एक निवडणुक अशी झाली जिथे शरद पवारांचा पराभव झाला होता !
फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या राजकारणातील शरद पवाराचं राजकिय स्थान सांगण्यासाठी कोणत्याही तज्ञाला बोलवण्याची गरज नाही. शरद पवार हे चोवीस तास राजकारण करणारे नेते. राजकारणाच्या मैदानात कधीही पाठ न टेकवलेले मल्ल. पण तुम्हाला कोणी सांगितलं,
शरद पवारांना देखील निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता तर ? सहसा हे पटणार नाही. किस्सा माहित असणारे नेमकं अस का झालं होतं याचा आजही विचार करत असतील.
हा किस्सा तोच, एक निवडणुक अशी झाली जिथे शरद पवारांचा पराभव झाला होता !
कोलकात्यातील ‘ताज बेंगाल’ हॉटेल. तारिख २९ सप्टेंबर २००४.
निवडणुकीचं मैदान राजकीय नव्हतं, क्रिकेटच्या प्रशासनाचं होतं. अर्थात या ‘पिच’वर किती राजकारण केलं जातं, हा वेगळ्या लेखाचा विषय होऊ शकेल. तो विषय पुन्हा कधीतरी. तर ही निवडणूक होती ‘बीसीसीआय’ अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाची.
ही निवडणूक जशी बीसीसीआयच्या इतिहासातील सर्वात नाट्यमय निवडणूक म्हणून लक्षात ठेवली जाते, तशीच ती पवारांना सार्वजनिक आयुष्यातील पराभव बघायला लावणारी निवडणूक म्हणून देखील लक्षात ठेवली जाते.
राजकीय आखाड्यात ‘तेल लावलेले पैलवान’ असा ज्यांचा उल्लेख केला जातो, त्या शरद पवारांना निवडणुकीत धूळ चारण्याचं काम केलं होतं भारतीय क्रिकेट प्रशासनातील ‘दादा’ समजल्या जाणाऱ्या ‘जगमोहन दालमिया’ नावाच्या माणसाने.
शरद पवारांना पराभूत करण्यासाठी या माणसाने एकट्याने निवडणुकीत ४ वेळा मतदान केलं होतं.
२००४ साली जगमोहन दालमियांची बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून टर्म संपलेली होती. पण बीसीसीआयवरील आपला ‘होल्ड’ ते गमावू इच्छित नव्हते.
त्यासाठी त्यांना अध्यक्षपदावर कुणीतरी आपलाच माणूस हवा होता.
त्यामुळे शरद पवार यांच्या विरोधात बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी आपले एकनिष्ठ हरयाणा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आणि हरयाणाचे माजी मुख्यमंत्री बन्सीलाल यांचे चिरंजीव ‘रणबीर सिंग महेंद्रा’ यांना मैदानात उतरवलं होतं.
२००१ साली जेव्हा दालमिया बीसीसीआयचे अध्यक्ष झाले होते, त्यावेळी त्यांच्या विरोधात पराभूत झालेल्या ए.सी. मुथय्या यांनी मद्रास हायकोर्टात एक याचिका दाखल केली होती. बीसीसीआयच्या निवडणुका बीसीसीआय अध्यक्षांच्या निगराणीखाली न होता, एखाद्या निवृत्त न्यायाधीशाच्या निगराणीखाली व्हाव्यात अशी मागणी त्यांनी केली होती.
न्यायालयाने त्यांची ही मागणी मान्य करताना २००४ सालच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एस.मोहन यांची निवडणुकांचे निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती.
निवडणुकीच्या दिवशी सकाळी मात्र अतिशय नाट्यमयरीत्या जगमोहन दालमिया यांनी आपल्या वकिलांकरवी मद्रास उच्च न्यायालयाकडून आधीच्या निर्णयावर ‘स्टे’ आणला होता. या ‘स्टे’ मुळे निवडणुकीची सर्व सूत्रे आपल्याकडेच राहतील याची व्यवस्थित काळजी दालमिया यांनी घेतली होती.
