नेहरूंच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव मनमोहन सिंगांनी नाकारला होता !

२००४ ते २०१४ असे सलग १० वर्षे देशाच्या पंतप्रधानपदावर विराजमान राहिलेल्या मनमोहन सिंग यांनी २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पहिलं काम काय केलं असेल तर त्यांनी आपण ज्या पंजाब विद्यापीठातून शिकलो त्याच पंजाब विद्यापीठात प्राध्यापक म्हणून शिकवण्याचा निर्णय घेतला.

पंजाब विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची त्यांची ही काही पहिली वेळ नव्हती. यायाधी देखील त्यांनी हे काम केलेलं होतं. विशेष म्हणजे,

आपल्या या आवडत्या कामासाठी त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव देखील नाकारला होता.

आपलं उच्च शिक्षण पूर्ण केलेले मनमोहन सिंग ज्यावेळी पंजाब विद्यापीठातील अमृतसरमधील कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत होते, त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी प्रख्यात इंग्रजी साहित्यिक मुल्क राज आनंद यांच्या माध्यमातून मनमोहन सिंग यांना त्यांच्या सरकारमध्ये सहभागी  होण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु आपण प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करू इच्छित असल्याचं सांगत मनमोहन सिंग यांनी हा प्रस्ताव नाकारला होता.

मनमोहन सिंग यांच्या शिक्षकी पेशाविषयीच्या प्रेमाचा आणि स्वदेशाच्या ओढीचा अजून एक असाच किस्सा आहे. १९६६ ते १९६९ या कालावधीत मनमोहन सिंग प्रख्यात अर्थतज्ञ राउल प्रेबिश यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त राष्ट्रात कार्यरत होते. पण १९६९ साली त्यांना ‘दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मधून प्राध्यापक म्हणून रुजू होण्याचा प्रस्ताव आला.

manmohan
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग

जगातल्या बहुतेक अर्थतज्ञांना संयुक्त राष्ट्रासोबत काम करायचं असतं. अशा परिस्थितीत संयुक्त राष्ट्रात काम करत असलेल्या मनमोहन सिंग यांनी ‘दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’चा प्रस्ताव स्वीकारताना मायदेशी परतण्याचा निर्णय घेऊन राउल प्रेबिश यांना देखील आश्चर्याचा धक्का दिला होता.

आपल्यापैकी अनेकांना कल्पना नसेल पण जगभरातील सर्वाधिक शिकलेले राष्ट्रप्रमुख अशी ख्याती असलेल्या मनमोहन सिंग यांना राष्ट्रभाषा हिंदी मात्र अवगत नाही. त्यांना हिंदी वाचताच येत नाही. पंतप्रधान म्हणून जेव्हा कधी मनमोहन सिंग यांनी हिंदीतून भाषण देत, त्यापूर्वी त्यांनी त्या भाषणाची तयारी उर्दूतून लिहिलेल्या स्क्रिप्टच्या आधारे केलेली असे.

मनमोहन सिंग दररोज सकाळी उठल्यानंतर बीबीसीच्या बातम्या न चुकता ऐकतात. त्यामुळे अनेक विषयांवरील त्यांच्या माहितीचा मुख्य आधार बीबीसीच्या बातम्या असतात. त्यांच्या याच सवयीचा फायदा त्यांना २००४ सालच्या त्सुनामीच्या दुर्घटनेवेळच्या ब्रीफिंगमध्ये झाला होता.

हे ही वाच भिडू – 

त्यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पंतप्रधान कार्यालयाला त्सुनामीविषयी कुठलीही माहिती देण्यात येण्यापुर्वीच मनमोहन सिंग यांच्याकडे मात्र या विषयावर माध्यमांशी काय बोलायचं याविषयीची इत्यंभूत माहिती होती.

सगळ्यात महत्वाची एक गोष्ट जी जाता जाता तुम्हाला सांगायचीये ती म्हणजे आजच्या मनमोहन सिंग यांच्या वाढदिवशी मनमोहन सिंग यांच्याविषयीची माहिती आम्ही तुम्हाला सांगतोय पण त्यांचा वाढदिवसाची ही तारीख मात्र अधिकृत नाही. ती बहुतेक जुन्या-जाणत्या मंडळींची जशी शाळेच्या दाखल्यावर असते तशीच आहे.

मनमोहन सिंग यांच्या आजीने त्यांच्या शाळेतील प्रवेशाच्या वेळी २६ सप्टेबर १९३२ अशी मनमोहन सिंग यांची जन्मतारीख नोंदवली होती, तीच पुढे त्यांची अधिकृत जन्मतारीख म्हणून गणली जाऊ लागली.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.