अप्पासाहेब पंतांच्या सांगण्यावरून नेहरू जेव्हा किर्लोस्करवाडीला भेट देतात…

अनेक स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक यांनी रक्त सांडलं, कारावास सहन केला. प्रत्यक्ष स्वातंत्र्य उजाडायला १९४७ साल उजाडलं.

पण या सगळ्याच्या आधी १० वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या एका छोट्याशा संस्थानात लोकशाही जन्मली देखील होती. ते संस्थान म्हणजे सातारा जिल्ह्यातील औंध आणि तिथला राजा म्हणजे भवानराव पंतप्रतिनिधी. औंध संस्थानाची स्थापना परशुराम त्रिंबक पंतप्रतिनिधी यांनी केली. १९३० सालापासूनच या संस्थानाने प्रजासत्ताक होण्याच्या प्रवासाला सुरुवात केली. इकडे संस्थान संपूर्ण लोकशाही कडे वाटचाल करत होते आणि तिकडे औंधचे युवराज आप्पासाहेब पंतप्रतिनिधी हे लंडनमध्ये बॅरिस्टरचं शिक्षण संपवून भारतात आले होते. 

ऑक्सफर्डसारख्या दिग्गज विद्यापीठात त्यांचं शिक्षण झालं होतं. खऱ्या अर्थाने आधुनिक जग ते जगले होते. खुल्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. 

दरम्यानच्या काळात त्यांचा संबंध पंडित जवाहरलाल नेहरूंसोबत आला.  १९४० ची गोष्ट आहे.  जुलैच्या अखेरीस पुणे येथे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची सभा भरली होती. या सभेत अप्पासाहेब पंत हजर होते. 

त्यावेळी पं. नेहरूंनी अप्पासाहेबांना औंध संस्थानातील स्वराज्याचा प्रयोग किती यशस्वी होत आहे असे विचारले.

“याचं उत्तर तोंडी देण्यापेक्षा आपण स्वतःच हा प्रयोग पाहिल्यास बर होईल, ” अप्पासाहेब म्हणाले.

जवाहरलालजींनी ते निमंत्रण स्वीकारले व एक आठवड्याने अप्पासाहेब त्या सर्व मंडळींना घेऊन औंधास आले. 

नेहरूंच्या या दौऱ्याची संपूर्ण व्यवस्था करण्याची जबाबदारी श्री. अप्पासाहेबांनी शंकरराव किर्लोस्करांकडे सोपविली होती. 

शंकरराव किर्लोस्कर आपल्या आत्मचरित्रात सांगतात या दौरा आमच्या सर्वांसाठीच खूप महत्वाचा होता. सभेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी अप्पासाहेब पंत, शंकरराव किर्लोस्कर यांच्यासह सगळ्या पाहुण्यांनी पुण्याहून औंधकडे कूच केली. 

या पाहुण्यांच्या यादीत स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू, विजयालक्ष्मी पंडित, मृदुलाबेन साराभाई, बाबा राघवदास अशी मोठी मंडळी होती..

औंध मागे टाकून वाटेतल्या दोन गावांना भेटी दिल्यावर बाराच्या सुमाराला या मंडळींनी रामपूर गाठले. तेथील सरपंच महादबा गायकवाड, इतर पंचमंडळी व गावातल्या स्त्री-पुरुषांनी अत्यंत उत्साहाने स्वागत केल्यावर हे गाव स्वराज्याचा कसा उपयोग करीत आहे व त्याने गावकऱ्यांसाठी कोणकोणत्या सुधारणा केल्या आहेत याची माहिती दौऱ्याची जबाबदारी असणाऱ्या शंकराव किर्लोस्करांनी पाहुण्यांना दिली. मग तेथून हा चमू कुंडलला आला. 

