भारताचा असाही एक पंतप्रधान होता जो स्वतःची गाडी स्वत:च चालवत ऑफिसला जायचा

राजीव गांधी तसे अपघातानेच राजकारणात आल्याचं म्हटलं जातं. संजय गांधी यांचा अपघाती मृत्यू आणि इंदिरा गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसची जबाबदारी घेणे भाग पडलं. प्रोफेशनल पायलट असलेल्या राजीव गांधींचं पाहिलं प्रेम विमान चालवणं होतं मात्र राजकारणात आल्यांनतर त्यांना आपल्या या छंदाला मुरड घालावी लागली होती. मात्र ड्रायव्हिंगचा छंद त्यांनी कायमच जपला. पंतप्रधान असताना राजीव गांधी स्वतःच रेंज रोव्हर चालवत पंतप्रधान कार्यालय आणि संसद भवनात ये जा करायचे.

पंतप्रधान पदावर असताना स्वतःची गाडी स्वतः चालवणारे राजीव गांधी एकमेव पंतप्रधान आहेत.

राजीव गांधींचं कार प्रेम तसेच त्यांच्या जीवाला असलेला धोका पाहून जॉर्डनचे राजे हुसेन यांनी एकदा  त्यांना बुलेटप्रूफ मर्सिडीजही भेट दिली होती. अनेकदा दौऱ्यावर असताना राजीव गांधी गाडीचं स्टेअरिंग आपल्याकडेच ठेवत.

स्पॉटलेस पांढरा सदरा, उठून दिसणारे लोट्टोचे स्नीकर्स, पॉश सनग्लासेसमध्ये पंतप्रधानाच्या दौऱ्यानिमित्त चकचकीत धुतलेल्या डांबरीवर ग्रँड प्रिक्स ड्रायव्हरप्रमाणे गाडी पाळणाऱ्या राजीव गांधींचा स्वॅग बघण्यासारखा असायचा. नेहमी सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात असणारे राजीव गांधी गाडीवर बसल्यावर मात्र आपला टाईम चांगलाच एन्जॉय करायचे.

राजीव गांधींच्या अशा वागण्यानं सुरक्षा यंत्रणांची मात्र चांगलीच तारांबळ उडायची.

अशीच एक घटना १ जुलै १९८५ रोजी घडली. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. तेव्हाच अचानक एअर चीफ मार्शल लक्ष्मण माधव काटरे यांचे निधन झाल्याची बातमी आली. लगेचच भरपावसात पंतप्रधान राजीव गांधींनी गाडी काढली आणि सोनिया गांधींना बरोबर घेऊन ते काटरे यांच्या निवासस्थानाकडे निघाले. लागलीच सुरक्षारक्षकांचा ताफा त्यांच्या मागे निघाला.

राजीव गांधीच्या पाठोपाठ सुरक्षारक्षकांच्या गाड्याही काटरे यांच्या निवास्थानाबाहेर पोहचल्या. 

हे पाहून राजीव गांधींनी मग शेजारी उभ्या असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला सुरक्षारक्षकांच्या गाड्या आपला पाठलाग करणार नाहीत याची काळजी घेण्यास सांगितले.

कदाचित त्या पोलीस अधिकाऱ्याला त्याच्या सूचना नीट समजल्या नसतील. त्यामुळं जेव्हा राजीव गांधी श्रीमती काटरे यांची विचारपूस करून परतीच्या प्रवासाला निघाले तेव्हाही सुरक्षा रक्षकांच्या गाड्यांनी त्यांचा पाठलाग चालूच ठेवला.

आता मात्र राजीव गांधींचा पारा चांगलाच चढला. त्यांनी अचानक त्यांची जीप थांबवली. मुसळधार पावसातच बाहेर पडले. तड्क जाऊन त्याच्या मागून येणाऱ्या एस्कॉर्ट कारचा दरवाजा उघडला आणि तिची चावी काढली. त्यांनतर  मागून धावणाऱ्या आणखी दोन गाड्यांच्या पण चाव्या काढल्या. गाड्यांचा ताफा थांबताच मागून येणाऱ्या दिल्ली पोलिस उपायुक्तांनी प्रकरण काय आहे हे बघण्यासाठी त्यांची गाडी पुढे आणली. राजीव गांधींनी काहीही न बोलता त्यांच्यापण गाडीची चावी काढली तेव्हा उपयुक्त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

राजीव गांधींनी सगळ्या मग सरळ या चाव्या पाण्याने भरलेल्या नाल्यात फेकल्या आणि आपली गाडी काढून सोनियांसोबत एकटेच पुढे गेले. 

एसीपींना काय करावं तेच समजत नव्हतं.मुसळधार पाऊस पडत होता आणि पंतप्रधानांच्या ताफ्यातील सहाही गाड्या राजाजी मार्गाच्या मध्यभागी चाव्यांशिवाय उभ्या होत्या. राजीव गांधी कुठे गेले याची त्यांना कोणतीच कल्पना नव्हती. पंधरा मिनिटांनी जेव्हा राजीव सेव्हन रेसकोर्स रोडवर सुखरूप पोहोचल्याचे समजले तेव्हा त्यांच्या जीवात जीव आला. 

त्याच दिवशी संध्याकाळी राजीव गांधी पुन्हा कोणत्याही सुरक्षेशिवाय त्यांच्या जीपमध्ये विजय चौकात पोहचले. तिथे खूप ट्रॅफिक दिसल्यावर त्यांनी बाजूचा रस्ता धरला आणि परत ७ रेसकोर्स रोडवर आले. दुसऱ्या दिवशी गृहसचिव राम प्रधान यांना या घटनांची माहिती मिळाल्यावर त्यांनी राजीव यांच्याकडे जाऊन आपली नाराजी व्यक्त केली. मोठ्या ऑफिस बरोबर मोठ्या जबाबदाऱ्याही आपल्यावर येतात हे राजीव गांधीना आता कळून चुकलं होतं. 

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.