मुलायम सिंह यांनी बोफोर्सची फाईल गायब केली होती.
मुलायम सिंह यांनी केंद्रात संरक्षणमंत्री असताना बोफोर्सची फाईल गायब केली होती. हे आम्ही नाही सांगतोय तर खुद्द मुलायम सिंह यादव यांनीच १८ ऑगस्ट २०१६ रोजी लखनऊ येथील डॉ. राम मनोहर लोहिया राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या वर्धापनदिना निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना सांगितलं होतं.
मुलायम सिंह यांनी आपल्या या वक्तव्याच्या समर्थनार्थ अजब तर्क दिला होता. ते म्हणाले होते की,
“सुडाच्या भावनेने राजकारण केलं जाऊ नये. राजकीय नेते जर तुरुंगात जातील, तर राजकारण कसं होऊ शकेल..?”
पुढे त्यांनी असं देखील सांगितलं की,
“युनायटेड फ्रंटच्या सरकारमध्ये संरक्षण मंत्री म्हणून काम करत असताना मी जेव्हा बघितलं की बोफोर्सच्या तोफा व्यवस्थितपणे काम करताहेत. त्यानंतर माझ्या मनात पहिला विचार आला तो हाच की राजीव गांधी खूप चांगलं काम केलंय. त्यामुळे मी बोफोर्स संबंधित फाईल गायब केल्या.
देशभरात अशी एक सामुहिक भावना आहे की बोफोर्सचा करार ही राजीव गांधींची चूक होती. संरक्षण मंत्री म्हणून काम करताना मला मात्र हा करार फारच उपयुक्त वाटला. राजीव गांधींनी फारच चांगलं काम केलं होतं”
विशेष म्हणजे त्यावेळी मुलायम सिंह यांनी अजून एक मोठा खुलासा केला होता. मुलायम यांनी सांगितलं होतं की तत्कालीन सेनाध्यक्ष सुंदरजी यांनी फ्रांसकडून ‘सोप्मा’ कंपनीच्या तोफा खरेदी करण्याची शिफारस केली होती. कारण त्यांच्यामते सोप्मा कंपनीच्या तोफा बोफोर्सच्या तोफांपेक्षा चांगल्या होत्या.
सोप्मा कंपनी या करारासाठी दलाली द्यायला मात्र तयार नव्हती. त्यामुळे तत्कालीन संरक्षण राज्यमंत्री अरुण सिंह यांनी सेनाध्यक्ष सुंदरजी यांना सांगितलं होतं की बोफोर्सच्याच तोफा खरेदी करण्याचे आदेश वरिष्ठांकडून आलेले आहेत आणि वरिष्ठांचे आदेश मानले गेले पाहिजेत. त्यानंतरच सेनाध्यक्ष सुंदरजी यांनी आपलं मत बदललं होतं.
हे ही वाच भिडू
- पाच अशा तोफा, ज्यांच्यापुढे बोफोर्सचा आवाज देखील फिका पडेल
- राजीव गांधींना फसवुन अमेरिकेनं भारतात गांजा बंद केला.
- वाजपेयींनी दिलेली राष्ट्रपती पदाची ऑफर कांशीराम यांनी का नाकारली ?
- ते जावूदे, अजय सिंह बिश्टचे योगी आदित्यनाथ कसे झाले ते वाचा !