न्या. मोहन यांनी मात्र जोपर्यंत न्यायालयाच्या आदेशाची प्रत बघत नाही, तोपर्यंत बैठकीचं सभागृह सोडण्यास नकार दिला. या सगळ्या घडामोडीत सकाळी ११ वाजता सुरु झालेल्या बैठकीत सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत देखील कामकाज सुरु झालेलं नव्हतं.
तोपर्यंतच्या घडामोडीत राजस्थान क्रिकेट असोसिएशनकडून किशोर रुंग्टा आणि ललित मोदी या दोघांनीही आपणच मतदानात संघटननेचं प्रतिनिधित्व करणार असल्याचा दावा केला होता. हा मताधिकार कोणाला द्यायचा हे ठरविण्यासाठी दालमियांनी माजी न्या. बी.पी. मुखर्जी यांना पाचारण केलं.
न्या. मुखर्जी यांनी ललित मोदींचा दावा फेटाळून लावत राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे प्रतिनिधी म्हणून किशोर रुंग्टा यांना मतदानाचा अधिकार दिला.
मोदी हे पवारांच्या गटातील तर किशोर रुंग्टा हे दालमियांचे निकटवर्तीय समजले जात असत. अशा पद्धतीने दालमियांनी आपल्या गटातील अजून एक मत वाढवलं होतं.
सायंकाळच्या वेळी जेव्हा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश मिळाला त्यानंतर न्या.एस.मोहन यांना प्रक्रियेतून बाहेर पडावं लागलं आणि कामकाजाला सुरुवात झाली. अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली आणि निकाल लागला.
निकाल होता पवारांच्या बाजूने, १५ विरुध्द १४ असा.
खरं तर या अर्थाने निवडणूक पवारांनी जिंकली होतीच, पण त्यानंतर दालमियांनी खेळाची सूत्र आपल्या हाती घेतली.
सर्वप्रथम त्यांनी बीसीसीआयचे मावळते अध्यक्ष या नात्याने मतदान करून महेंद्रांना १५-१५ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर बरोबरीच्या परिस्थितीत ही कोंडी फोडण्यासाठी बीसीसीआयच्या अध्यक्षांना असलेल्या मतदानाच्या ‘विशेषाधिकाराचा’ वापर करून पवारांचा पराभव निश्चित केला.
विशेष म्हणजे त्यापूर्वी महेंद्रांना मिळालेल्या १४ मतांमध्ये देखील २ मते दालमियांचीच होती. ‘बंगाल क्रिकेट असोसिएशन’ आणि ‘नॅशनल क्रिकेट क्लब’ या दोहोंचेही प्रतिनिधी म्हणून त्यांनी हे मतदान केलं होतं.
अंतिम निकाल होता १६ विरुद्ध १५.
एका मताने शरद पवार यांचा पराभव झाला होता.
हा होता शरद पवारांच्या पराभवाचा किस्सा, मात्र त्यानंतर शरद पवारांनी आपल्या पराभवाची सव्याज परफेड केलीच. नोव्हेंबर २००५ साली झालेल्या निवडणुकीत पवारांनी ‘रणबीर सिंग महेंद्रा’ यांचा २०-११ असा पराभव करत बीसीसीआयचे अध्यक्षपद मिळवले आणि बीसीसीआय आणि एकूणच क्रिकेट व्यवस्थापनावरचं दालमिया यांचं साम्राज्य संपुष्टात आणलं. पुढे शरद पवारांनी २०१० साली आयसीसीचं अध्यक्षपद मिळवलं.
एका पराभवाचा बदला शरद पवारांनी व्याजासहित घेतला.
हे ही वाचा.
- शरद पवारांचा तो निर्णय ज्यामुळेच पिंपरी चिंचवड उद्योगनगरी म्हणून टिकू शकली.
- म्हणून शरद पवार दाढीवाल्यांना उमेदवारी देत नाहीत…
- भाजपचे हे दोन राम विधानसभेतून गेल्यानंतर शरद पवार म्हणाले, आम्ही सुटलो.
- दिलीप कुमार आणि सायराबानोच्या प्रकरणात मध्यस्थी करणारे शरद पवार !