दालमियांनी चक्क रिटायर झालेल्या सचिनला विचारलेलं, तू कोणत्या क्लबकडून खेळतोस?

भारतात क्रिकेट म्हणजे लोकांचा धर्म, येड लागण्याची गोष्ट. पण देशात क्रिकेट काय एका रात्रीत लोकप्रिय झालं नाही. त्याच्यामागं बराच वेळ, मेहनत, राजकारण आणि डोकॅलिटी आहे. भारतीय क्रिकेटची दुनिया बदलून टाकण्यात, दोन माणसांचा लई मोठा रोल आहे. एक म्हणजे सचिन तेंडुलकर. लहान वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सचिनच्या बॅटिंगवर लई जणांनी जीव ओवाळून टाकला. मोठमोठ्या बॉलर्सला किरकोळीत हाणणारा सचिन लोकांच्या गळ्यातला ताईत बनला.

गावसकर, कपिल, सचिन यांनी मैदान गाजवत भारतीय संघाला ओळख मिळवून दिली. पण प्रशासकीय पातळीवर भारतीय क्रिकेटचं वजन तयार करण्याचं आणि भारताला बिग बॉस बनवायचं काम केलं ते, जगमोहन दालमिया यांनी.

प्रशासन गाजवायच्या आधी जगमोहन दालमिया चांगले क्रिकेटरही होते. त्यांनी पश्चिम बंगालकडून विकेटकीपर आणि ओपनर म्हणून खेळताना आपली छाप पाडली होती. मोठा क्रिकेटर बनायचं आणि सगळ्या जगाला आपली ओळख करुन द्यायची, ही स्वप्नं दालमियांनी फिक्स पाहिली असणार. त्यांच्या वडिलांचं अकाली निधन झाल्यामुळं पहिलं स्वप्न अपूर्णच राहिलं. मात्र दुसरं स्वप्न त्यांनी पूर्ण केलंच, सगळ्या जगाला दालमियांचं, त्यांच्या प्रचंड इच्छाशक्तीचं दर्शन झालं… आणि त्यामागचं कारण होतं क्रिकेट.

खेळायचं वय उलटून गेल्यावरही दालमियांना त्यांचं क्रिकेट वेड स्वस्थ बसू देत नव्हतं. त्यांनी बंगाल क्रिकेट असोसिएशनमध्ये प्रवेश करत, क्रिकेट प्रशासनाची सूत्रं हाती घेण्याची सुरुवात केली. १९८७ मध्ये भारतात आयोजित झालेल्या वर्ल्डकपला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली. पण १९९६ मध्ये पुन्हा एकदा भारतानं यजमानपद भूषवलं आणि यावेळी प्रसिद्धी सोबतच पैसाही आला. ज्यामागचं कारण होतं, बीसीसीआयचे तत्कालीन सेक्रेटरी जगमोहन दालमिया.

पुढच्याच वर्षी आयसीसीच्या अध्यक्षपदाची महत्त्वाची निवडणूक होती. आता सामना मोठा होता, त्यात ऑस्ट्रेलियानं माल्कम ग्रे यांचं नाव पुढे आणलं. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि इंग्लंडनं एशियन देशांविरोधात थेट लॉबी उघडली. भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि झिम्बाब्वे हे देश एका बाजूला पडले. माल्कम ग्रे यांनी लय बुद्धिबळ खेळलं, पण सरतेशेवटी दालमिया यांनी बाजी मारलीच. आपल्या छोट्याश्या कारकिर्दीत त्यांनी जगाच्या क्रिकेटची सूत्रं भारतात आणली.

त्यानंतर दालमिया यांनी बीसीसीआयची सूत्रं सांभाळली, तेव्हा मात्र बीसीसीआयच्या राजकारणानं कळस गाठला होता. दालमिया यांनी २००१ ते २००४ मध्ये बीसीसीआयची कमान सांभाळली. त्यांची टर्म संपताना झालेल्या निवडणुकांमध्ये शरद पवार गटाशी जणू काही त्यांचं युद्धच रंगलं होतं. चलाख राजकारण करुन त्यांनी पवारांना मात दिली. पुढच्याच वर्षी शरद पवार यांनी बीसीसीआयमध्ये कमबॅक केलं आणि थेट आयसीसीपर्यंत धडक मारली. शरद पवार, ललित मोदी आणि त्यानंतर एन. श्रीनिवासन यांच्या काळात दालमिया यांचं नाव काहीसं पडद्याआड गेलं. बीसीसीआयनं गैरव्यवहाराचा ठपका ठेवत त्यांच्याविरुद्ध खटलाही चालवला, मात्र त्यातून ते निर्दोष सुटले.

आयपीएलच्या निमित्तानं भारतीय क्रिकेटचं वैभव पाहून सगळ्या जगाचे डोळे दिपले होते, मात्र या वैभवाचा पाया रचणारे दालमिया या पिक्चरमध्ये कुठंच नव्हते.

पुढं काळाची चित्र पुन्हा एकदा फिरली. २०१३ मध्ये मॅच फिक्सिंगच्या गंभीर आरोपांखाली बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्याभोवती संशयाचं धुकं तयार झालं. ते अध्यक्षपदावरून पायउतार झाले आणि हंगामी अध्यक्ष म्हणून बीसीसीआयमध्ये एंट्री झाली… जगमोहन दालमिया यांची.

तेव्हा दालमियांचं वय होतं, ७१ वर्ष. अंगावरचा कडक सफारी, डोळ्यांना सोनेरी काड्यांचा चष्मा हे त्यांचं रुप कायम होतं. मात्र स्मरणशक्ती काहीशी कमी झाली होती, चालीत डौल आणि रुबाब असणारे दालमिया आता व्हीलचेअरचा आधार घेऊ लागले होते. २०१५ च्या आयपीएल फायनलनंतर बक्षीस समारंभ त्यांच्या हस्ते पार पडलेला. तिथं त्यांना सचिन तेंडुलकर भेटला, तेव्हा सचिन विजेत्या मुंबई इंडियन्स संघाचा मेंटॉर होता.

व्हीलचेअरवरती बसलेले दालमिया सचिनजवळ आले आणि त्यांनी विचारलं, ‘तू कोणत्या क्लबकडून खेळतोस?’

स्मरणशक्ती क्षीण झालेल्या, काहीशी ताकद गमावलेल्या दालमियांच्या हाती, तेव्हाही बीसीसीआयची सूत्रं होती, त्यामागचं कारण होतं, त्यांचा अनुभव, संकटाना संयमानं सामोरं जाण्याची हातोटी आणि प्रशासनावरची मजबूत पकड. २०१५ च्या सप्टेंबर महिन्यात दालमियांनी जगाचा निरोप घेतला… तेव्हाही ते बीसीसीआयचे अध्यक्ष होते. याच सिंहासनावर बसून त्यांनी भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला होता, जे कुठलाच भारतीय चाहता विसरु शकत नाही.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.