातल्या सव्वा दोनशे वर्षांपूर्वीच्या ‘प्लास्टिक सर्जरी’ची कहाणी जतन करता आली.

– चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ पत्रकार

 हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.