पिक्चर फ्लॉप गेला, पण ‘काईट्स’मुळं हृतिकचं आपल्या आयडॉलला भेटायचं स्वप्न पूर्ण झालं…

व्यक्ती कुणीही असो सर्व सामान्य किंवा असामान्य, त्यांना नेहमी आपल्या आदर्श वाटणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला भेटावं वाटतं. ते त्याचं स्वप्न असतं. कारण एकलव्याप्रमाणे त्या आदर्श व्यक्तिमत्वाकडून तो शिकत असतो. त्याला कळत नकळतपणे फॉलो करत असतो. प्रत्येकाचे आयडॉल हे वेगवेगळे असतात. क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सचिन तेंडुलकर व्हावं वाटतं, त्याला भेटावं वाटतं. 

कलाक्षेत्रातील व्यक्तींना अमिताभ बच्चन, दिलीप कुमार यांच्यासारखा व्हावं वाटतं तर गाणाऱ्या प्रत्येकाच्या मनात आपण लता, किशोर, भीमसेनजी यांच्यासारखं गावं असं वाटत असतं! थोडक्यात प्रत्येक जण हा कुणाला तरी कॉपी करत पुढे जात असतो. अभिनेता रितिक रोशन लहानपणापासून हॉलिवूडच्या एका कलावंताला आदर्श मानून मनोमन त्याची पूजा करत आपली वाटचाल करत होता

रितिकला लहानपणापासून नृत्याची  खूप आवड होती आणि त्याचा आयडॉल, आदर्श व्यक्ती म्हणजे डान्सिंग स्टार, ग्रेट डान्स परफॉर्मर होता. या डान्सिंग स्टारला आयुष्यात कधीतरी भेटता यावे यासाठी तो प्रार्थना करीत असे.

स्वप्न होते आपल्या पूज्यनीय व्यक्तीला भेटायचे पण अवघड होते. कारण हा त्याचा आयडॉल जगभर प्रचंड प्रसिद्ध होता. त्याच्या सेकंदा सेकंदासाठी अपॉइंटमेंट ठरलेल्या असायच्या.

रितिक ‘कहो ना प्यार है’ या सिनेमा पासून मुख्य नायक म्हणून पडद्यावर आला. यातील त्याचा डान्स आणि डान्सिंग स्टाईल यावर युवा पिढी जाम खुश झाली होती. पहिल्याच सिनेमानं रितिक रोशन तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला. रितिक मॅनिया या सिनेमापासून सुरू झाला. या सिनेमाला तब्बल ९२ पारितोषिके मिळाल्यामुळे याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली होती.

पण रितिकची आपल्या आयडॉलला भेटायची कामना अनपेक्षितपणे पूर्ण झाली त्याचाच हा किस्सा. 

२००८ साली रितिक रोशन आपल्या एका सिनेमाच्या चित्रीकरणासाठी अमेरिकेत न्यूयॉर्कला गेला होता चित्रपटाचं नाव होतं ‘काईट्स’. यात त्याची नायिका बार्बरा मोरी ही होती. चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश रोशन यांचे होते. या सिनेमाचे शूटिंग जिथे चालू होते तिथेच अमेरिकेतल्या आणखी एका शोचे चित्रीकरण होणार होते.

ज्यावेळी या शो बाबत रितिक रोशन ला कळालं त्याच्या मनात आनंदाची वीज चमकून गेली. कारण हा शो दुसऱ्या तिसऱ्या कुणाचा नसून त्याच्या आवडत्या डान्सिंग स्टारचा होता. 

ण इतक्या मोठ्या कलाकाराला भेटायचे कसे हे दडपण मनावर होतच तरी तो त्याच्या दृष्टीने प्रयत्न करत होता. 

या डान्सिंग स्टार भोवती सुरक्षेचे मोठे कवच होते. रितिक त्याच्या भेटीसाठी तळमळत होता. पण अनपेक्षित पणे त्याच्या नशिबात भेटीचा योग आला. कसे कुणास ठावूक पण त्या डान्सिंग स्टारला कळाले इथे बॉलीवूडचा सुपरस्टार शूटिंग करत आहे.

एकदा सकाळी शूटिंगला जाण्यापूर्वी रितिक रोशन आपल्या व्हॅनिटी कार मध्ये बसला होता. तितक्यात त्याच्या व्हॅनिटी कारमध्ये तीन चार बाऊन्सर्स आले. त्याला काही कळालेच नाही. त्याच्या पाठोपाठ एक व्यक्तिमत्व त्याच्या व्हॅनिटी कार मध्ये अवतरले!

रितिक रोशन यांच्या डोळ्यावरचा विश्वासच बसेना. आपण  स्वप्नात तर नाही ना असा त्याला भास झाला.

त्या व्यक्तीने  समोरून त्याने रितिक  रोशनशी  हस्तांदोलन केले. आणि आणि  ती व्यक्ती म्हणाली, “हाय आय एम मायकल जॅक्सन ग्लॅड टू मीट यू….!” 

लहानपणापासून ज्या सुपरस्टारला भेटण्यासाठी रितिक तळमळत होता तो सुपरस्टार त्याच्यासमोर उभारून त्याच्याशी शेक हॅन्ड करत होता. रितिक कम्प्लीट ब्लॅन्क झाला. त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. सारच चमत्कारिक आणि अगम्य होतं. मायकल जॅक्सन पुढे म्हणाला ,”मला असं कळालं आहे की इंडियातील बॉलीवूडचा तू सुपरस्टार आहेस.  तुला भेटून खूप आनंद झाला!” 

आता थक्क होण्याची पाळी रितिक रोशनची होती. त्याच्या डोळ्यात पाणी आले. मायकल जॅक्सनने  त्याला जवळ घेतले. रितिकची  वर्षानुवर्षाची तमन्ना त्यादिवशी पूर्ण झाली. फोटो सेशन झाले. गप्पा झाल्या. 

त्या संस्मरणीय क्षणाचा दोघांचा फोटो रितिकने आपल्या ड्रॉइंग रूम मध्ये आणि ऑफिसमध्ये दर्शनी भागात लावला आहे.

‘काईट्स’ सिनेमा सुपर फ्लॉप झाला पण या सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान मायकल जॅक्सनची झालेली भेट रितिक करीता ‘सुपर हिट’ ठरली!

  • भिडू धनंजय कुलकर्णी

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.