न्यायालयाच्या सन्मानार्थ खुद्द देशाचे राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयासमोर हजर झाले होते !

 

साल १९७०.

वराह व्यंकट गिरी हे देशाच्या राष्ट्रपतीपदावर विराजमान होते. देशाच्या इतिहासात प्रथमच असं घडत होतं की राष्ट्रापती पदावरील विराजमान व्यक्ती एखाद्या  केसच्या संदर्भातील आपली बाजू  न्यायालयासमोर मांडण्यासाठी  सर्वोच्च न्यायालयासमोर हजर झाली होती.

१९६९ सालच्या भारताच्या राष्ट्रपतीपदाच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात नाटकीय निवडणुकीसंदर्भातील हे प्रकरण होतं. १९६९ साली व्ही.व्ही. गिरी यांनी अपक्ष म्हणून राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवली होती आणि ती जिंकली देखील होती. त्यांच्या याच विजयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

खरं तर राष्ट्रपतींची बाजू ऐकून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एका कमिशनरची नियुक्ती केली होती. हे कमिशनर राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपतींची साक्ष नोंदवणारच होते, पण राष्ट्रपतींनी तसं करण्यास नकार दिला.

president v v giri
माजी राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी

सर्वोच्च न्यायालयाच्या सन्मानार्थ आपण स्वतः न्यायालयात हजर राहून न्यायालयासमोर आपली बाजू मांडू अशी भूमिका त्यांनी घेतली आणि सुनावणीच्या दिवशी ते स्वतः न्यायालयासमोर हजर झाले.

राष्ट्रपती न्यायालयासमोर हजर झाल्यानंतर आता या पदाची प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाची होती. न्यायालयाने देखील ती चोखपणे पार पाडली. त्यांना इतरांप्रमाणे  न वागवता त्यांच्या बसण्यासाठी एका वेगळ्या खुर्चीची व्यवस्था करण्यात आली.

राष्ट्रपतींनी न्यायालयाचा सन्मान राखण्यासाठी घेतलेल्या भूमिकेला न्यायालयाने देखील तेवढ्याच तोलामोलाची साथ दिली.

दरम्यान व्ही.व्ही. गिरी यांच्यावर १९६९ सालच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील आपले प्रतिस्पर्धी नीलम संजीव रेड्डी यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

जवळपास ४ महिने न्यायालयात हे प्रकरण चाललं. न्या. एस.ए. सिकरी यांच्या अध्यक्षतेखालील ५ न्यायाधीशांच्या पीठाने या प्रकरणाची सुनावणी केली आणि शेवटी राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांच्याविरोधातील याचिका फेटाळण्यात आली.

१९६९ सालची राष्ट्रपती पदाची ऐतिहासिक निवडणूक  

१९६९ ची राष्ट्रपतीपदाची निवडणूक भारताच्या राजकीय इतिहासात अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरली होती. या निवडणुकीने भारताच्या राजकीय इतिहासात अभूतपूर्व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

ही तीच निवडणूक होती, ज्यात काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव झाला होता आणि त्याची परिणीती काँग्रेसमध्ये उभी फूट पडून पक्ष दोन गटात विभागण्यात झाली.

ही तीच निवडणूक होती, जीच्या निकालानंतर देशाच्या इतिहासात प्रथमच पंतप्रधान पदावर विराजमान असलेल्या इंदिरा गांधी यांची आपल्याच पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.

ही तीच निवडणूक होती, जी जिंकत वराह व्यंकट गिरी हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवून देशाच्या राष्ट्रपती पदावर विराजमान झालेले पहिले नेते ठरले होते.

ही तीच निवडणूक होती ज्यातील पराभव जिव्हारी लागल्याने काँग्रेसचे उमेदवार नीलम संजीव रेड्डींनी सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतली होती. अर्थात पुढे ८ वर्षांनी ते देशाचे राष्ट्रपती होणार होते.

नेमकं असं काय झालं होतं या निवडणुकीत..?

१९६९ साली इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधानपदावर विराजमान होत्या. त्यावेळी राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीत  काँग्रेसचा  उमेदवार कोण असावा याबाबतीत इंदिरा गांधी आणि त्यांचे पक्षांतर्गत विरोधक यांच्यात एकमत होत नव्हतं.

काँग्रेस पक्षाने आपले अधिकृत उमेदवार म्हणून नीलम संजीव रेड्डींना उमेदवारी दिल्यानंतर वराह व्यंकट गिरी यांनी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवली होती. गिरींना अर्थातच इंदिरा गांधी यांचा अप्रत्येक्ष पाठींबा होता.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांनी आपापल्या सद्साद्विवेकास जागून मतदान करावं, अशी भूमिका घेत त्यांनी अप्रत्येक्षपणे गिरींना मतदान करण्याचा इशारा केला होता.

निवडणुकीचे निकाल हाती आले आणि इतिहासात प्रथमच काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव झाला. त्यानंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.

 हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.