उर्फीची चर्चा आत्ता होतीये, पण त्यादिवशी जुहू बीचवर ‘प्रोतिमा’ नग्नावस्थेत धावलेली..
राज्यात कधीही एका व्यक्तीची चर्चा होते, ती म्हणजे उर्फी जावेद. तिचे कपडे, फोटोशूट, श्लील-अश्लील आणि राजकीय वाद हे सगळं फॉर्ममध्ये असतं. पण या सगळ्या राड्यात आम्ही तुम्हाला एक नवा शब्द शिकवतो…
शब्द आहे स्ट्रीकिंग (Streaking).
स्ट्रीकिंग म्हणजे सार्वजनिक ठिकाणी एखादा डेअर किंवा जाहिरात म्हणून सगळ्या लोकांसमोर नग्न होऊन धाव घेणे. काय?
थांबा , लगेच गुगल वर streaking म्हणून सर्च मारायला जाऊ नका. आम्ही त्यापेक्षा भारी किस्सा तुम्हाला इथे सांगणार आहे.
भारताच्या इतिहासातला पहिला स्ट्रीकर कोण माहित आहे का? लगेच कोणी तरी खोडगुणी कुंभमेळ्यातल्या नागा साधूबद्दल सांगतील तर ते सोडून पहिला स्ट्रीकर कोण?
सालं होत एकोणीसशे चौऱ्याहत्तर.
तेव्हा मुंबईमध्ये ब्लिट्झ नावाचं एक इंग्लिश साप्ताहिक प्रसिद्ध होत. रूसी करंजिया हे त्याचे मालक संपादक सर्व काही होते. ‘ब्लिट्झ’ हे शोधपत्रकारितेमधलं मानदंड मानलं गेलं होत.
एक दिवस रूसी करंजीया यांना वाटलं की वाचकांना आपण खूपच गंभीर विषय देतोय. त्यांना काही तरी चटकमटक सुद्धा वाचायला दिले पाहिजे. यासाठी “सिनेब्लिट्झ” या सिनेमाचे गॉसिप पुरवणाऱ्या मासिकाची सुरवात करायचं त्यांनी ठरवलं.
सिनेब्लिट्झची जबाबदारी त्यांनी आपली लाडकी मुलगी रिटा मेहता कडे दिली. रिटा आधीपासून बोल्ड होती. तिला प्लेबॉयच्या धरतीवर सिनेब्लिट्झ चं रूपड ठेवायचं होत. रूसी करंजीया यांनी पोरीला तिच्या मासिकात कोणतीही ढवळाढवळ करणार नाही याची हमी दिली.
रिटाला सुरवातच धमाकेदार करायची होती. पहिल्या अंकासाठी तिने खूप विचार केला. अखेर तिला एक आयडिया सुचली.
प्रोतिमा बेदी म्हणून एक मॉडेल त्या काळात फेमस होती. अभिनेता कबीर बेदीची पत्नी आणि पूजा बेदीची आई. तर या प्रोतिमा बेदीला तिने माझ्या मॅगझिन साठी स्ट्रीकिंग करशील का? असे विचारले.
प्रोतिमाने सहजच “का नाही?” असे उत्तर दिले.
पडद्यावर किस म्हणून दोन फुले एकत्र आलेली दाखवणाऱ्या काळात प्रोतिमा बेदी सार्वजनिक ठिकाणी नग्न पळायला तयार झाली होती. रिटासाठी हा आनंदाचा धक्का होता. प्रोतिमा तिच्या बिनधास्तपणासाठी प्रसिद्ध होती पण ती एवढ्या सहजपणे तयार होईल असं रीटाच्या स्वप्नात पण नव्हत.
एके दिवशी भल्या पहाटे सिनेब्लिट्झची टीम आणि प्रोतिमा बेदी जुहू बीच वर आले. रिटासोबत त्यांचा फोटोग्राफर तय्यब बादशाह सुद्धा होता. शुटींगची सगळी तयारी झाली. कसलं शुटिंग चाललय हे पाहायला काही बघे जमले होते. प्रोतिमाने आपले कपडे उतरवले आणि ती बीचवर धावायला लागली.
