एका पायावर खेळत पुण्याच्या केदार जाधवनं भारताला आशिया कप जिंकून दिला होता…

भारतात रस्ते ओस पडण्याचं, दिवाळी नसताना फटाके आणून ठेवण्याचं कारण म्हणजे भारत पाकिस्तान मॅच. ‘सचिन आणि गांगुली गेल्यावर क्रिकेट संपलं रे’ असं म्हणणारे पण या मॅचकडे लक्ष ठेऊन असतात. क्रिकेटबद्दल कौतुक वाटत नसणारेही, या मॅचवर हमखास पैजा लावतात. आधी लोकं मॅच बघायला टीव्हीसमोर गर्दी करुन बसायची, आता बाकीच्या मॅचेस मोबाईलवर पाहिल्या तरी ‘भारत-पाकिस्तान’ मॅच गर्दीत उभं राहून बघण्यात एक वेगळाच नाद असतोय.

रविवारी आशिया कपच्या मॅचमध्ये भारत पाकिस्तान भिडतील, २०२१ च्या टी२० वर्ल्डकपमध्ये झालेल्या लाजिरवाण्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भारतीय संघ आतुर असेल. त्यामुळं मॅच घासून होणार हे तर फिक्स.

आशिया कपमध्ये बघायचं झालं, तर भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत १५ वेळा आमनेसामने आले. त्यातल्या ८ वेळा भारतानं बाजी मारली, तर ५ वेळा पाकिस्तान जिंकलं. एका मॅचचा निकाल लागला नाही. फक्त भारत पाकिस्तानच नाही, तर आशिया कपमध्येही भारताचंच वर्चस्व आहे.

 कारण ७ आशिया कप बाकी कुणाच्या नाही, तर भारताच्याच खात्यात जमा आहेत.

आज असाच एक किस्सा बघुयात आशिया कप फायनलचा, ज्याच्यात भारत बांगलादेशकडून हरेल असं वाटत असताना, मराठमोळ्या केदार जाधवनं दुखापतीवर मात करत मॅच खेचून आणली होती.

२०१८ चा आशिया कप. भारतीय टीमचं नेतृत्व करत होता रोहित शर्मा. सगळ्या स्पर्धेत भारतानं एकही मॅच गमावली नव्हती. त्यामुळं फायनलमध्ये हरायचा सवालच नव्हता. त्यात जरा बांगलादेश विरुद्ध हरलो असतो, तर विषय आणखी गंभीर झाला असता.

भारतानं टॉस जिंकून आधी बॉलिंग घेतली. बांगलादेशनं त्या मॅचला खतरनाक बॅटिंग केली. पहिल्या २० ओव्हर्समध्ये त्यांनी १२० रन्स मारले, पण विशेष म्हणजे एकही विकेट गेली नव्हती. साहजिकच भारताचं टेन्शन वाढत गेलं.

रोहित शर्मानं बॉल केदार जाधवकडे सोपवला, त्यानं आपली वाढीव स्टाईल वापरुन मेहदी हसनची विकेट काढली आणि भारताला पहिला ब्रेक थ्रू मिळाला. लगेचच चहलनं एक विकेट मिळवली आणि जाधवनं आणखी एक.

या सनासना पडलेल्या विकेट्सनंतर बांगलादेशचा डाव गंडला, लिटन दासची सेंच्युरी आणि सौम्य सरकारचे ३३ रन्स सोडले, तर त्यांचा एकही बॅट्समन भारी कामगिरी करु शकला नाही.

भारताला जिंकायला हवे होते २२३ रन्स, मॅच तशी हातात होती.

पण भारताची सुरुवात ढेपाळली, कॅप्टन रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिकनं बाजू सांभाळली. हे दोघं आऊट झाल्यावर धोनी क्रीझवर टिकला खरा, मात्र त्याला ३७ रन्स करायला ६१ बॉल लागले. बांगलादेशचे बॉलर्स टिच्चून मारा करत होते. धोनी आऊट झाल्यावर सगळ्यांचं लक्ष एकाच प्लेअरकडे होतं केदार जाधव.

मराठमोळ्या केदार जाधवनं २०१५ मध्ये भारतीय संघात स्थान मिळवलं होतं. मिडल ऑर्डर बॅट्समन आणि खतरनाक ऍक्शनच्या जोरावर विकेट्स मिळवून देणारा बॉलर म्हणून केदारची ओळख होती. २०१७ मध्ये पुण्यात झालेल्या मॅचमध्ये इंग्लंडला १२० रन्स चोपत त्यानं भारताला मॅच जिंकवून दिली होती. त्यावेळी हॅमस्ट्रिंगच्या दुखण्यानं त्याला चांगलंच सतावलं होतं, मात्र तरी तो क्रीझवर टिच्चून उभा राहिला आणि बाप बॅटिंग केली.

