फिरोझ खानचा डॉयलॉग ऐकून मुशर्रफ म्हणाले ,”परत पाकिस्तानात यायचं नाही”

भारताच्या फिल्मइंडस्ट्रीचा सर्वात स्टाईलिश हिरो. त्याचा वॉक,  त्याची उभी राहण्याची पद्धत, त्याचा ड्रेसिंग सेन्स, त्याची स्माईल, डायलॉग डिलिव्हरी, ॲक्शन सगळ स्टाईलिश होतं. त्याच्या भोवती अप्सरांचा गराडा असायचा, घोड्यावर बसलेला तोंडात सिगार, डोक्यावर हॅट, अशा रांगड्या वेशातल्या काऊबॉय फिरोज खानचा अंदाज बघितल्यावर वाटायचं की गडी हॉलीवूड मधून थेट बॉलीवूड मध्ये अवतरलाय.

त्याच्या ॲक्टिंग करीयरची सुरवात सुद्धा एका हॉलीवूड सिनेमातून “टारझन”मधून झाली होती. तो खरोखर परदेशातून आलेला. अमेरिकेतून नाही, अफगाणिस्तान मधून.

त्याची आई इराणी होती तर वडील अफगाणिस्तानचे पठान. गझनीचा मोहम्मद जिथून आला होता त्या गझनी शहराचे हे रहिवासी. फिरोजचा जन्म मात्र भारतातला. लहानाचा मोठा बेंगलोरमध्ये झाला. त्याच्या घरच्यांनी देखील स्वातंत्र्यानंतर फाळणी नंतर देश सोडला नाही. फिरोज आणि त्याचे चारपाच लहान भाऊ सगळे भारतातच वाढले. पुढे सगळे सिनेमात आले.

फिरोजला आपल्या पूर्वजांच्या गावाचं म्हणजे अफगाणिस्तानचं आकर्षण होतं. त्याच्या एका सिनेमाच म्हणजेच धर्मात्माचं शुटींग त्यान तिकडे केलं होतं. त्याचे कुर्बानी, यल्गार, जांबाझ, दयावान असे अनेक सिनेमे गाजले.

पुढे काही वर्षांनी तो रिटायर झाला. सिनेमात काम करायचं कमी केलं. फिरोज खानचं यश त्याच्या भावांना, त्याच्या मुलाला रिपीट करायला जमलं नाही. एकदा त्याच्या एका धाकट्या भावाने अकबर खानने ताजमहाल सिनेमा बनवला होता. झुल्फी सय्यद, सोनया जहान अशा नवख्या कलाकारांना घेऊन बनवलेला हा पिक्चर दोन आठवडे देखील टिकला नाही.

आग्र्याच्या ताजमहलचं पाकिस्तानमध्ये खूप आकर्षण आहे. अकबर खानला वाटलं की याचा वापर आपल्या सिनेमासाठी करून घेता येईल. ताजमहल पाकिस्तानमध्ये रिलीज करायचा. मुमताजमहल झालेली मेन हिरोईनसुद्धा पाकिसात्नीच होती. बघू थोडेफार पैसे परत आले तरी खूप झालं. त्याने त्या पद्धतीने प्रयत्न केले.

साल होतं २००६. भारत-पाकिस्तान मैत्रीचे वारे सुरु होते. याच लाटेत अकबर खानची नय्या सुद्धा पार पडली. त्याला ताजमहाल पाकिस्तानात रिलीज करायची संधी मिळाली. अकबर खानने सगळी तयारी केली. तिकडे सिनेमाच्या प्रमोशन साठी थोरल्या भावाला फिरोज खानला न्यायचं त्यान ठरवलं.

फिरोज खानची पाकिस्तानातही हवा होती. त्याला बघायला गर्दी होणार हे अकबर खानाला ठाऊक होतं. तसचं घडलं. फिरोज खान जिथे जिथे गेला तिथे तिथे त्याच जंगी स्वागत करण्यात आलं.

पाकिस्तानची सांस्कृतिक राजधानी लाहोरमध्ये फिरोज खानच्या स्वागतासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तिथे बोलत असताना कुठल्या तरी रिपोर्टरने फिरोज खानला फाळणीनंतरही भारतात राहण्यावरून छेडल. म्हातार भडकल. त्याच्याच एका सिनेमातला डायलॉग आहे ना,

“बुढा हुआ तो क्या हुआ शेर तो शेर होता है.”

फिरोज खानचा आरडीएक्स फुटला. त्याने आपल्या स्टाईलिश इंग्लिश मध्ये त्या पत्रकाराला उभा आडवा सोलला. सगळ वातावरण तंग झालं. पण ऐकेल तो फिरोज खान कसला? त्याने एक छोटसं भाषणचं तिथल्या प्रेक्षकांना दिल,

“‘भारत एक धर्मनिरपेक्ष देश है। हमारे यहां मुसलमान आगे बढ़ रहे हैं, तरक्की कर रहे हैं। हमारे राष्ट्रपति मुस्लिम हैं। प्रधानमंत्री सिख हैं। पाकिस्तान इस्लाम के नाम पर बना था लेेकिन आज हालात देखिए लोग एक दूसरे को मार रहे हैं।’

त्यावेळी खरोखर भारताचे राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम तर प्रधानमन्त्री डॉ.मनमोहन सिंग असे दोन अल्पसंख्यांक समुदायातून आलेले पण विद्वान व्यक्ती होते. फिरोज खानची डायलॉग बाजी ऐकून तिथ जमलेल्या प्रेक्षकांचा तिळपापड तर झालाच पण सगळ्यात जास्त आग लागली पाकिस्तानच्या लष्करशहा असणाऱ्या परवेज मुशर्रफ याना.

फिरोज खानचा बाण वर्मी लागला होता. वरून भारत मैत्रीच सोंग आणणाऱ्या मुशर्रफ साहेबाना फिरोज खानचं बोलण जराही सहन झालं नाही. फिरोज मिया पाकिस्तान हलवून भारतात परतले. काही दिवसांनी मुशर्रफनी फर्मान काढलं की फिरोज खानला परत पाकिस्तानमध्ये प्रवेश द्यायचा नाही.

१८ मे २००६ च्या प्रत्येक वर्तमानपत्रात दिल्लीच्या पाकिस्तानी राजदूताने फिरोज खानला बंदी घातली आहे हे बातमी छापून आणली.

अकबर खानने फिरोजला तसं म्हणायचं नव्हत. त्याची जीभ घसरली वगैरे सारवावारव केली. पण बेदरकार फिरोज खानने तसं काही केलं नाही. त्याला काही फरक पडणार नव्हता. परत कोणी विचारलं असत तर त्यानं तिरक उभ राहून ग्रेगरी पॅकच्या स्टाईलमध्ये तेच डायलॉग परत सुनावले असते आणि वर मुशर्रफला म्हणाला देखील असता,

“तुम्हारी सोच जहा खतम होती है, हमारा राज वहा शुरू होता है.”

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.