सूर्य उगवत होता आणि खजुराहोच्या नग्नशिल्पाप्रमाणे कमनीय असलेली प्रोतिमा लाटांना तुडवत धावत होती.
त्यादिवशी जुहू बीचवर मॉर्निंग वाॅकला आलेल्यानां आपण स्वप्नात आहे की कुठे हे कळेना झाले होते. हुल्लडबाज गोळा व्हायच्या आत फोटो काढून सिनेब्लिट्झची टीम जुहू बीचवरून सटकली. तिथून फ्लोरा फाउंटनवर ते गेले. तिथेही सेम फोटोशूट करण्यात आलं.
त्यादिवशी मुंबईमध्ये जुहूबीचवर जलपरी आल्याची अफवा पसरली होती.
अनेकांनी ही जलपरी डोळ्याने पाहिल्याचे छातीठोकपणे सांगितले. अजूनही कोणाला नेमके हे काय घडले होते याची कल्पना नव्हती.
डिसेंबर १९७४ ला सिनेब्लिट्झचा पहिला अंक प्रकाशित झाला. कव्हरवर सेक्सबॉम्ब झीनत अमानचा बोल्ड फोटो होता. झीनतचा फोटो बघून लोकांनी मासिक लगेच खरेदी केलं. पण खरा बॉम्ब मासिक उघडल्यावर पडला. आत मध्ये प्रोतिमा बेदीचा जुहू बीचवरचा स्ट्रीकिंगचा सुंदर नग्न फोटो होता. हा फोटो बघून अनेकांच्या शिट्ट्या उडाल्या.
सिनेब्लिट्झचा पहिला अंक हातोहात खपला. भारतात न भूतो न भविष्यती असा कधीच न झालेला मेनस्ट्रीम मासिकाचा लॉन्च रिटाने केला.
दोन मुलांची आई असणाऱ्या प्रोतिमा बेदीवर या फोटोमुळे भरपूर टिका झाली. प्रोतिमाने या टीकेला किंमत दिली नाही. बंधनमुक्त विचारानी जगणाऱ्या नव्या पिढीची ती प्रतिनिधी होती. अनेक चित्रपट, जाहिराती याच्या ऑफरचा भडीमार देखील तिच्यावर झाला.
पण या घटनेनंतर काही महिन्यातच एक घटना घडली.
प्रोतिमा मुंबईच्या भुलाभाई मेमोरियलमध्ये एका कार्यक्रमाला गेली होती. तिथे तिने दोन मुलींना ओडीशी नृत्य करताना पहिले. तिला या नृत्याने वेगळ्याच उर्जेची जाणीव झाली. तिथून प्रोतिमाच आयुष्यच बदलून गेलं. ओडीशी नृत्य हेच तीच पॅशन बनलं. वयाच्या २६ व्या वर्षी तिने केलुचरण महाराजांकडे ओडीशी नृत्याचे धडे घेण्यास सुरवात केली.
दिवसातले चौदा चौदा तास मेहनत करून तीने ओडीशी नृत्यावर प्राविण्य मिळवले. फक्त इतकेच नव्हे तर प्रोतिमा गौरी या नावाने ती नृत्यसाध्वी बनली. काही महिन्यापूर्वी आपल्या बोल्ड फोटोने खळबळ उडवून देणारी प्रोतिमा आता गौरी अम्मा बनून फक्त नृत्यसाधनेमध्येच रममाण झाली होती. तिच्यानंतर तिचा बोल्डपणाचा वारसा तिची लेक पूजाने पुढे नेला.
हे ही वाच भिडू.
- भारताची पहिली सेक्सबॉम्ब झीनत आणि तिची ती रात्र..!
- शांतम् पापम् म्हणायला लावणारी ती जाहिरात होती तरी कशाची ?
- बरं झालं दूसरं महायुद्ध झालं, त्यामुळेच तर बिकनीचा शोध लागला..
- ऑडिशन वेळी हिरोईनचे कपडे उतरवणारा तो होता तरी कोण ?