तेथे गावाबाहेरच किर्लोस्करांनी एक छोटा मांडव घालून सभेची पूर्वतयारी ठेवली होतीच. प्रचंड जयजयकारात सर्वांनी बड्या पाहुण्यांचे स्वागत केल्यावर नेहरूंनी भाषण केले व तो समारंभ आटोपून मंडळी पुढच्या वाटेकडे म्हणजे किर्लोस्करवाडीकडे निघाली……

किर्लोस्कर आपल्या आत्मचरित्रात सांगतात,  पंडीत जवाहरलाल नेहरू किर्लोस्करवाडीला येण्याचे जाहीर होताच आमच्यावर एक मोठी जबाबदारी आली होती. 

इतक्या मोठ्या नेत्याला पाहायला व त्यांचे भाषण ऐकायला आजूबाजूच्या खेड्यांतून खूपच गर्दी जमणार, तेंव्हा आयत्यावेळी त्यात गोंधळ उडता कामा नये यासाठी सर्व पूर्वतयारी आखून ठेवणे भागच होते. त्यासाठी भोवतीच्या सर्व खेड्यांच्या प्रमुखांची किर्लोस्करांनी एक प्राथमिक सभा घेतली. त्यांनी त्या पुढाऱ्यांना नेहरूंच्या भेटीचा योग केवढा अपूर्व आहे याची कल्पना दिली. त्यांच्या भाषणाची योजना नीट पार पाडण्यासाठी त्यांचे कोणते सहकार्य हवे हेही किर्लोस्करांनी त्यांना खुलासेवार सांगितले व ही सर्व व्यवस्था बरोबर होण्यासाठी कारखान्यातील एकएक इसम त्यांच्या मदतीला दिला.

नंतर सभा कोठे घ्यायची हे साऱ्या बाजूंनी विचार करून ठरविले. व्याख्याते सर्व बाजूंनी दिसावे अशी उंच बैठक त्यांच्यासाठी तयार केली व लाऊड स्पीकर बसविले. बैठकीसमोरच्या मैदानावर प्रत्येक गावच्या श्रोत्यांसाठी पुरेशी जागा वाटून दिली व घोटाळा उडू नये म्हणून त्या त्या गावांच्या नावाची पाटी तेथे लावली.

नेहरू आणि त्यांच्याबरोबरची मंडळी वाडीत आल्यावर लक्ष्मणराव व इतर चालकांनी त्यांचे स्वागत केले. चहापाणी आटोपून सर्वजण कारखाना पहावयास निघाले. भट्टी, मशीन शॉप, पॅटर्न डिपार्टमेंट, छापखाना, ऑफिस वगैरे खाती पाहत पाहत वाटेत ठेवलेल्या एका नांगराजवळ हे सगळे पाहुणे आले.

नेहरू जवळ जाऊ लागताच शंकरराव किर्लोस्कर त्यांना म्हणाले, “आमचे नांगर किती सरळ चालतात हे नुसतं पाहून कसं समजायचं? तथापि त्यांच्या मुठी धरताच त्याची थोडीफार कल्पना येऊ शकेल.”

हे ऐकताच नेहरूंनी नांगराच्या मुठी धरल्या तोच इकडे ‘क्लिक’ करून तो फोटो काढून किर्लोस्कर वाडीचे सदस्य मोकळे झालो! आज तोच फोटो किर्लोस्कर कारखान्याच्या संग्रहातील एक अमूल्य फोटो म्हणून मानण्यात येतो.

Jawaharlal Nehru visits Kirloskarvadi

त्यानंतर हा सगळा चमू कारखान्यातून निघून शाळेपुढील मैदानात आला. ते सारं मैदान ग्रामीण श्रोत्यांनी भरून गेले होते. दहा हजारांपेक्षा जास्त प्रेक्षक तेथे बसले होते. त्या सर्वांनी नेहरूंना एकदम उत्थापन दिले.

