२१ ऑक्टोबर २००८ च्या पहाटे राज ठाकरेंना अटक झाली होती तेव्हा काय झालेलं…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची महाराष्ट्र दिनी औरंगाबादला झालेली सभा चांगलीच गाजली. यात त्यांनी आपल्या मशिदीवरचे भोंगे उतरवण्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार तर केलाच पण सोबतच राज्य सरकारला अल्टीमेटमही दिला.

त्यांच्या या भाषणानंतर राज्यातल्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली, मात्र मंगळवारी त्यांच्यावर कारवाई होण्याचे संकेत मिळू लागले. औरंगाबादच्या सभेत राज बोलत असताना मशिदीवरुन अजान वाजली, तेव्हा ठाकरेंनी ‘हा भोंगा आताच्या आता बंद करा. नीट सांगितलेलं कळतच नसेल, तर एकदा काय ते होऊनच जाऊ दे,’ असं वक्तव्य केलं.

मंगळवारी पोलिसांनी मनसेच्या नेत्यांसह अनेक कार्यकर्त्यांना नोटीस पाठवली. औरंगाबादमध्ये राज यांच्यावर गुन्हाही दाखल झाला. त्यामुळं त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वाढली आहे.

त्यातच शिराळा कोर्टानं राज यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलंय, ते २००८ मधल्या एका प्रकरणात. याच २००८ मधल्या प्रकरणात राज ठाकरेंना अटक झालेली. तेही रात्री पावणेतीन वाजता.

हे प्रकरण काय होतं? राज यांच्या अटकेचे महाराष्ट्रात काय पडसाद उमटले होते? आणि त्याचा मनसेला कसा फायदा झाला होता?

हे पाहुयात.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली २००६ मध्ये. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राज यांनी पक्ष स्थापन करताना मराठी भूमीपुत्रांचा अजेंडा घेतला होता. राज्यात मराठी मुलांना नोकरीत डावलणं, मराठी भाषेला डावलणं हे राज यांचे प्रमुख मुद्दे होते.

दुकांनावरच्या पाट्या मराठी असाव्यात यावरुन मनसेनं केलेलं ‘खळ्ळ खट्याक स्टाईल’ आंदोलन देशभरात गाजलं होतं.

या सगळ्या घडामोडी घडत असतानाच, ‘जमलेल्या माझ्या तमाम मराठी बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो’ अशी सभेला सुरुवात करणाऱ्या राज ठाकरेंनी मराठी मुलांच्या नोकऱ्यांचा मुद्दा लाऊन धरत, आपल्या भाषणात तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यावर सडकून टीका केली होती.

अशातच २००८ च्या ऑक्टोबर महिन्यात देशभरात रेल्वे भरतीची चाचणी परीक्षा घेण्यात आली. मुंबई केंद्रावर परीक्षा द्यायला आलेल्या उत्तर भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. त्यातच राज्यातल्या केंद्रांवर मराठी तरुणांना प्रवेश नाकारल्याचा, तिकीट न मिळाल्याचा आरोप मनसेनं केला.

वादाची ठिणगी पडली आणि मनसे कार्यकर्ते थेट परीक्षा केंद्रांमध्येच घुसले. त्यांनी उत्तर भारतीय परीक्षार्थींना मारहाण केली, परीक्षा केंद्रांची तोडफोडही करण्यात आली. हे लोण सगळ्या महाराष्ट्रात पसरलं, वेगवेगळ्या ठिकाणी उत्तर भारतीय लोकांना मारहाण झाली. ठिकठिकाणी बसेसची तोडफोड झाली. 

राज्यातली परिस्थिती चिघळली आणि राज ठाकरेंना अटक करा अशी मागणी जोर धरू लागली.

राज ठाकरे तेव्हा कोकण दौऱ्यावर होते. आपल्या चिपळूण येथे झालेल्या भाषणात ते म्हणाले, ‘”सरकारनं मला खुशाल अटक करू देत. माझ्या अटकेनंतर सारा महाराष्ट्र पेटेल आणि जे काही होईल त्याला सरकार जबाबदार असेल.”   

त्याच रात्री कोर्टानं त्यांच्या विरोधात अटक वॉरंट काढलं. २१ ऑक्टोबरची पहाट. राज रत्नागिरीच्या शासकीय विश्रामगृहात होते. साधारण पावणेतीन वाजता मुंबई पोलिस तिथं पोहोचले आणि राज यांना ताब्यात घेण्यात आलं.

रात्रीची वेळ असली, तरी अटकेची बातमी महाराष्ट्रभर पसरली. मनसे कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी जाळपोळ केली, बसेसची तोडफोड करण्यात आली. राज्यात अघोषित बंद असल्यासारखं वातावरण तयार झालं. मुंबई पोलिसांनी कडक बंदोबस्तात राज यांना वांद्रे कोर्टात हजर केलं. तिथं जामीन मिळाला, पण मुंबई पोलिसांनी दुसऱ्या गुन्ह्यात राज यांना अटक केली आणि राज यांनी एक रात्र मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये घालवली.

प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी, कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांना मारहाण केल्याप्रकरणी, राज्यात झालेल्या तोडफोडीमुळं राज यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. मानपाडा पोलिस स्टेशनबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला होता. राज्यभरात जवळपास २० हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात केला होता.

तरीही बऱ्याच ठिकाणी वाहनांची, दुकानांची तोडफोड झाली, पेटापेटीही झाली. दुसऱ्या दिवशी राज यांना कल्याण कोर्टात हजर करण्यात आलं आणि तिथं १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र लगेचच त्यांना जामीन मिळाला. मात्र राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी

त्यांच्या सुटकेनंतर राज्यातलं वातावरण निवळलं, मनसैनिकांनी राज यांचं अगदी जोरदार स्वागत केलं.

या अटकेचा राज यांना आणि मनसेला चांगलाच फायदा झाला

वाढलेल्या लोकप्रियतेमुळं २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार निवडून आले. शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या मुंबईत मनसेनं घवघवीत यश मिळवलं. मराठी भूमीपुत्रांसाठी केलेलं आंदोलन, राज्यात तापलेलं वातावरण आणि राज यांची अटक ही त्रिसूत्री मनसेला यश देणारी ठरली.

सध्या तापलेला भोंग्यांचा विषय, राज यांची भाषणं आणि आगामी महानगर पालिका निवडणुका यांच्या पार्श्वभूमीवर मनसेला या अटक प्रकरणाचा फायदा होईल का? हे पाहावं लागेल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.