जेव्हा इंदिरा गांधींनी ‘प्रधान मंकी’ व्हायची तयारी दाखवली…!!!

देशाच्या पंतप्रधानांची चर्चा जेव्हा कधी होते, त्या प्रत्येक वेळी इंदिरा गांधींचं नांव एक कणखर पंतप्रधान म्हणून घेतलं जातं. आपल्या पंतप्रधान पदाच्या सुरुवातीच्या काळातला  ‘गुंगी गुडिया’ पासून सुरु झालेला इंदिरा गांधींचा दुर्गावतारापर्यंतचा प्रवास आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. पण त्या पलीकडे जाऊन इंदिरा गांधींचा हजरजबाबीपणा आणि त्यांची तल्लख विनोदबुद्धी यांचेही अनेक किस्से आहेत. विनोदाला ‘विनोदी’ पद्धतीने दाद देण्याची खिलाडूवृत्ती त्यांच्याकडे कायमच होती. तर हा असाच एक किस्सा. इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान असताना त्यांचे वैद्यकीय सल्लागार म्हणून काम केलेल्या डॉ. के. पी. माथुर यांनी सांगितलेला.

इंदिरा गांधीना भारतीय सैन्याविषयी  खूपच आदर आणि तितकीच कळकळ होती. त्यामुळे आपल्या व्यस्त दिनक्रमातून, वेळातला वेळ काढून जेव्हा कधी शक्य असेल तेव्हा त्या लष्करी छावण्यांना भेट देत असत. एकदा इंदिरा गांधी अशाच हिमाचल प्रदेशातील लष्करी छावणीला भेट द्यायला गेल्या होता. सोबत त्यांचा लवाजमा होताच. छावणीला भेट दिल्यानंतर इंदिराजींनी जवळच असलेल्या लष्करी अधिकाऱ्यांच्या मेसमध्ये त्यांच्या सोबतच जेवण केलं. इंदिराजींची एक खासियत अशी की त्या जिथे कुठे जात तेथील लोकांमध्ये मिसळत. त्यांच्याशी संवाद साधत आणि त्यांना नेमक्या काय अडचणी आहेत हे त्यांच्याकडूनच जाणून घेत.

indira gandhi 1

जेवण झाल्यानंतर इंदिराजींनी आधी एक अनौपचारिक भाषण दिलं आणि नंतर सवयीप्रमाणे लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा करायला सुरुवात केली. अधिकाऱ्यांना जर आपल्याला काही सांगायचं असेल तर ते त्यांनी निःसंकोचपणे सांगावं, अशी सूचना त्यांनी केली. मग काय अधिकाऱ्यांसाठी ही संधीच होती. प्रत्येक जणाला काहीतरी सांगून पंतप्रधान इंदिरा गांधींना प्रभावित करायचं होतं. प्रत्येकजण आपले गाऱ्हाणे इंदिराजींसमोर मांडू लागला. एक अधिकारी होते, ज्यांना ही अशा प्रकारची संधी बहुधा प्रथमच मिळाली असावी. त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि इतर कुणाला बोलण्याची संधीच देईनात.

आपली कैफियत मांडताना त्यांनी इंदिराजींना चक्क माकडांची गोष्ट सांगितली. आता पंतप्रधानांना कुणी माकडाची गोष्ट सांगतं का, पण यांनी सांगितली. त्या परिसरातील माकडांनी सैन्याला कसा त्रास द्यायला सुरुवात केली होती आणि लष्कराच्या ताब्यातील प्रदेशात प्रवेश करण्याची देखील त्यांना कशी भीती राहिली नव्हती याबाबतीतली इत्यंभूत माहिती त्यांनी इंदिराजींच्या कानावर घातली. ते इतके फॉर्मात बोलत होते की बोलता बोलता ते म्हणाले, “बहुधा एखादे थोराड व हुशार माकड पुढे येई आणि इतर त्याचे अनुकरण करत.” त्या हुशार आणि थोराड माकडासाठी त्यांनी ‘प्रधान मंकी’ असा शब्द वापरला आणि पुढे म्हणाले की, प्रधान मंकीने उडी मारली की, इतरही तशीच उडी मारत

आपण नेमकं काय बोलतोय याचं आणि पुढे देशाच्या प्रधानमंत्री बसलेल्या आहेत याचं देखील त्यांना कसलंच भान राहिलेलं नव्हतं. शेवटी कसबसं त्यांना थांबवण्यात आलं. या प्रसंगी तिथे उपस्थित असलेल्या आजूबाजूच्या लोकांना हसू आवरता येत नव्हतं आणि समोर प्रधानमंत्री असल्याने हसायला येत नव्हतं, अशी त्यांची अडचण झाली होती. प्रचंड हजरजबाबी आणि चाणाक्ष असलेल्या इंदिराजींच्या ही बाब लक्षात आली नसती तर नवलंच. शेवटी त्यांनीच ही कोंडी फोडली आणि त्या म्हणाल्या की तुम्ही सर्व जण जर ‘मंकी’ असाल तर माझी ‘प्रधान मंकी’ व्हायला काहीही हरकत नाही इंदिराजींची प्रतिक्रिया आली आणि एकच हशा पिकला.

Leave A Reply

Your email address will not be published.