जेव्हा मोहम्मद अली जिन्नांनी लोकमान्य टिळक आणि भगतसिंगांचा खटला लढवला होता…!!!

 

अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील वादानंतर मोहम्मद अली जिन्ना, भारत-पाकिस्तान फाळणी, फाळणीतील जीनांची भूमिका हे मुद्दे परत एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलीयेत. जिनांना फाळणीचे खलनायक ठरवून चर्चा-वर्तुळ परत एकदा ‘हिंदू-मुस्लीम’ ध्रुवीकरणात व्यस्त झाल्याचं बघायला मिळतंय. त्यानिमित्ताने जिन्नाच्या व्यक्तिमत्वाची दुसरी एक बाजू आहे ती समजून घेणं महत्वाचं ठरतं…

सध्याचा वाद का निर्माण झाला..?

अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयात मोहम्मद अली जिन्ना यांचा फोटो आहे. इसवी सन १९३८ मध्ये जिन्नाना विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेची आजीव सदस्यता देण्यात आली होती. त्यावेळी विद्यापीठाची तशी परंपरा होती. याच वेळी जिन्नांच्या सन्मानार्थ अलिगढ मुस्लीम विद्यापीठात जीनांचा फोटो लावण्यात आला होता. जिन्ना यांच्या व्यतिरिक्त त्यावेळच्या अनेक प्रभावशाली नेत्यांचे फोटो देखील या विद्यापीठात आहेत. उदा. महात्मा गांधी.

काही दिवसांपूर्वी अलिगढचे भाजप खासदार ‘सतीश गौतम’ यांनी अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र लिहून जिन्ना यांचा फोटो विद्यापीठातून हटवण्यात यावा, असे कळवले. विद्यापीठाकडून असं काहीही करण्यास नकार देण्यात आला. फोटोची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहता तसं करणं योग्य होणार नाही, असं विद्यापीठाकडून कळविण्यात आलं. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विद्यापिठात घुसून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आणि सध्याचा वाद निर्माण झाला. जिन्ना हेच भारताच्या फाळणीस जबाबदार असल्याने, त्यांचा फोटो विद्यापीठात असू नये असं या मंडळींचं म्हणणं आहे.

ALIGARH

या वादामागे अजून एक कारण असं की, भारताचे पूर्व उपराष्ट्रपती ‘हमीद अन्सारी’ यांचा एक कार्यक्रम विद्यापीठात आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम उधळून लावण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी हा गोंधळ घडवून आणल्याचं राजकीय विश्लेषक आणि दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक अपुर्वानंद यांनी ‘द वायर’शी बोलताना सांगितलं. काही वर्षापूर्वी हमीद अन्सारी यांचा ‘जामिया मिल्लीया इस्लामिया’ विद्यापीठातील असाच एक कार्यक्रम उधळून लावण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कट रचला होता, ज्या कटाचा सुगावा ‘हेडलाईन्स टुडे’ या वृत्तवाहिनीला लागल्यानंतर या संदर्भातील टेप या वाहिनीने प्रसारित केली  होती. ही टेप प्रसारित झाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हेडलाईन्स टुडेच्या कार्यालयावर हल्ला केला होता. या प्रकरणात राम माधव यांना माफी देखील मागावी लागली होती.

होय, जिन्नांनी लोकमान्य टिळक आणि भगतसिंगांचा खटला लढवला होता..!!!

मोहम्मद अली जिन्ना, लोकमान्य टिळक आणि भगतसिंग या तीघांचंही राजकीय तत्वज्ञान फार वेगळं होतं. हे तिघेही वेगवेगळ्या राजकीय ध्रुवावर होते, तरी देखील त्यांचं भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदान महत्वाचं होतं. ते कुणालाच नाकारता येत नाही.

