जेंव्हा श्रीराम लागूंना नथुराम गोडसेच्या रोलची ऑफर आली…

”अगर जिंदगी मे बडा बनाना है तो एक बात याद रखो दोस्त ………अपने तकदीर के विधाता खुद बनो!”

विधाता पिक्चरमध्ये हा अजरामर डायलॉग देणारे डॉ. श्रीराम लागू आयुष्यही तसंच जगले. तत्वाशी तडजोड न करता स्वतःला पटेल तेच करायचा हा खाक्या त्यांनी आयुष्यभर ठेवला. त्याचबरोबर स्वतः पुरोगामी असलो तरी कलेवर आपल्या विचारांचे ओझे त्यांनी कधेच टाकले नाही. कला मग ती कोणतीही असू दे ते प्रचाराचे साधन असू शकत नाही त्यामुळे कलेने फक्त सत्याला निर्भीडपणे सामोरे जावे हा दंडक त्यांनी कायम पाळला.

असाच एकप्रसंग घडला होता जेव्हा त्यांना एक नाटकार त्यांना एक रोल ऑफर करण्यासाठी  आला.तो नाटककार लागूंना म्हणाला , “मी एक नाटक लिहितो आहे. तुम्ही नथुराम गोडसेचे काम कराल का असे विचारायला मी आलो आहे.” लागूंनी मग शांतपणे विचारले , 

“नाटक कशाबद्दल आहे?” त्यावर तो नाटककार उत्तरला, “गांधीवधाबद्दल”. 

त्यावर आपला चष्मा थोडा खाली सरकवत त्या नाटककारवार एक कटाक्ष टाकत लागू म्हणले , “म्हणजे गांधी खुनाबद्दला”. यातून जे समजायचे ते तो नाटककार समजला होता. आपली डिक्शनरी लगेच बदलत तो म्हणाला “हो गांधी हत्येबद्दल.” मात्र अजूनही श्रीराम लागू यांनी नाटकाच्या भूमिकेबद्दल कोणताच निर्णय घेतला नव्हता.

त्यांना नाटक नक्की कसं आहे हे जाणून घ्यायचेच होते. लागू पुढे म्हणाले, “असं तुम्ही का विचारता?” तेव्हा तो नाटककार म्हणाला , “नाही, तुम्ही गांधींच्या बाजूचे आहात, तेव्हा तुम्ही गांधींना गोळी घालून मारणाऱ्याचे काम कराल का, अशी शंका होती,म्हणून विचारलो ”

“माझी स्वतः ची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक मतं काय आहेत याचा मी नाटकात करीत असलेल्या भूमिकेशी काही संबंध नाही.

मी ‘रामा’ च्या बाजूचा असलो तरी “रावणाची’ भूमिका, चांगली लिहिलेली असेल तर, अवश्य करेन.

मी ‘सभ्यतेच्या बाजूचा आहे तरी, चांगली लिहिलेली असेल तर, ‘बदमाशाची भूमिका मी आवडीने करेन. तेव्हा प्रश्न, मी कोणाच्या बाजूचा आहे हा नसून भूमिका नाटक-कसे आहे हा आहे नाटकात भूमिका चांगली लिहिलेली असेल तर मी अवश्य करीन आणि नाटक वाईट असेल तर भूमिका केवळ रामाची किंवा शिवाजीची आहे म्हणून मी करणार नाही.” लागूंनी आपली भूमिका स्पष्ट केली.लागूंच्या हा बोलण्यानं हुरूप आलेला तो नाटककार मग चालू झाला. 

नथुरामचे हे नाटक म्हणजे ”वैचारिक संघर्ष ” असल्याचं दावा करून नाटककार स्क्रिप्ट वाचू लागला. 

आता डॉक्टर आपल्याला होकार कळवतीलच अश्याच आवेशात नाटककार लागूंकडे पाहू लागला.

मात्र श्रीराम लागूंनी त्याला सरळ नकार कळवला.

आपल्या या निर्णयावर श्रीराम लागू सांगतात ” वाचल्यावर असं लक्षात आलं क, नाटकात फक्त नथुरामचा एकांगी विचार (अथवा अविचारच ) मांडलेला आहे. ज्या विचाराशी त्याचा संघर्ष आहे असा दावा आहे तो गांधीविचार मुळी ,मांडलेलाच नाही! गांधींचे पात्र इतका थोडा वेळ नाटकात आहे आणि इतके फालतू आहे की इतक्या फालतू  माणसाला मारणारा माणूस मोठा शूरवीर, हुतात्मा कसा काय होऊ शकणार ? नथुराम हा मोठा देशभक्त, शूरवीर हुतात्मा आहे हे सिद्ध करायचे असेल तर गांधी हा माणूस भारताच्या दृष्टीनेच नव्हे तर संबंध जगाच्या दृष्टीने कसा महान आहे हे आधी दाखवयला हवे -म्हणजे मग अशा माणसाला मारणारा हुतात्मा ठरू शकतो. नाहीतर तो एक माथेफिरू खुनी ठरतो ” आणि “नाटक पण खूप अ-कलात्मक होते त्यामुळे मी ते करण्याचा प्रश्नच आला नाही ”

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.