तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे २०१० मध्येच एकत्र आले असते…

अजित पवार आपल्या सहकारी आमदारांसह सत्तेत सहभागी झाले आणि राज्यातल्या राजकारणाची समीकरणं बदलली. या बदलत्या समीकरणात कुणी अजित पवारांसोबत गेलं, तर कुणी शरद पवारांसोबत, साहजिकच महाविकास आघाडीवरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं.

यानंतर एक मागणी होऊ लागली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्याची. बंड एकनाथ शिंदेंचं असेल किंवा अजित पवारांचं, दरवेळी एक चर्चा सुरु होते ती म्हणजे, राज आणि उद्धव एकत्र येणार का ? टाळी वाजणार का ?

या दोघांच्या एकत्र येण्याच्या चर्चा अनेकदा रंगतात आणि थंड होतात…

पण आपण थोडं इतिहासात डोकावून बघितलं, तर एक इंटरेस्टिंग किस्सा सापडतो.

तो म्हणजे एका ज्येष्ठ शिवसैनिकानं ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी केलेले प्रयत्न. सतीश वळंजू, बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक. मूळचे वरळीचे असलेले वळंजू बाळासाहेबांच्या खास मर्जीतले. मातोश्रीवरती पेस्ट कंट्रोलचं काम वळंजू करायचे. बाळासाहेबांच्या बागकामाविषयीच्या प्रेमाची कल्पनाही वळंजू यांना होती.

जेव्हा राज यांनी सेना सोडली आणि मनसेची स्थापना केली तेव्हा वळंजू छत्रपती शिवाजी पार्कवर झालेल्या सभेला उपस्थित होते. राज यांच्यावर अन्याय झालाय का? असा विचार डोक्यात असल्यानं वळंजू यांना राजविषयी सहानुभूती होती. पुढं मात्र त्यांना सेनेचं पारडं जड वाटू लागलं.

पुढे जेव्हा निवडणूका झाल्या, तेव्हा मनसेला मिळालेल्या मतांचा फटका सेनेला बसला आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं पारडं जड झालं. कट्टर शिवसैनिक असलेल्या वळंजू यांना वाटू लागलं की २०१२ च्या मुंबई महानगर पालिका निवडणुकांपूर्वी हे दोघे एकत्र यावेत.

त्यांनी यासाठी काहीतरी ठोस करायचं ठरवलं आणि १६ मे २०१० रोजी, अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर त्यांनी आपल्या सहा मित्रांना एकत्र घेतलं आणि ‘माझी चळवळ’ नावाची एक मोहीम सुरू केली. 

या मोहिमेचं उद्दिष्ट एकच होतं, ठाकरे बंधूंमध्ये एकोपा निर्माण व्हावा.

एखादा शिवसैनिक असं काहीतरी करतोय म्हणल्यावर माध्यमांमध्ये याची प्रचंड चर्चा झाली. एका वृत्तवाहिनीनं त्यांना मुलाखतीसाठीही बोलावलं. मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला, त्याआधीच वळंजू यांनी बाळासाहेबांना ‘शक्य झालं तर कार्यक्रम पाहा’ अशी विनंती केली होती.

कार्यक्रम झाला आणि वळंजू यांना बाळासाहेबांचा फोन आला, 

ते म्हणाले, “आई जगदंबा तुला यश देवो. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत. तू जे काही करतोय, ते राज आणि उद्धवसाठी नाही, तर अवघ्या महाराष्ट्राच्या हितासाठी आहे.”

शिवसेना नेत्यांनी अधिकृतपणे ‘माझी चळवळ’ला पाठिंबा दिलेला नसला, तरी बाळासाहेबांचा अप्रत्यक्ष पाठिंबा बरंच काही सांगून जात होता. जेव्हा वळंजू ऑस्ट्रेलियाला जाणार होते…

तेव्हा बाळासाहेबांचे सहाय्यक रवी म्हात्रे यांनी वळंजूंना सांगितलं, “दौऱ्यावेळी तुमचा फोन सतत सुरू ठेवा, जर बाळासाहेबांना तुमच्याशी संपर्क साधायचा झाला तर शक्य झालं पाहिजे.”

