कर्मवीरांच्या पठ्ठ्याला गांधीजी म्हणाले, बोलणं खरं केलंस तर दोन्ही हातानी आशीर्वाद देईन.

शाहू महाराजांचे मानसपुत्र म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील आणि भाऊराव पाटलांचे मानसपुत्र म्हणजे बॅरीस्टर पी.जी.पाटील. शाहू महाराजांनी दिलेला शिक्षण प्रसाराचा वसा कर्मवीर अण्णानी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेला आणि त्यांच्या पठ्ठ्याने तो झेंडा जागतिकपातळीवर झळकवला.

बॅ.पी.जी.पाटील म्हणजेच पांडुरंग पाटील.

त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील कवलापूर मध्ये एका प्राथमिक शिक्षकाच्या घरी झाला. मातृछत्र लहानपणीच गेले होते.

एकदा योगायोगाने कवलापूरला भाऊराव पाटील आले होते. शाळेचं हस्तलिखीत पहात असताना त्यांना एक टपोऱ्या सुवाच्च अक्षरातला लेख दिसला. भाऊराव आण्णानी मास्तरांना विचारलं की हा लेख कोणी लिहिलाय? मास्तर म्हणाले पांडुरंग पाटील. आण्णा म्हणाले त्याला बोलवा. पांडुरंगची सगळी चौकशी त्यांनी केली.

त्याच्या वडलांना सांगितलं ,

“तुमचं पोरग लई गुणाचं हाय. त्याला मी पुढच्या शिक्षणाला साताऱ्याला नेणार.”

अक्षरशः उचलून आणल्यासारख त्यांनी पांडुरंगला साताऱ्याच्या शाहू बोर्डिंगमध्ये आणलं.

तो तेव्हा तेरा वर्षाचा होता. पुढच्या काही वर्षातच पांडुरंगच्या वडीलांचही निधन झालं. पांडुरंगसाठी  मायबाप दोन्हीही कर्मवीर. रयतच्या वटवृक्षाच्या सावलीत तो वाढला. त्याला बॅरीस्टर करायचं ही आण्णाची जिद्द होती .

मॅट्रिकच्या परीक्षेत दहा जिल्ह्यात पहिला आला.

इंग्रजी संस्कृत या शहरातल्या मुलांच्या हातखंडा असलेल्या विषयामध्येही अख्ख्या पुणे विभागात पांडुरंग पहिला होता. भाऊराव कधी मुंबईला जातील तेव्हा तिथून त्याच्यासाठी इंग्रजी पुस्तके आणत.  इंग्रजी वक्तृत्वासाठी अख्ख्या महाराष्ट्रभर पांडुरंग पाटील हे नाव गाजू लागलं.

पदवीनंतर त्याला बॅरीस्टरचं शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला पाठवण्याची तयारी भाऊराव पाटलांनी केली. निघताना योगायोगाने महात्मा गांधीजीच्या दर्शनाची संधी त्याला मिळाली. गांधीजीनी त्याची सगळी माहिती घेतली. त्यांना त्याची परीक्षा घेण्याची लहर आली.

“बॅरीस्टर होऊ नकोस. मीही एक बॅरीस्टर होतो हे तुला माहित आहे ना? कर्मवीरांचा पैसा कशाला वाया घालवतोस?”

यावर पांडुरंग पाटीलने उत्तर दिले,

“बापू, मी कोर्टात प्रॅक्टिस करण्यासाठी इंग्लंडची पदवी मिळवणार नाही. मी परतल्यावर रयतमध्येच काम करेन. माझं ज्ञान संस्थेच्या कामी येईल.”

गांधीजी म्हणाले,

“मग सध्या एकाच हाताने आशीर्वाद देतो. बोलणं खरं केलंस तर दोन्ही हातांनी देईन.”

 

पांडुरंग पाटील इंग्लंडला जाऊन बॅरीस्टर होऊनच परत आला. परतल्यावर रयत मध्येच त्याने काम केले. रयतची कीर्ती सर्वदूर पोहचवली. पुढे जेव्हा कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली तेव्हा तिथले दुसरे कुलगुरू म्हणून त्याची नेमणूक झाली.

बॅरीस्टर पी.जी. पाटील कुलगुरू झाल्यावरही आण्णाची शिकवण विसरले नव्हते. रयतची कमवा आणि शिका ही योजना त्यांनी अख्ख्या विद्यापीठात लागू केली. या योजनेचा अभ्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील करण्यात आला. मृत्यूपश्चात त्यांनी आपली सगळी संपत्ती रयत शिक्षण संस्थेच्या नावे केली.

दुर्दैवाने परत कधी गांधीजी आणि त्यांची भेट कधी झाली नाही. पण भेटले असते तर त्यांनी दोन्ही हात पी.जीं.च्या मस्तकी ठेवले असते यात शंका नाही.

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.