मोहम्मद रफीला मक्केत अजान देता यावी म्हणून हज कमिटीनं आपला निर्णय बदलला होता…

भारतीय चित्रपट सृष्टीतील ‘खुदा का नेक बंदा’ म्हणजे मोहम्मद रफी! मोहम्मद रफी बाबत सिनेमाच्या दुनियेत आजही अतिशय आदराने, सन्मानानेच बोलले जाते. संगीत म्हणजे ‘खुदा की इबादत’ असते असं ते म्हणत. अनेक छोट्या संगीतकारांकडे अक्षरशः एक पैसाही न घेता त्यांनी गाणी गायली. अनेकांवर त्यांचे अनंत उपकार आहेत, त्यांच्यामुळे कित्येक संगीतकार आपल्या पायावर उभे राहिले. सिनेमातील संगीतकारांना ते मसीहा वाटत.

ते सच्चे मुस्लिम होते. एकदा रमजानच्या महिन्यामध्ये त्यांच्याकडे एक गीत गाण्याचा प्रस्ताव आला. परंतु त्यांनी तो नम्रपणे नाकारला. याचे कारण त्या गाण्यात हुक्का सेवनाचा उल्लेख होता आणि इस्लाममध्ये हुक्का, दारू, नशा पानी हराम आहे. त्यामुळे त्यांनी या पवित्र महिन्यात हे गीत गायला नकार दिला.

चित्रपट होता सी रामचंद्र यांचा ‘संगीता’. पुढे हे गीत चितळकर यांच्या सोबत स्नेहल भाटकर यांनी गायले. गीताचे गोल होते ‘जैसे हुक्के की धुये मे धुआ.’ आता तुम्ही म्हणाल रफीनं कितीतरी शराबीची गाणी गायलीतच ना? 

जसे मुझे दुनियावालो शराबी न समझो… पण ही गाणी त्यांनी रमझानच्या महिन्यात नाही गायली. त्यांचे काही उसूल होते व त्यावर ते कायम असत.

१९६९ साली रफी यांनी पवित्र मक्का मदीनाची यात्रा केली होती. प्रत्येक मुस्लिमाची आंतरिक इच्छा असते की, त्याने आयुष्यात एकदा तरी मक्का मदिना येथे जाऊन यावे. या दौऱ्यात त्यांच्यासोबत पाकिस्तानी गायक मसूद राणा हे देखील होते. मसुद राणाला पाकिस्तानी रफी म्हणत असत.

मक्का मदिनाला गेल्यानंतर रफीच्या धार्मिक सश्रध्द मनात एक सहज इच्छा आली तिथे पवित्र मशिदीतून सकाळची ‘अजान’ जर आपल्याला देता आली तर? आयुष्यातील मोठी ‘तमन्ना’ पूर्ण होईल.

परंतु तिथे मक्का कमिटीचा निर्णय असा होता की, बाहेरील कुठल्याही व्यक्तीला ‘अजान’ देण्याचा अधिकार नाही.

त्या नियमाप्रमाणे कमिटीने रफीला नकार दिला. परंतु रफीने पुन्हा एकदा त्यांना केवळ एकदाच मला येथे ‘अजान’ देण्याची परवानगी द्या, अशी कळकळीची विनंती केली. रफीच्या भावना सच्च्या होत्या. त्याची मनातून प्रामाणिक इच्छा होती.

रफीच्या विनंतीला मान देऊन हज कमिटीने एक मीटिंग घेतली. त्यात हा विषय त्यांनी चर्चेला घेतला आणि गेली अनेक वर्ष कायम असलेला नियम त्यांनी रफी साठी मोडला! 

महंमद रफीला ‘अजान’ देण्याची परवानगी दिली. रफीसाठी हा अत्यंत आनंदाचा प्रसंग होता. पवित्र मक्याच्या मशिदीमध्ये त्यांना सकाळची ‘अजान’ देता येणार होती. त्या रात्री रफी झोपू शकले नाहीत. पहाटे उठून ते मशिदीमध्ये गेले आणि त्यांच्या पहाडी आणि सुरील्या ‘अजान’ने सारी मक्का सुखावून गेली. रफी खूप आनंदात होते.

त्यानंतर हज कमिटीने आणखी एक निर्णय घेतला. त्यांना देखील रफीची ‘अजान’ खूपच आवडली होती. कमिटीने रफीला सांगितले ,”आपण जोवर मक्का मदिनामध्ये आहात तोवर रोज सकाळी आपण ‘अजान’ देऊ शकता.”

रफीच्या सोबत मक्केला गेलेले मसूद राणा यांनी रफीची ती ‘अजान’ ध्वनिमुद्रित करून ठेवली होती. ही रेकॉर्ड केलेली टेप मसूद राणा यांनी आपल्या मृत्यूपर्यंत (१९९५ सालापर्यंत) त्यांच्याकडे ठेवली होती. पण नंतर मात्र ती गहाळ झाली. इंटरनेटवर ही ‘अजान’ शोधायचा मी खूप प्रयत्न केला तरी मिळत नाही!

या निमित्ताने एक आणखी गोष्ट सांगावीशी वाटते.

१९५२ साली रफीने ‘बैजू बावरा’ या चित्रपटातील गाणी गायलेली होती. या चित्रपटाची गाणी लिहिली होती शकील बदायुनी यांनी, याला संगीत नौशाद अली यांचं होतं आणि गायली होती रफी यांनी!

गीत होते ‘मन तडपत हरिदर्शन को आज’ या गीताचे गायक, गीतकार आणि संगीतकार हे तिघे ही मुस्लिम असून एक अतिशय उत्तम असं हिंदूंसाठीचं अप्रतिम भजन तयार झालं होतं.

पुढे कित्येक वर्ष काशी विश्वेश्वराच्या मंदिरात रफीचे हे गाणे सकाळी हमखास वाजवत असे! काशी विश्वेश्वराला जाग रफीच्या या गीताने येत असे!

  • भिडू धनंजय कुलकर्णी

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.