प्रणब मुखर्जींचं कुत्रं वाजपेयींना चावलं आणि पेपरात बातमी आली…

आमचा एक भिडू कार्यकर्ता परवा ८३ पिक्चरला गेला. आता तो गडी म्हणजे डायहार्ड क्रिकेट फॅन. जेवताना म्हणू नका, काम करताना म्हणू नका त्याच्या डोक्यात क्रिकेट सुरू असणार म्हणजे असणार. हा गडी पिक्चर बघून आला आणि आम्ही सगळे रिव्ह्यू ऐकायला आतुर होतो. पिक्चर लय भारी आहे, असं तो म्हणाला. पण त्यानं आमच्या डोक्यात एक पिल्लू सोडून दिलं.

भिडू म्हणला, “पिक्चर नुकता नुकताच सुरू झालेला. बीसीसीआयच्या ऑफिसमध्ये दोन कार्यकर्ते पेपर वाचत असतात. एक जण बातमी वाचतो, अरे ये वाजपेयीजी को प्रणब मुखर्जीजी के कुत्ते ने काटा. भाऊ पिक्चर राहिला बाजूला मी विचार करायला लागलो खरंच चावला असेल का?” आमच्याच भिडूला प्रश्न पडला म्हणल्यावर उत्तर शोधणं तर भाग होतं आणि आम्ही उत्तर शोधून आमच्याकडे ठेवत नसतोय, आम्ही तुम्हाला सांगणार हेही फिक्स.

तर हा, पिक्चरमध्ये दाखवतात ते सगळं खरं असणारच असं नसतंय. ते पाटी पण दाखवतात की, यात काही गोष्टींबाबत सिनेमॅटिक लिबर्टी घेण्यात आली आहे. त्यामुळं म्हणलं शोध घ्यायलाच हवा.

पिक्चरमध्ये दाखवलेली गोष्ट एकदम खरी आहे. याबाबतचा किस्सा स्वतः माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनीच सांगितला आहे.

सगळ्यात आधी तुम्हाला सांगायला हवं या दोन दिग्गज नेत्यांच्या मैत्रीबद्दल. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे मितभाषी आणि मनमिळाऊ नेते म्हणून देशात प्रसिद्ध आहेत. तर दुसऱ्या बाजूला माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची ओळखही संयमी राजकारणी अशीच. दोघेही आपापल्या पक्षाचे दिग्गज नेते, त्यांचे पक्ष आणि विचारधारा वेगळ्या असल्या तरी त्या मैत्रीच्या आड आल्या नाहीत.

दिल्लीच्या ल्यूटन्स एरियामध्ये या दोन्ही बड्या नेत्यांची घरं होती, बरं ही घरं अगदी शेजारी शेजारी. दोघांची दोस्ती इतकी घट्ट होती की एकमेकांच्या घरात जाण्यासाठी एक स्वतंत्र दरवाजाही करण्यात आला होता. मुखर्जी यांच्या पत्नीनं केलेल्या जेवणाची वाजपेयींना आवड होती. त्यांच्या परिवारातही इतका जिव्हाळा होता, की वाजपेयींची मानसपुत्री नमिताच्या लग्नाची तयारी करण्यात मुखर्जी यांच्या पत्नीनं पुढाकार घेतला होता.

या दोन दोस्तांची जोडी आपल्या पाळीव कुत्र्यांनाही एकत्रच फिरायला घेऊन जायची. एक दिवस मुखर्जी या सकाळच्या वॉकसाठी आले नाहीत. त्यामुळं दोघांच्याही कुत्र्यांना वाजपेयी यांनीच फिरवायला नेलं. मुखर्जीचं कुत्रं वाजपेयींच्या कुत्र्यापेक्षा मोठं होतं. हे मोठं कुत्रं जरा वांड निघालं आणि त्यांनी वाजपेयींच्या कुत्र्यावर हल्ला केला. साहजिकच कुत्र्यांवर प्रचंड जीव असलेले वाजपेयी मध्ये पडले आणि प्रणबदांचं कुत्रं त्यांना चावलंच.

वाजपेयींना काय या गोष्टीचा राग आला नाही, आणि ते प्रणबदांच्या घरी भांडणंही घेऊन गेले नाहीत. त्यांनी बँडेज बांधलं आणि संसदेत गेले, तिथं त्यांना भेटले प्रणबदा. त्यांनी वाजपेयींना त्या बँडेजबद्दल विचारलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की, हा तुमच्याच कुत्र्याचा प्रताप आहे.

साहजिकच या गोष्टीची बातमी पेपरात छापून आली आणि ही आठवण अगदी ३७-३८ वर्षांनंतर पुन्हा एकदा जागी झाली.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.