ड्रग्ज माफिया एस्कोबारच्या बोलावण्यावरून मॅराडोना फुटबॉल खेळण्यासाठी जेलमध्ये गेला होता !

आजघडीला फुटबॉल जगतात कोलंबियाचं जे काही स्थान आहे, तसं ते निर्माण होण्यात ड्रग माफिया पाब्लो एस्कोबारचा फार मोठा वाटा आहे. एस्कोबारने आपल्याकडील संपत्तीचा फुटबॉलमध्ये पाण्यासारखा वर्षाव केला आणि कोलंबियामध्ये फुटबॉलस्टार तयार झाले.

कोण होता पाब्लो एस्कोबार…?

१९४९ साली एका अतिशय गरीब कुटुंबात पाब्लो एस्कोबारचा जन्म झाला होता. हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळेच परीक्षेची फीस न भरू शकल्याने त्याला शिक्षण अर्ध्यातच सोडावं लागलं होतं.

हलाखीच्या आर्थिक परिस्थितीला कंटाळालेला एस्कोबार त्यावर उपाय म्हणून  कोलंबियातील गुन्हेगारी जगताकडे ओढला गेला. आधी सिगरेटची अवैध विक्रीपासून सुरुवात केलेल्या एस्कोबारने अल्पावधीतच खंडणी उकळण्यासाठी लोकांची अपहरण करू लागला आणि या सगळ्याचा पुढचा टप्पा म्हणून तो ड्रग्जच्या तस्करीत उतरला.

ड्रगच्या तस्करीसाठी मेडेलीनच्या एका ड्रग्ज माफियाला तो भेटला आणि या  भेटीतच त्याने त्याची हत्या केली. या हत्येने एकंच खळबळ उडाली आणि कोलंबियाच्या ड्रग्जच्या जगतात त्याची दहशत निर्माण झाली. कोलंबियातील ड्रग्जचा व्यापारावर त्याने आपलं वर्चस्व निर्माण केलं आणि सत्तरच्या दशकात तो ‘किंग ऑफ कोकेन’ म्हणून ओळखला जाऊ लागला.

एवढा पैसा जमा व्हायला लागला की तो ठेवायचा कुठे हाच प्रश्न निर्माण झाला !

ड्रग्जच्या व्यापारातून एस्कोबारवर पैशाचा पाऊस पडायला सुरुवात झाली. एस्कोबारचा भाऊ रॉबर्ट एस्कोबारने ‘द अकाऊंटेंटस स्टोरी’ नावाच्या पुस्तकात लिहिलंय की,

“मेडेलिन कार्टेलमध्ये प्रत्येक दिवशी १५ टन कोकेनची तस्करी करण्यात येत असे. यातून येणारे पैसे नेमके ठेवायचे कुठे हाच प्रश्न होता. पाब्लोची लोक हा पैसा जमिनीत गाडून ठेवत असत. त्यापलीकडे रूममध्ये जो पैसा शिल्लक असे, त्यातल्या १० टक्के नोटा तर उंदरं कुरतडून टाकत असत”

ऐंशीच्या दशकाच्या शेवटपर्यंत एस्कोबार कोकेनच्या तस्करीतील अनभिषिक्त सम्राट बनला होता. पैसा तर इतका आला होता की १९८९ साली फोर्ब्स मासिकाने जगभरातील श्रीमंतांची जी यादी प्रकशित केली होती, त्यात एस्कोबार सातव्या स्थानी होता.

त्याच्या श्रीमंतीचा एक किस्सा असाही सांगितला जातो की एकावेळी थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी इतर कुठलाही उपाय न सुचल्याने उब निर्माण करण्यासाठी एस्कोबारने १३ कोटी रुपयांच्या नोटा जाळल्या होता. हा किस्सा किती खरा नी किती खोटा देव जाणो !

एस्कोबारने हा पैसा फुटबॉलमध्ये लावला !

फुटबॉलमध्ये एस्कोबारला पूर्वीपासूनच रुची होती. आता आपल्या याच आवडीतून त्याने ड्रग्जच्या व्यापारातून आलेला पैसा फुटबॉलमध्ये लावायचा निर्णय घेतला. या निर्णयामागे त्याची फुटबॉलची आवड देखील होती आणि हे काळा पैसा पांढरा करण्याचं मध्यम देखील होतं.

एस्कोबारने अनेक झोपडपट्यामध्ये फुटबॉलची मैदानं तयार केली. फुटबॉल खेळणाऱ्या गोरगरीब पोरांना फुटबॉल कीट वाटल्या. कोलंबियामध्ये फुटबॉलच्या अनेक स्पर्धा भरविल्या. या स्पर्धांमध्ये बक्षिसांची मोठमोठी रक्कम ठेऊन फुटबॉल खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं.

