पुण्यातल्या सगळ्यात बदनाम गल्लीत जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आला होता…

सकाळी सकाळी बातम्यांमध्ये एकच चर्चा होती. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर केलेली टीका. आता राजकारणात टीका टिपण्ण्या व्हायच्याच. त्यातल्या किती आपण ऐकतो आणि विसरूनही जातो. मात्र आज एकनाथ खडसे महाजनांना पुण्यातल्या बुधवार पेठेत पाठवलं पाहिजे असं म्हणाले. बुधवार पेठ हा शब्द ऐकला आणि भुवया उंचावल्या. आता उगाच भिडू कसला विषय काढतोय, असा विचार करु नका. आपल्यापैकी कित्येकांनी हा शब्द ऐकलाय आणि कित्येकांनी पेठेतून उत्सुकते पोटी का होईना फेरीही मारलीये.

अप्पा बळवंत चौकाकडून दगडूशेठला आलो की, सरळ सरळ जायचं. दत्त मंदिराच्या इथून हलकाच लेफ्ट मारायचा आणि समोर दिसणाऱ्या गल्ल्यांपैकी एखाद्या गल्लीत शिरायचं. आधी तोंडाला रुमाल लावावे लागायचे पण आता मास्कनी काम सोपं केलंय. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्दी, पानाच्या टपऱ्या, सिगरेट, स्वस्तातले परफ्युम आणि तिथलं वातावरण असा सगळा एकत्रित आणि जगात कुठेच न येणारा वास. कुठं दोन मजली वाडे, तर कुठं मोठ्या बिल्डिंग. मिसरूड फुटलेल्या वयात घरच्यांनी सांगितलं होतं, या गल्लीतून कधी जायचं नाही. आपण डेरिंग केली खरी, पण बिल्डिंगमध्ये पाऊल टाकलं नाही. कारण आपल्या मनात लहानपणीच एक गोष्ट ठसवली होती, ही पुण्यातली सगळ्यात बदनाम गल्ली आहे.

आता गल्लीत जे काय होतं ते चूक की बरोबर ही न संपणारी चर्चा आहे. पण तिथं जाणारा माणूस आपल्या शेजारी बसलेला असेल तरी आपल्याला कळणार नाही हे ही तितकंच खरं. बुधवार पेठेतल्या त्या गल्ल्यांची हीच पक्की इमेज आपल्या डोक्यात फिट होती.

मग एक दिवस बातमी आली, पुण्यातल्या बुधवार पेठेला बिल गेट्स यांची भेट.

शॉक लगा लगाच्या जाहिरातीतल्या पोरासारखे केस उभे राहिले. वय असं होतं की ती बातमी वाचायची जरा जास्त उत्सुकता दाखवली असती, तर घरच्यांनी फोडलाच असता. पण तरी नजर चोरुन पेपर घेतला आणि मग बातमी वाचून जे वाटलं त्याला अभिमान म्हणायचं, लाज म्हणायचं की दुसरं काय हे अजून समजलं नाही.

गेट्सनं बुधवार पेठेला भेट दिली होती, बातमी अगदी खरी होती. २००८ चा ऑगस्ट महिना. मायक्रोसॉफ्ट मॅन, जगातल्या सर्वात श्रीमंत माणसांपैकी एक असणारा बिल गेट्स पहिल्यांदाच पुण्यात येणार होता. कोणताही गाजावाजा न करता, मीडिया न नेता बिलची गाडी थेट बुधवार गल्लीत गेली. तिथल्या एका बिल्डिंगबाहेर तो थांबला. कुणीतरी मोठा फॉरेनर आलाय, एवढंच तिथं असणाऱ्या बायकांना माहीत होतं. कित्येकांना तो कोण आहे? तो काय करतो? त्याच्या नावाचा उच्चार कसा करायचा हे देखील माहीत नव्हतं. मग गेट्स तिथं का आला होता?

तर बिल गेट्स आणि त्याची पत्नी मेलिंडा यांनी गेट्स फाउंडेशनची स्थापना केली होती. पाथफाईंडर नावाच्या एका संस्थेला हे फाऊंडेशन पैसे दान करायचं. पाथफाईंडर ही पुण्यातल्या सेक्स वर्करसाठी काम करणारी संस्था. बिल गेट्स या संस्थेचं काम कसं चालतं हे पाहायला आला होता. तो बिल्डिंगमध्ये गेला आणि ट्रान्सलेटरच्या मदतीनं सेक्स वर्कर्सशी संवाद साधला.

त्यांची लाईफस्टाईल, डेली इनकम, दिवसात त्यांच्याकडे किती कस्टमर येतात, हे प्रश्न गेट्सने विचारले. त्यांच्या तब्येतीबद्दल चौकशी करताना अनप्रोटेक्टेड सेक्समुळे होणाऱ्या आजारांबद्दल तुम्हाला माहित आहे का? तुम्ही कंडोम्सचा वापर करता का आणि तुमचं मेडिकल चेकअप सातत्यानं होतं याची माहिती त्यानं घेतली.

गेट्स फाउंडेशनच्या उपक्रमानुसार त्यांनी जगभरातून पोलिओचं उच्चाटन करण्यासाठी जवळपास ४०० मिलियन डॉलर्स खर्च केले. २००८ मध्ये पुण्यात आलेल्या गेट्सने असुरक्षित शारीरिक संबंधातून होणारे रोग रोखण्यासाठी दोन प्रकल्पांचं उदघाटन केलं होतं. एचआयव्ही रोखण्यासाठी गेट्स फाउंडेशननं २०० मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त मदत भारताला केली.

जगातल्या सगळ्यात श्रीमंत लोकांपैकी एक असणारा गेट्स भारतात आला, त्यानं कुठलाही ग्लॅमरस सोहळा न करता एका बदनाम असलेल्या गल्लीला भेट दिली आणि तिथं उपेक्षा सहन करणाऱ्या महिलांसाठी भरीव काम केलं. त्यावेळीस सगळ्या भारतालाच नाही तर जगाला बिल गेट्सचा एक माणूस अभिमान वाटला असणार हे नक्की.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.