जडेजा १७५ रन्सवर असताना डाव घोषित झाला आणि नॉटआऊट १९४ रन्सवाला सचिन आठवला…
तुम्हाला म्हणून खरं सांगतो भिडू लोक, कितीही मन लावून काम करायचं ठरवलं तरी ज्या दिवशी भारताची टेस्ट मॅच असते, तेव्हा हजार टक्के लक्ष विचलित होतं. मेंदूला एकाचवेळी दोन शिफ्टमध्ये काम करावं लागतं. सध्या पण तसंच सुरुये, एकतर कोहलीची शंभरावी टेस्ट पण नेमकं भावाला शतक करण्यात अपयश आलं. अश्विन अण्णा चांगला खेळत होता, पण त्याची गाडीही शतकापर्यंत पोहोचू शकली नाही. सगळी कसर भरुन काढली ती रविंद्र जडेजानं. ऑलराऊंडर जड्डूनं आपल्या बॅटचा दांडपट्टा असा काही फिरवला… की लंकन प्लेअर्स पार बेक्कार टेन्शनमध्ये होते.
काम करता करता स्कोअर बघणं सुरू होतं, जडेजा जसा १७० च्या पलीकडे गेला तसे डबल सेंच्युरीचे होप्स वाढले. नाय म्हणलं तरी लय दिवस झाले, भारतीय प्लेअरची डबल सेंच्युरी पाहिली नव्हती, मनाशी पक्कं ठरवलं १९० झाले की कामाला जरा ब्रेक मारायचा आणि पद्धतशीर मॅच बघायची. पण ठरवलेल्या सगळ्याच गोष्टी होतात असं नाही… स्कोअर बघितला तर जड्डू नॉटआऊट १७५ रन्सवर असतानाच भारतानं डाव घोषित केला.
मूड पार आंबट झाला… करू द्यायचे होते की राव दोनशे असं लय मनापासून वाटलं. मूड फ्रेश करायला जरा सोशल मीडिया बघावं म्हणलं, तर तिकडं लोकं सचिन आणि द्रविडचे फोटो शेअर करत होती. सचिन याच्यात कसा आला असा प्रश्न फक्त दोन मिनिटंच पडला, कारण उत्तर सापडायला वेळ लागला नाही.
आज कोच असलेल्या द्रविडनं, एकदा कॅप्टन असताना सचिन आणि डबल सेंच्युरी यांच्यांत फक्त ६ रन्सचं अंतर असताना डाव घोषित केला होता. मग म्हणलं जसं आपल्याला प्रश्न पडला होता, तसा भिडू लोकांना पडला तर उत्तर मिळालं पाहिजे की.
तर भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर होता. टेस्ट सिरीजला सुरुवात झाली होती. भारताला अजूनही पाकिस्तानच्या भूमीवर टेस्ट मॅच जिंकण्याची प्रतीक्षा होती. ती संधी चालून आली मुलतानमध्ये.
मुलतानची ही टेस्ट खऱ्या अर्थानं ऐतिहासिक होती, याचं कारण होतं वीरेंद्र सेहवाग. पाकिस्तानची हवा आपल्यापेक्षा जास्त दमट, पिच असं की बॉल कधी उसळेल आणि कधी खाली राहील याचा अंदाज लावता येणार नाही. पण सेहवाग भाऊ त्यादिवशी वाघ बनून पाकिस्तानवर तुटून पडले.
आकाश चोप्रा आणि सेहवाग बॅटिंगला उतरले बॉल अगदी मस्त बॅटवर येत होता, कारण आकाश चोप्रानंही ४२ रन्स मारुन घेतले. गांगुली पाठीच्या दुखापतीमुळं बाहेर होता, कॅप्टन असणाऱ्या द्रविडच्या बॅटमधून फक्त ६ रन्स आले. मग मैदानावर एक बाप जोडी जमली. सेहवाग आणि सचिन.
सेहवागनं पाकिस्तानी बॉलर्सचा पार किस पाडत, रन्सचा पाऊस पाडला. भावानं भारताकडून पहिला त्रिशतकवीर होण्याचा मान मिळवला. भारतात दिवाळी साजरी झाली, पण एकाच दिवशी दोन दिवाळ्या साजऱ्या करायला कुणाला नाही आवडणार? भारतीय चाहत्यांना ती संधी मिळाली सचिन तेंडुलकरमुळं. सचिन पण थाटात खेळत होता, त्यानं खणखणीत बॅटिंग करत १९० ची मॅजिक फिगर ओलांडली. मॅच टीव्हीवर बघणाऱ्यांना एक गोष्ट लक्षात येत होती, की बारावा खेळाडू असलेला रमेश पोवार सारखीच मैदानावर धावपळ करतोय.