एस्कोबारने भरवलेल्या यासारख्या स्पर्धांमधून आणि तयार केलेल्या झोपडपट्टीतील फुटबॉलच्या मैदानातून कोलंबियासाठी अलेक्सिस गार्सिया, रेने हिगुईता यांसारखे आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू निर्माण झाले.

नार्को फुटबॉलचा जन्म आणि फुटबॉलचे गुन्हेगारीकरण

एस्कोबारने आपला पैसा क्लब फुटबॉलमध्ये देखील लावला होता. ‘एटलिटीको नॅशनल’ या अतिशय नामांकित  फुटबॉल क्लबमध्ये त्याने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. यामुळेच कोलंबियाच्या ड्रग्ज जगतातील दुसरा एक माफिया रोड्रिग्जने देखील फुटबॉलमध्ये आपला पैसा गुंतवला. त्यातूनच कोलंबियात नार्को फुटबॉलचा जन्म झाला.

नार्कोटिक्स पदार्थांच्या तस्करीतून आलेला पैसा लागलेला असल्याने या फुटबॉलला ‘नार्को फुटबॉल’ असं म्हंटलं जाऊ लागलं.

ड्रग्ज माफियांच्या फुटबॉल क्षेत्रामधील वावराने फुटबॉलमध्ये पैसा तर आला पण सोबतच या क्षेत्रातील गुन्हेगारीच्या घटना देखील वाढल्या. चुकीचे निर्णय दिल्यामुळे किंवा आपल्या संघाविरोधात निर्णय दिल्याने अनेक मॅच रेफ्रींच्या हत्या घडवून आणण्यात आल्या.

पुढे पाब्लो एस्कोबारच्या मृत्युनंतर तर बेफाम झालेल्या ड्रग्ज माफियांनी १९९४ सालच्या विश्वचषकाच्या अमेरिकेविरुद्धच्या लढतीत ‘सेल्फ गोल’ केलेल्या कोलंबियाच्या स्टार खेळाडू आंद्रेस एस्कोबार याची देखील हत्या केली. या घटनेने कोलंबियाच्या फुटबॉल जगताचे अपरिमित नुकसान झाले.

एस्कोबारच्या बोलवण्यावरून मॅरेडोना गेला होता जेलमध्ये फुटबॉल खेळायला

१९८९ साली पाब्लो एस्कोबारने लिबरल पार्टीच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची हत्या घडवून आणली होती. या प्रकरणानंतर सरकारशी थेट संघर्ष उडाल्याने एस्कोबारने एका करारांतर्गत स्वतःला जेलमध्ये बंद करून घेतलं होतं.

एस्कोबार जरी जेलमध्ये असला तरी ते नावालाच जेल होतं. या जेलमध्ये सर्व अत्याधुनिक सुविधा होत्या. फुटबॉलचं मैदान देखील होतं. जिथे कोलंबियाचे अनेक खेळाडू फुटबॉल खेळायला येत असत.

१९९१ साली एस्कोबारने आर्जेन्टिनाचे स्टार फुटबॉलर दिएगो मॅराडोना यांना जेलमध्ये फुटबॉलची मैत्रीपूर्ण लढत खेळायला बोलावलं होतं. एस्कोबारच्या आमंत्रणाचा स्वीकार करत मॅराडोना त्याला भेटायला गेले होते. खुद्द मॅराडोना यांनीच एका मुलाखतीत या भेटीविषयी सांगितलं होतं. ही मॅच खेळण्यासाठी मॅराडोनाला तगडी रक्कम मिळाली होती.

१९९३ साली पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याच्या प्रयत्नात एस्कोबार मारला गेला. १९९४ सालच्या फुटबॉल विश्वचषकानंतर ड्रग्ज माफियांनी हत्या घडवलेला  कोलंबियाचा स्टार फुटबॉलर आंद्रेस एस्कोबार आणि पाब्लो एस्कोबार यांच्यावर बनविण्यात आलेल्या डॉक्युमेंटरीमध्ये पाब्लो एस्कोबारची बहिण मारिया हिने म्हंटलय,

“जवळ पैसा आल्यानंतर पाब्लोने जे पहिले शूज खरेदी केले होते, ते फुटबॉल शूज होते आणि ज्यावेळी तो मारला गेला त्यावेळी देखील त्याच्या पायात फुटबॉल शूज होते”

ड्रग्ज माफियांच्या पैशाने कोलंबियाच्या फुटबॉलला उभारी मिळाली पण याच ड्रग्ज माफियांनी आंद्रेस एस्कोबारची हत्या घडवून कोलंबियाच्या फुटबॉलचं वाटोळ केलं हे देखील तितकंच खरं.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.