पंडितजी व त्यांच्याबरोबरची मंडळी व्यासपीठावर बसल्यावर लक्ष्मणरावजींनी त्यांचे यथोचित स्वागत केले. त्यानंतर पंडितजी टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात बोलावयास उठले. त्यांचे भाषण अर्थात हिंदीत झाले. त्यात आपण कोणत्या उद्देशाने औंध संस्थानात आलो व किर्लोस्कर कारखाना पाहिल्यावर त्याबद्दल किती उच्च मत झाले हे सांगतांना ते म्हणाले,

“आज आपल्यापुढं दोन प्रश्न आहेत. एक म्हणजे आपल्या देशाचं स्वातंत्र्य कसं मिळवावं व दुसरं आपलं दारिद्र्य कसं दूर करावं? हिंदुस्थानातील ब्रिटिश मुलुखात जा किंवा संस्थानात जा, जिकडंतिकडं बेकारी व दारिद्र्य पसरलेलं दिसतं. ही स्थिती जाऊन सगळीकडे स्वतंत्र जनतेचं राज्य चालू होणं आवश्यक आहे. हिंदी संस्थानाच्या बाबतीत फारच मागासलेपणा दिसतो. पण छोट्याश्या औंध संस्थानानं अतिशय प्रगतीचं व औदार्याचं धोरण ठेवलेलं पाहून मला फार आनंद होतो.

“एके काळी आपण जगाच्या पुढं होतो; पण नंतर आम्ही थांबलो आणि जग पुढं गेलं! तेव्हा आपणही आता झटून व सर्व राजकारण समजावून घेऊन पुढं येणं जरूर आहे. त्यासाठी प्रत्येकानं झटून काम करणं आवश्यक आहे. जगात झोप घेणारी राष्ट्र मागे पडतात. म्हणून जागे व्हा आणि पुढं चला!” नेहरूंचे हे भाषण संपूर्ण देशाच्या पुढील प्रगतीपथाचा आराखडाच असावा जणू…

भाषण आटोपल्यावर प्रेक्षकांच्यामधून जवाहरलाल व त्यांच्या बरोबरची मंडळी परत औंधला निघाली. नेहरूंच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद पसरलेला दिसत होता. ते शंकराव किर्लोस्करांना म्हणाले, “औंध संस्थानातील तुमचं कार्य पाहून मी अत्यंत संतुष्ट झालो आहे.”

हे एकूण शंकराव किर्लोस्कर म्हणाले, “आपलं हे मत ऐकून मला अत्यंत समाधान झालं. पण आपण समाजसेवेच्या भावनेनं वागलो की सर्व लोकही आपल्या पावलावर पाऊल टाकू लागतात. आपलाही तोच अनुभव असणार. आमचे अप्पासाहेब एक राजपुत्र, पण ते एक लांडी विजार व खादीचा सदरा घालून खेडुतांबरोबर काम करू लागतात हे पाहिल्यावर लोकांना कसं वागावं हे वेगळं सांगावं लागत नाही!”

किर्लोस्करवाडीला  खऱ्या अर्थाने मेक इंडियाचा प्रयोग म्हणलं जातं. असं म्हणलं जातं कि, जमशेदपूर जर का आधुनिक भारताचा राम असेल तर किर्लोस्करवाडी लक्ष्मण आहे. पहिला नांगर या जमिनीत झाला. पहिलं डिझेल इंजिन याच जमिनीत झालं. पहिली इलेक्ट्रिक मोटार याच जमिनीत झाली, पहिली लेथ मशिन याच ठिकाणी झाली.. महाराष्ट्रातल्या याच इंडस्ट्रीयल गावाने भारताला स्वातंत्र मिळवून देण्यात देखील मोठी भूमिका निभावली होती. 

नेहरूंच्या या दौऱ्यामुळे किर्लोस्कर वाडीत एक वेगळाच उत्साह संचारला होता ज्याची आठवण आजही किर्लोस्कर वाडीचे गावकरी काढत असतात.

हे हि वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.