दिवसातल्या शेवटच्या काही ओव्हर्स बाकी होत्या. टीम मिटिंगमध्ये एक गोष्ट ठरलेली की, पाकिस्तानला शेवटच्या १५ ओव्हर्स खेळू द्यायच्या, तोवर सचिनचे दोनशे पूर्ण होतील. रमेश पोवार सचिनला येऊन मेसेज देत होता, ‘पाजी थोडा स्पीड वाढवा.’ सतरा ओव्हर्स बाकी होत्या, युवराज स्ट्राईकला होता. पहिले चार बॉल युवीनं खेळून काढले आणि पाचव्या बॉलवर तो आऊट झाला, सचिनच्या डोक्यात होतं की आपल्यासाठी अजून एक ओव्हर आहे आणि सहा बॉल्समध्ये सहा रन्स तर आपण करुच शकू.
पण तसं झालं नाही, पार्थिव पटेल बॅटिंगला येण्याआधीच द्रविडनं डाव घोषित केला. सचिन १९४ वर नॉटआऊट राहिला… द्विशतकाचा गोल्डन चान्स असताना…
एवढा भारी चान्स हुकला म्हणून सचिन लय डेंजर चिडला. भाऊ ड्रेसिंग रुममध्ये गेल्यावर हेडफोन घालून शांत बसला. कोच जॉन राईट त्याच्याकडे आला, म्हणला ‘सॉरी मित्रा पण तो माझा कॉल नव्हता.’ गांगुली आणि टीम मॅनेजर रत्नाकर शेट्टी यांनीही सेम गोष्ट सांगितली, ‘सॉरी मित्रा पण तो माझा कॉल नव्हता.’
इकडं भारतात मात्र राडा सुरू झाला, लोकं शांत, संयमी राहुल द्रविडला शिव्या घालू लागले. त्याच्यात आणि सचिनमध्ये वाद आहेत, तो सचिनवर जळतो, त्यानं मुद्दाम शाळा केली असं सर्रास बोललं जाऊ लागलं. सोशल मीडिया असतं, तर द्रविड विरोधात हॅशटॅग मोहीमही चालली असती.
तिकडं मैदानात द्रविड सचिनला भेटला, तेव्हा सचिननं सांगितलं की, ‘मला राग तर प्रचंड आलाय. कारण आता डबल सेंच्युरी करायला मला पुन्हा शुन्यापासून सुरुवात करावी लागेल.एक ओव्हर बाकी असतानाही तू असा कॉल का घेतलास?’
द्रविडनं तेव्हा त्याला कारण सांगितलं, ‘आपण पाकिस्तानला थोडा वेळ खेळायला उतरवलं, मला आशा होती की आपल्याला झटपट विकेट्स मिळतील. मला पाकिस्तानला हे दाखवून द्यायचं होतं, की आम्ही इथं जिंकायला आलोय.आमच्यासाठी फक्त जिंकणं मॅटर करतं, वैयक्तिक रेकॉर्ड्स नाही.’ सचिनचा राग काय शांत झाला नाही, पण त्यानं थोडा वेळ मागितला.
भारतानं ती मॅच जिंकली, मीडियामध्ये लोकांमध्ये चर्चांची गुऱ्हाळं तेव्हाही रंगली आणि आत्ताही रंगतायत… पण सचिन आणि द्रविडची दोस्ती त्या सहा रनांमुळं हुकलेल्या डबल सेंच्युरीमुळं तुटली नाही ही लय भारी गोष्ट आहे, हे नक्की.
हे ही वाच भिडू:
- शांत संयमी राहुल द्रविड त्या दिवशी खरोखर भडकला होता..
- वडील हॉस्पिटलमध्ये होते आणि तिकडं राहुल द्रविडनं ॲलन डोनाल्डचा माज मोडला…
- सचिनच्या द्विशतकाला डाग लावण्यासाठी, डेल स्टेननं रडीचा डाव खेळला होता