बजेटचं महत्त्व कमी करेल, असा क्रिकेटर तेंडल्यानंतर झाला नाही…
फेसबुकवर बजेट, टीव्हीवर बजेट, पेपरला बजेट, गल्लीत बजेट
ऑफिसला बजेट, कट्ट्यावर बजेट, लोकात बजेट, झोकात बजेट…
फक्त आजचा दिवस नाही, आणखी तीन-चार दिवस तरी बजेट हाच मेन मुद्दा फोकसमध्ये राहत असतोय. चर्चा, राडे, मापं काढणं आणि गणितं जी काही होणार ती बजेटवरुनच होणार हे नक्की. आता उद्या सकाळी आपल्या सगळ्यांच्या घरी पेपर येणार आणि त्याच्या मुख्य हेडिंगवर बजेटची बातमी, अर्थमंत्र्यांचा फोटो किंवा चित्र आणि काहीतरी खरपूस हेडलाईन हेच दिसणार.
इमॅजिन करुन बघा, सकाळ सकाळ पेपर हातात आलाय आणि पहिल्या पानावर बजेटची बातमीच नाहीये. दोन मिनिटं हँग व्हायला होईल खरं. तुम्ही म्हणाल भिडू हे शक्य तरी आहे का? देशाचं बजेट जाहीर झालंय म्हणल्यावर सगळं मार्केट फक्त त्याचंच असणार की. पण दोनदा मात्र बजेटच्या बातम्या दुसऱ्या पानावर ढकलल्या गेल्या होत्या आणि त्याचं कारण होतं…
आपला लाडका तेंडल्या… सचिन तेंडुलकर
तारीख होती, २४ फेब्रुवारी २०१०. दुपारपर्यंत देशात एकच चर्चेचा विषय होता, तो म्हणजे रेल्वे बजेट. तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर केलेल्या या बजेटची सगळ्या देशात हवा होती. कुणाला काय मिळालं, कुणाला काय मिळालं नाही, याच्या बातम्या सुरू होत्या. त्याचवेळी ग्वालियरमध्ये भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका वनडे मॅच सुरू झाली. ओपनिंगला आलेला सचिन तेंडुलकर त्या दिवशी झोकात खेळत होता. ठेवणीतले फटके, आक्रमकता आणि जबरदस्त आत्मविश्वास.. अगदी सचिन स्टाईल बॅटिंग सुरू होती.
त्यानं शतकाचा टप्पा पार केला, मात्र धावांचा जोर काही आटला नाही. मग १५० चा गडही सर झाला, पुढे गडी आणखी जोमात खेळत राहिला. डावाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये त्यानं आतापर्यंत कुणालाच न जमलेल्या विक्रमाला गवसणी घातली आणि आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये डबल सेंच्युरी मारणारा, तो पहिला क्रिकेटर ठरला.
तुला मानला रे तेंडल्या, असं म्हणत सगळ्या देशानं त्याला डोक्यावर घेतलं आणि रेल्वे बजेटची बातमी दुसऱ्या पानावर ढकलत आकाशाकडे बघणारा सचिन तेंडुलकर सगळ्या पहिल्या पानांवर झळकला तेही थाटात…
तारीख चेंज टू, १६ मार्च २०१२. सगळ्या देशासाठी महत्त्वाचा दिवस. कारण त्या दिवशी केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होणार होता आणि एशिया कपमध्ये भारताची मॅच होती बांगलादेश विरुद्ध. गेले कित्येक दिवस हुलकावणी देत असणारं सचिन तेंडुलकरचं शंभरावं आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण होणार का आणि बजेटमध्ये सामान्य माणसाला काय मिळणार, हेच प्रश्न कित्येकांच्या तोंडी होते.
आता बजेटमध्ये काय सगळ्याच गोष्टी मनासारख्या होतात असं नाही. त्यातही झाल्याच तरी काय लगेच संध्याकाळी आयुष्य बदलत नसतंय. दिवसभर सगळे बजेटबाबत प्रश्न विचारत होते, संध्याकाळ मात्र एकाच प्रश्नानं गाजली.. ‘सचिननं किती केले रे?’
नर्व्हस नाईंटीजचा अडथळा आणि शतकाचा दुष्काळ संपवत सचिननं आपलं शंभरावं शतक साजरं केलं. मॅचचा निकाल काय लागतो, हे न बघताच लोकांनी जल्लोष करायला सुरुवात केली. भरदिवसा फटाके फुटले, आतषबाजी झाली… सगळा देश आनंदून गेला.
साहजिकच दुसऱ्या दिवशी मुख्य हेडलाईन बजेटची नव्हती, ती होती..
Thanks A TON Sachin!
देशातल्या एवढ्या मोठ्या आणि महत्त्वाच्या घटनेपेक्षा खेळ मोठा ठरु शकतो, हे क्रिकेटच्या लोकप्रियतेनं दाखवून दिलं. दरवर्षी बजेट सादर होईल, क्रिकेट मॅचेस सुरू असतील, विक्रमही होतील.. पण हेडलाईन बदलू शकेल असा माणूस फक्त सचिनच होता… आणि राहील.
हे ही वाच भिडू:
- १७ वर्षांनंतर स्टीव्ह बकनरने चुकीच्या निर्णयाबद्दल सचिन तेंडुलकरची माफी मागितली होती
- भारताकडून खेळण्यापुर्वी सचिन तेंडुलकर पाकिस्तानकडून खेळला होता.
- दालमियांनी चक्क रिटायर झालेल्या सचिनला विचारलेलं, तू कोणत्या क्लबकडून खेळतोस?