वळंजू यांनी एकदा आपल्या भाषणात मनोहर जोशी आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली, तेव्हा बाळासाहेबांनी वळंजू यांची खरडपट्टी काढली होती. त्यांचं म्हणणं होतं की, ‘तुला नाती जोडायची आहेत, की तोडायची?’

पण ‘माझी चळवळ’चं काम थांबलं नाही. त्यांनी मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिकमध्ये सभा घेतल्या, २०१० च्या सप्टेंबरमध्ये एक मूक मोर्चा काढला. छत्रपती शिवाजी पार्कजवळ असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा आधी राज ठाकरेंच्या घराकडे आणि नंतर मातोश्रीला गेला.

तब्बल १० हजार लोकं या मूक मोर्चात सहभागी होते, राज आणि उद्धव यांना “दोन्ही भावांनी लोकभावनेचा आदर करुन एकत्र यावं,” असं निवेदन आणि पुष्पगुच्छ द्यायची त्यांची इच्छा होती.

 कृष्णकुंजवर गेल्यावर राज पुण्याला गेले आहेत, असं त्यांना सांगण्यात आलं. 

तर उद्धव यांनी मात्र त्यांना भेट दिली. उद्धव यांनी पुष्पगुच्छ स्वीकारला, पण निवेदन काही स्वीकारलं नाही.

माझी चळवळ, सामान्य माणसांमध्ये लोकप्रिय होण्यासाठी आणखी एक कारण होतं ते म्हणजे, एक फोटो. 

मध्ये बसलेल्या बाळासाहेबांनी राज आणि उद्धव या दोघांच्या खांद्यांवर हात ठेवलाय असा तो फोटो होता आणि खाली लिहिण्यात आलं होतं, ‘हे चित्र पुन्हा दिसावं.’ या फोटोची लोकांमध्ये चांगलीच चर्चा झाली होती.

WhatsApp Image 2022 05 04 at 12.07.45 PM

मात्र दोन्ही भावांकडून फारसा सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यानं २०११ मध्ये बाळासाहेबांच्या जन्मदिनी म्हणजेच २३ जानेवारीला ही चळवळ विसर्जित करण्यात आली. 

वळंजू सांगतात, ‘आम्हाला बाळासाहेबांना वाढदिवशी चांगली भेट द्यायची होती. जर ठाकरे बंधू एकत्र आले असते, तर त्यांच्या ‘राजकीय त्सुनामी’त इतर पक्ष धुवून निघाले असते. आमच्या मूक मोर्चात जर लाखभर लोक समाविष्ट असते, तर कदाचित आम्हाला यश मिळालं असतं. पण आम्ही दोघांच्या एकोप्याची चर्चा लोकांमध्ये घडवून आणू शकलो हेच एक प्रकारे आमचं यश म्हणावं लागेल.’

पुढे १० मे २०१३ ला वळंजू यांनी पुन्हा एकदा ‘माझी चळवळ’द्वारे सेना-मनसे युती घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यासंबंधी त्यांनी एक पत्रकार परिषदही घेतली होती.

WhatsApp Image 2022 05 04 at 11.57.29 AM
२०१३ मध्ये प्रसिद्ध केलेलं पत्रक

जेव्हा शिंदेंच्या बंडानंतर बोल भिडूनं सतीश वळंजू यांच्याशी संपर्क साधला तेव्हा ते म्हणाले, “सध्या मी कोणत्याही चळवळीचा भाग नाही, मी प्रयत्न केले होते पण आता यातून बाहेर पडलो आहे.”

थोडक्यात एका शिवसैनिकाच्या प्रयत्नांना, बाळासाहेबांनी दिलेल्या अप्रत्यक्ष पाठिंब्याला यश आलं असतं, तर कदाचित राज आणि उद्धव हे ठाकरे बंधू एकत्र आले असते आणि आज राज्यातलं राजकीय चित्र वेगळं दिसलं असतं.

संदर्भ: ठाकरे विरुद्ध ठाकरे, धवल कुलकर्णी

हे हि वाच भिडू: 

Leave A Reply

Your email address will not be published.