पराभवानं खचलेल्या कार्यकर्त्यांना गोपीनाथ मुंडे यांनी सांगितलं होतं, रडायचं नाही लढायचं…

सध्या देशातल्या पाच राज्यांमध्ये निवडणुकांचं वार वाहतंय. गोवा, मणिपूर, उत्तराखंड, उत्तरप्रदेश आणि पंजाब ही ती पाच राज्य. या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश नसला, तरी महाराष्ट्रातले नेते या निवडणुकांमध्ये आपला प्रभाव पाडू शकतात.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी मणिपूर, गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढणार असल्याचं सांगितलं. शरद पवार स्वतः उत्तर प्रदेशमध्ये जाऊन प्रचार करणार आहेत. दुसऱ्या बाजूला शिवसेनाही उत्तर प्रदेशमध्ये ५० ते १०० जागा लढवणार आहे. खासदार संजय राऊत तिथं प्रचारासाठी जाणार आहेत. सोबतच गोव्यात भाजपचे प्रभारी म्हणून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काम पाहत आहेत. साहजिकच महाराष्ट्राच्या नेत्यांच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे.

फक्त राज्यातच नाही तर देशात कुठंही मोठ्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असली, की एका नेत्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. ते म्हणजे लोकनेते गोपीनाथ मुंडे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, राज्याच्या आणि देशातल्या राजकारणातलं मोठं नाव म्हणजे गोपीनाथ मुंडे. अगदी तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी असलेले संबंध, सामान्य माणसांमध्ये असलेली प्रचंड लोकप्रियता आणि गल्ली ते दिली राजकारणावर असलेली पकड, या गोष्टींमुळे मुंडेंचा मोठा दबदबा होता.

राज्यात पार पडलेल्या २००९ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं कंबर कसली होती. त्यांना विजय मिळेल अशी पूर्ण शक्यता वाटत होती. एक्झिट पोलच्या अंदाजांनुसार सेना आणि भाजपच्या युतीला जवळपास दीडशेच्या घरात जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र घडलं वेगळंच.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीनं १४४ जागांवर वीज मिळवला, तर शिवसेना आणि भाजपच्या युतीला ९१ जागांवर समाधान मानावं लागलं. भाजपनं ११९ जागा लढवल्या, मात्र त्यांना फक्त ४६ जागांवरच यश मिळालं. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरली होती, ज्या विषयाची त्यांना आस होती तिथं पदरी पराभव पडला होता. सगळ्यांना वाटत होतं की हा निकाल ‘अनाकलनीय’ आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यालयात भाजपचे कार्यकर्ते जमले होते. कार्यालयात सन्नाटा पसरला होता. त्याचवेळी तिथं आले गोपीनाथ मुंडे. मुंडे साहेबांची प्रतिक्रिया काय असणार, ते चिडणार का, याकडे सगळ्या कार्यकर्त्यांचं लक्ष होतं. 

मुंडे शांतपणे कार्यालयात आले, त्यांच्या चेहऱ्यावर दुःख, टेन्शन असं काहीही नव्हतं. उलट त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं की, “पराभावामुळं खचून जाऊ नका. आपण पुन्हा उमेदीने कामाला सुरुवात करु. आता रडायचं नाही… आता लढायचं!”

त्यांच्या या कानमंत्राचा प्रभाव आगामी निवडणुकांमध्ये दिसला, भारतीय जनता पक्षानं २०१४ मध्ये फक्त राज्यातच नाही, तर केंद्रातही बाजी मारली. त्यांचा हा कानमंत्र प्रचंड प्रभावी ठरला. दुर्दैवानं भाजप सत्तेत आल्यानंतर काही महिन्यांतच मुंडे यांचं अपघाती निधन झालं. पण त्यांनी दिलेला कानमंत्र आजही भाजप कार्यकर्त्यांच्या मनात पक्का आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.