पंतप्रधान बच्चनला भेटायला आल्या, पण संपात रखडलेल्या गिरणी कामगारांना नाही…

मुंबई, मायानगरी, सपनों का शहर, राजधानी आणि मेरी जान. या शहराला नावं अनेक आणि या शहराच्या कहाण्याही. जितकी स्वप्न मुंबईनं पूर्ण होताना पाहिली, त्यापेक्षा जास्त स्वप्नांचा चुराडा या मायानगरीनं होताना पाहिलाय. आज आभाळाला छेदणारे उंच टॉवर, लांब पसरलेलं लोकलचं, मेट्रोचं जाळं, महागडी घरं आणि खळाळता पैसा हे चित्र दिसत असलं, तरी याच मुंबईनं गरिबीही पाहिलीये आणि गिरणी कामगारांचा संपही.

प्रत्येक सच्च्या मुंबईकराच्या आयुष्यात गिरणी कामगारांच्या संपाचं महत्त्वाचं स्थान आहे. मुंबईतल्या कित्येक घरांना या संपानं जखम दिलीये आणि कित्येक घरांना पुसता न येणारा ओरखडा.

साल होतं १९८२, खरंतर त्याआधी दिवाळी बोनसच्या निमित्तानंच कामगार आणि गिरणी मालक यांच्यातला वाद उफाळून आला होता. तेव्हाच संपाची हाक देण्यात आली. पण कामगार आशेवर होते, त्यांचे नेते डॉ. दत्ता सामंत यांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला होता. त्यातच कामगारांचा एक गट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे काय भूमिका घेतात याकडे डोळे लावून बसला होता. बाळासाहेबांनी मात्र जाहीर सभेत संप नको अशी भूमिका घेतली आणि कामगार आणखीनच खवळले.

पुढे डॉ. दत्ता सामंत यांच्या नेतृत्वात १८ जानेवारी रोजी संपाचं रणशिंग फुंकण्यात आलं. जवळपास ६५ गिरण्यांमधले कामगार या संपात उतरले. मुंबईत ऐकू येणारे भोंग्यांचे, मशीनचे आवाज ठप्प झाले. आवाज घुमू लागला तो फक्त गिरणी कामगारांचा. त्यांचे मोर्चे, कोपरासभा आणि आंदोलनांनी मुंबई गजबजून गेली. 

‘अरे कोण म्हणतो देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय’ ही घोषणा तर गिरणी कामगारांपासून त्यांच्या पोरांपर्यंत प्रत्येकाच्या तोंडी होती.

कामगारांच्या ऐतिहासिक संपावर तोडगा निघण्याचं नाव मात्र निघत नव्हतं. राज्याचे मुख्यमंत्री बदलले, समित्या नेमल्या गेल्या, दिल्लीतून सरकारची माणसं आली, पण परिस्थिती जैसे थेच होती. कॅलेंडरची पानं बदलत होती, पण गिरणी कामगारांचं जीवन जणू अंध:कारात चाललं होतं. घरात धान्याचा कण उरला नाही, मुलांच्या डोळ्यातली उज्ज्वल भविष्याची आशा संपून गेली. कित्येक मुलांनी तर गुन्हेगारीचा मार्ग अवलंबला. गिरणी कामगार अक्षरश: राहत्या जागा विकून रस्त्यावर आले. मात्र सरकार बधलं नाही आणि गिरणी कामगारही…

अशातच उजाडला जुलै महिना, संपाला सहा महिने उलटून गेले होते. त्याचवेळी मुंबईत एका गोष्टीची प्रचंड चर्चा सुरु झाली. अभिनेता अमिताभ बच्चनला कूली चित्रपटाच्या चित्रकरणादरम्यान इजा झाली. त्याचे देशभरातले चाहते त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत होते. मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. एक दिवस चक्क देशाच्या पंतप्रधान बच्चनची भेट घेण्यासाठी मुंबईत दाखल झाल्या. त्याच वेळी मुंबईत गिरणी कामगारांचा संपही सुरू होता. पंतप्रधान स्वतः मुंबईत आहेत म्हणल्यावर संपावर तोडगा निघेल असं वाटत होतं.

मात्र इंदिरा गांधी संपकऱ्यांना न भेटताच परत गेल्या. संप सुरू होऊन वर्ष उलटून गेलं तरी संप मिटायची चिन्ह नव्हती. अखेर संप बारगळला आणि लाखो कामगार बेकार झाले. कित्येक स्वप्नांचा चुराडा होताना मुंबईच्या मायानगरीनं आपल्या डोळ्यांनी पाहिला. घर, काम आणि आयुष्याची स्वप्न नसलेले डोळे घेऊन गिरणी कामगार मुंबईच्या रस्त्यांवर आले…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.