देशातील अनेक राज्यांत शाळा सुरु झाल्या, पण महाराष्ट्रात कधी सुरु होणार?

महाराष्ट्रातील शाळा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय दोन दिवसात घेतला जाण्याची शक्यता शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना वर्तवली. तसेच शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये ऑफलाईन वर्ग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी राज्य सरकार सध्याच्या कोविड १९ परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं.

खरं तर राज्यात शाळा ऑफलाईन सुरु करण्याची मागणी वाढली होती. याला पार्श्वभूमी होती इतर राज्यातल्या शाळा सुरु होण्याची.

अनेक राज्यांमधील शाळा पुन्हा सुरू झाल्या असल्या तरी, महाराष्ट्र सरकारने अद्याप राज्याच्या शहरी भागातील शाळा पुन्हा उघडण्याचा निर्णय घेतला नव्हता. मग इतर राज्यात कोरोना नाही का? तिसरी लाट लहान मुलांशी संबंधित असताना शाळा ऑफलाईन सुरु करणं कितपत योग्य असे प्रश्न नक्कीच पडतात. तर याचीच उत्तर शोधण्यासाठी बोल भिडूने खालील आढावा घेतला. 

पहिल्यांदा बघूया देशात कुठे कुठे शाळा सुरु झाल्या आहेत. आणि त्या राज्यांची कोरोना परिस्थिती काय आहे. 

करोनाविषयक परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यांमधील शाळा उघडल्या. मात्र करोनाचा संसर्ग वाढण्याचे हे कारण ठरू नये म्हणून करोनाबाबतच्या निर्बंधांचे पालन करण्याची खबरदारी सर्वच राज्यांतील प्रशासनांनी घेतली आहे.

यात एक नंबरवर आहे दिल्ली

देशात दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेसाठी आता तयारी करावी लागत आहे. पण गेल्या काही दिवसात दिल्लीत करोना रुग्णांच्या संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळेच दिल्ली प्रशासनाने शाळा उघडण्यास सुरुवात केली असल्याचं चित्र आहे. याबाबत नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा, महाविद्यालये आणि शिकवणी वर्ग १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होतील असे दिल्ली सरकारने शुक्रवारी जाहीर केले होते.

दिल्ली भागात मुसळधार पाऊस पडत असतानाच, मास्क घातलेली आणि छत्र्या घेतलेली मूल  बुधवारी रस्त्यांवरून जाताना दिसली. हे विद्यार्थी होते नववी ते बारावीचे. दिल्लीतल्या काही शिक्षण संस्थांनी मात्र ‘बघा आणि वाट पाहा’ धोरण स्वीकारले आहे. दिल्लीत शाळांमध्ये प्रत्यक्ष उपस्थितीसाठी कोणतीही सक्ती नसून पालकांची संमती अनिवार्य आहे.

मध्यप्रदेश

मध्यप्रदेश मध्ये कोरोनाची संख्या वाढत असल्याचं चित्र सध्या आहे. मध्ये प्रदेश मध्ये आज २४ तासात ११ नवीन केसेस सापडल्या आहेत. आणि विशेष म्हणजे यात लहान मुलांचा पण समावेश आहे.

तरी ही प्रत्येक वर्गात ५० टक्के उपस्थितीच्या मर्यादेसह मध्य प्रदेशात सहावी ते बारावीचे वर्ग बुधवारी सुरू झाले. मध्य प्रदेश सरकारने यापूर्वी नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के उपस्थितीच्या मर्यादेसह जुलैच्या शेवटच्या आठवड्यात वर्ग सुरू केले होते. मात्र हे वर्ग आठवड्यातील ठरावीक दिवशी होत होते. बुधवारी पहिल्या दिवशी शाळांमध्ये उपस्थिती कमी होती, मात्र जवळजवळ १७ महिन्यांनंतर वर्गात प्रत्यक्ष विद्यार्थी आले.

