जेव्हा पेट्रोल, डिझेलच्या महागाईमुळे अटलबिहारी बैलगाडीतून संसदेत गेले होते.

 

१९७३ सालचा किस्सा, तत्कालीन जनता पक्षाचे नेते अटलबिहारी वाजपेयी चक्क बैलगाडीतून संसदेत पोहचले होते. त्यांच्या पाठोपाठ अन्य खासदार सायकलवरुन संसदेत पोहचले होते.

 

पेट्रोल आणि डिझेलचे भाव सध्या गगनाला भिडताहेत. जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही भारतात मात्र पेट्रोल-डीझेलचे भाव कमी होण्याचं नांव घेत नाहीयेत. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकारने आपले हात वर केलेत आणि तेलाचे वाढलेले भाव कसे योग्य आहेत, हे सांगणारे फॉरवर्डस भाजपचे समर्थक व्हाटसअॅप युनिव्हर्सिटीतून जोरदारपणे फिरवत आहेत. अशा परिस्थितीत आम्हाला १९७३ सालचा एक किस्सा सांगावासा वाटतोय, ज्यावेळी देशातील इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते (तत्कालीन जनसंघ) आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी चक्क बैलगाडीतून संसदेत पोहचले होते.

१२ नोव्हेंबर १९७३. इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या आणि अटल बिहारी वाजपेयी विरोधी पक्षातील जनसंघाचे प्रमुख नेते. जगभरात तेल निर्यात करणाऱ्या देशांची संघटना असणाऱ्या ‘ओपेक’ या संघटनेने जगभरातील तेलाचा पुरवठा  कमी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा फटका अर्थातच भारताला देखील बसला होता. कारण इंधनासाठी भारत पूर्णतः मध्य-पूर्वेतील देशांवर अवलंबून आहे. मध्य-पूर्वेतून होणारा तेलाचा पुरवठा कमी झाल्याने भारताला अभूतपूर्व तेल संकटाचा सामना करावा लागत  होता. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तेलांच्या किमतीमध्ये जवळपास ८० टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला होता. याविरोधात विरोधी पक्षांनी जोरदार आंदोलन केलं. सरकारविरोधी जनमत तयार करण्याच्या दृष्टीने विरोधी पक्षांसाठी ही एक आयातीचं संधी चालून आली होती.

नोव्हेंबर १९७३ मध्ये संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार होतं. या अधिवेशनात तेलांच्या वाढत्या किमतीवरून सरकारला धारेवर धरण्याची विरोधकांची व्यूहरचना होती. हा विरोध करण्यासाठी काहीतरी प्रतीकात्मक मार्ग निवडावा असा विचार करत असतानाच एक भन्नाट कल्पना समोर आली. त्या कल्पनेचाच परिपाक म्हणजे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जनसंघाचे प्रमुख नेते अटल बिहारी वाजपेयी आपल्या अन्य दोन साथीदारांसह चक्क बैलगाडीतून संसदेत पोहचले. शिवाय अन्य काही खासदार सायकलवरून संसदेत पोहचले.

इंधन तेलाच्या भाववाढीचा विरोध करण्यासाठी विरोधकांनी निवडलेल्या या भन्नाट  कल्पनेची दखल  जागतिक स्तरावर घेतली गेली. ‘न्यूयॉर्क टाईम्स’ या दैनिकाने यासंबंधीचे सविस्तर वृत्त छापले.

Leave A Reply

Your email address will not be published.