२०१८ च्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सची पहिली मॅच झाली मुंबई इंडियन्सविरुद्ध. त्यावेळीही केदारचं हॅमस्ट्रिंगचं दुखणं बळावलं होतं. तेव्हा गडी मैदानातून बाहेर गेला मग परत क्रीझवर आला आणि लास्ट बॉलला सिक्स मारुन चेन्नईला मॅच जिंकून दिली होती.

तशीच काहीशी गत बांगलादेश विरुद्धच्या मॅचमध्येही त्याची झाली. हॅमस्ट्रिंगच्या दुखण्यामुळे त्याला पळताच येत नव्हतं. ना मोठे शॉट्स खेळता येत होते आणि ना सिंगल काढता येत होत्या. त्यामुळं कित्येक बॉल डॉट जात होते.

टार्गेट आणखी अवघड झालं होतं, पण कॅप्टन रोहित शर्मानं त्याला सल्ला दिला की डॉट बॉलचा लोड घेऊ नको, तू क्रीझवर थांब. 

केदार प्रयत्न तर करत होता, मात्र त्याला यश येत नव्हतं. शेवटी त्यानं मैदान सोडलं, लंगडत लंगडत तो ड्रेसिंग रुममध्ये गेला. इकडे जडेजा आणि भुवनेश्वरनं किल्ला लढवला. टार्गेट तसं जवळ आलंच होतं आणि तेवढ्यात जडेजा आऊट झाला. मॅच बघणाऱ्या भारतीय फॅन्सचं टेन्शन वाढत चाललं होतं.

आणि तेवढ्यात केदार जाधव पुन्हा एकदा मैदानात उतरला. पळणं लांब चालताही येत नव्हतं, पण तरी देशाला जिंकून देण्याची जिद्द ठासून भरली होती.

भारताला आशिया कप जिंकायला १६ बॉल्समध्ये १२ रन्स करायचे होते. केदारसाठी पळणं अवघड झालं होतं. त्यात भुवनेश्वरही आऊट झाला आणि टेन्शन आणखी वाढलं. कुलदीप यादवनं इमानदारीत एक रन काढून केदारला स्ट्राईक दिली, मात्र पुढचे तिन्ही बॉल डॉट पडले. ४९ व्या ओव्हरचा शेवटचा बॉल, जीव पायात आणत केदार दोन रन पळाला.

मात्र खरं टेन्शन आता होतं, कारण ६ बॉलमध्ये ६ रन्स हवे होते आणि क्रीझवर कुलदीप होता.

कुलदीपनं याहीवेळी निराशा केली नाही, त्यानं पहिल्या बॉललाच स्ट्राईक रोटेट केली. या जोडीनं मॅच २ बॉल २ रन्सवर आणली. कुलदीपनं पाचव्या बॉलवरही सिंगल काढली आणि आता एक बॉल एक रनचं चॅलेंज उभं राहिलं.

सगळा देश केदार जाधवकडं आशेनं बघत होता, त्यानं शॉट खेळायचा प्रयत्न केला पण बॉल त्याच्या पायाला धडकला. सगळी ताकद लाऊन केदार पळाला आणि भारतानं मॅच जिंकली.

केदारच्या शतका इतकाच त्याचा तो एक रनही तितकाच महत्त्वाचा ठरला आणि भारतानं आशिया कप मारला. दुखापत घेऊन खेळणारा पुणेकर केदार जाधव सगळ्या भारताचा हिरो ठरला. आशिया कपवर भारतानं सातव्यांदा आपलं नाव कोरलं.

ही गोष्ट गेल्या आशिया कपची, मात्र या आशिया कपमध्ये केदार जाधव भारतीय संघाचा हिस्सा नसेल. तो भारताकडून शेवटची मॅच खेळला फेब्रुवारी २०२० मध्ये. ऑलराउंडर म्हणून ओळख असणाऱ्या केदारला धोनीच्या निवृत्तीनंतर फक्त बॅट्समन म्हणूनच खेळवण्यात आलं. त्यात फॉर्म आणि फिटनेसच्या कारणामुळं त्याची संघातली जागाही गेली.

जेव्हा भारतीय टीममधला मराठी टक्का घसरत होता तेव्हा केदारच  मराठी पताका फडकावत होता. त्याला भारताकडून वर्ल्डकप खेळण्याचीही संधी मिळाली, त्यानं ती गाजवलीही. मात्र नंतर त्याला फारशी संधी मिळाली नाही.

पण आजही केदारची आठवण आली की आशिया कपची ती फायनल आठवते आणि लंगडत्या पायानं खेळण्याची त्याची जिद्दही.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.