१९०८. ब्रिटीश सरकारने लोकमान्य टिळकांची  राजद्रोहाच्या गुन्ह्यात  ६ वर्षासाठी मंडालेच्या तुरुंगात केलेल्या रवानगीची कल्पना तर आपल्या सर्वांनाच आहे. पण आपल्यापैकी फार कमी लोकांना याची कल्पना असेल की या खटल्यात टिळकांचे वकील होते बॅरीस्टर मोहम्मद अली जिन्ना. या प्रकरणात जरी जिन्ना टिळकांना सजा होण्यापासून वाचू शकले नसले, तरी ६ वर्षांचा कारावास भोगून १९१४ साली ज्यावेळी लोकमान्य टिळक परतले, त्यावेळी त्यांनी परत ब्रिटीश सरकार विरोधात आपला आवाज बुलंद केला. सरकार विरोधातील त्यांच्या काही भाषणांवर आक्षेप घेऊन त्यांच्याविरोधात  १९१६ मध्ये परत एकदा राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला. राजद्रोहाच्या खटल्याला सामोरे जाण्याची टिळकांची ही तिसरी वेळ होती. यावेळी देखील टिळकांचा खटला लढवत होते जिन्ना. यावेळी मात्र जिन्नांनी टिळकांना या खटल्यातून सहीसलामत बाहेर काढलं होतं. राजद्रोहाच्या खटल्याला सामोरे जाताना तुरुंगवास न भोगण्याची ही टिळकांची पहिलीच वेळ होती, जे केवळ जीन्नांमुळेच होऊ शकलं होतं. विशेष म्हणजे त्यावेळी जिन्ना आणि टिळक यांच्यात अनेक मुद्यांवर मतभेद होते.

१९२९. विधिमंडळ बॉम्बस्फोट प्रकरणात भगतसिंग जेलमध्ये होते. ब्रिटीश सरकारकडून त्यांच्याविरोधात खटला चालवण्याची फक्त औपचारिकता पूर्ण करण्यात येत होती. क्रांतीकारकांना आपलं म्हणणं मांडण्याची कसलीही संधी दिली जात नव्हती. याविरोधात भगतसिंग उपोषणास बसले होते. भारतीय कैद्यांना जेलमध्ये चांगल्या सोयी-सुविधा देण्यात याव्यात आणि क्रांतीकारकांना राजकीय कैद्यांचा दर्जा देण्यात यावा या त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या. सरकारने त्यांच्या मागण्यांकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं आणि क्रांतिकारकांच्या अनुपस्थितीत त्यांचा खटला पुढे सुरु ठेवला.

जिन्ना हे त्याकाळचे प्रख्यात कायदेपंडित होते. त्यांनी याविरोधात विधिमंडळात आवाज उठवला. विधिमंडळात बोलताना ते म्हणाले की, “उपोषण करणारी व्यक्ती ही तिच्या अंतरात्म्याचा आवाज ऐकून उपोषण करते. हे क्रांतिकारक स्वतःचा जीव धोक्यात घालून उपोषणाला बसले आहेत. न्यायाच्या प्रतीक्षेत त्यांनी हे पाऊल उचललं आहे. आपला स्वार्थ साधण्यासाठी क्रूर गुन्हे करणाऱ्या अपराध्यांमध्ये आणि या राजकीय कैद्यांमध्ये सरकारला फरक करता यायला हवा. त्यांच्या मागण्यांचा सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करायला हवा” भगतसिंगांच्या अनुपस्थितीत त्यांचा खटला पुढे चालवण्याला जिन्नांनी ‘ज्युडीशिअल मर्डर’ असं म्हंटल होतं. जिन्नांनी भगतसिंगांची वकिली करण्याच्या कृत्याला वेगळं महत्व प्राप्त होण्याचं अजून एक महत्वाचं कारण म्हणजे भगतसिंगांनी त्यांच्या साथीदारांसह जेव्हा विधिमंडळात बॉम्बस्फोट घडवून आणला होता, त्यावेळी जिन्ना देखील विधिमंडळात उपस्थित होते. असं असूनही जिन्नांनी भगतसिंगांच्या समर्थनात आपला आवाज उठविला होता.

 

 

 

 

 

 

 

4 Comments
  1. Indian says

    So u mean to say that ONLY for this reason Mr Jinnah should be adored in our country?
    He has nothing to do with partition because of which our generations after generations r getting affected. At least be faithful to the salt u ate Sir.
    You should visit india Pakistan border with no food and no water with you. ..at least then u will realise what r u talking about!

Leave A Reply

Your email address will not be published.