राजस्थान

राजस्थान मध्ये सरकारी आणि खासगी शाळांमधील नववी ते बारावीचे वर्ग पुन्हा सुरू झाले. करोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गाची प्रकरणे वाढल्यामुळे गेल्या चार महिन्यांहून अधिक काळ या शाळा बंद होत्या. शिक्षण विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, वर्गात एकावेळी फक्त ५० टक्के क्षमतेला परवानगी असून, करोनाविषयक नियमांचे कठोर पालन केले जाणार आहे.

तमिळनाडू

तामिळनाडूत करोनाविषयक आदर्श कार्यप्रणालीचे पालन करून नववी ते बारावीचे प्रत्यक्ष वर्ग पुन्हा सुरू झाले.

उत्तरप्रदेश

युपीत करोनाशी संबंधित टाळेबंदीमुळे गेल्या वर्षी २० मार्चपासून बंद करण्यात आलेले प्राथमिक शाळांचे वर्ग बुधवारी पहिल्यांदा उघडले. नववी ते बारावी आणि सहावी ते आठवी यांचे वर्ग अनुक्रमे १६ व २४ ऑगस्टपासून सुरू झाले होते. तेलंगणात ही निवासी सरकारी शैक्षणिक संस्था वगळता इतर शाळांचे वर्ग बुधवारपासून सुरू झाले.

छत्तीसगड 

छत्तीसगमध्ये करोनाविषयक परिस्थिती सुधारल्यामुळे सरकारी व खासगी शाळांमधील सहावी, सातवी, नववी आणि अकरावीचे वर्ग ५० टक्के उपस्थितीसह गुरुवारपासून सुरू करण्याची परवानगी देणारा आदेश राज्य सरकारने बुधवारी जारी केला. पहिली ते पाचवी, आठवी, दहावी आणि बारावीचे वर्ग शाळांनी यापूर्वीच १ ऑगस्टपासून सुरू केले आहेत.

आता प्रश्न उरतो महाराष्ट्राचा

राज्यात करोना संसर्गाच्या प्रमाणात बरीच वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर नववी, दहावी आणि अकरावीचे वर्ग २२ मार्चपासून पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचे निर्देश सरकारने दिले होते. आता परत महाराष्ट्रातील शाळा सुरु करण्याचा निर्णय दोन दिवसात घेतला जाण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाची सर्वाधिक बाधा होईल अशी भीती वर्तवली जात आहे. मुंबईत कोरोना हळूहळू हातापाय पसरत असल्याचं समोर येत आहे. मुंबईतील मानखुर्द येथील चिल्ड्रान होममध्ये १८ मुलं कोविड पॉझिटिव्ह आढळून आली. राज्यात अवघ्या २५ दिवसांत ४५०० पेक्षा जास्त मुलं कोरोनाच्या विळख्यात सापडली आहेत.

मग कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असताना शाळा उघडाव्यात का? 

तर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नवी दिल्लीचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी बुधवारी इंडिया टुडेला दिलेल्या विशेष मुलाखतीत लहान मुलांच्या लसीकरणाबाबत माहिती दिली आहे. ते  म्हंटले, भारतातील सर्व मुलांचे लसीकरण करण्यासाठी नऊ महिन्यांचा कालावधी लागेल. त्यामुळे पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत शाळा बंद ठेवता येणार नाहीत. याव्यतिरिक्त, डॉ गुलेरिया शाळा पुन्हा उघडण्याच्या समर्थनात आहेत कारण मुलांसाठी शारीरिक संवाद महत्त्वपूर्ण आहे.

राज्यात लहान मुलांमध्ये वाढणारा कोरोना, लसीकरणाचा तुटवडा, या सगळ्या मुद्द्यांना लक्षात घेऊन आता महाराष्ट्र सरकार यावर काय निर्णय घेतंय याकडे राज्यातल्या सर्व पालकांचं लक्ष लागलं आहे. 

हे ही वाच भिडू 

 

1 Comment
  1. KALASH BHAGWAT says

    साहेब, इंजिनियरिंग chya मुलांबद्दल पण बोला😢😢 ऑनलाईन मध्ये एकही मशीन न बघता mechanical engineering होतोय आम्ही
    कोणच engg वाल्यांचा मुद्दा घेईना…

Leave A Reply

Your email address will not be published.