कुठल्या खेळाडूशी नाय, तर गावसकरचं अख्ख्या कोलकात्याशी भांडण झालं होतं…

क्रिकेटमध्ये खेळाडूंची मैत्री जशी चर्चेत असते, तशीच त्यांची असलेली किंवा नसलेली भांडणं. म्हणजे बघा सध्याचा भारतीय संघ हरला की, चर्चा सुरू होतात विराट कोहली आणि रोहित शर्माचं भांडण सुरू आहे. आधीच्या भारतीय संघाबाबत फुकाची चर्चा असायची की, द्रविड आणि सचिन एकमेकांना पाण्यात पाहतात. हेच धोनी आणि युवराजबद्दल आणि हेच सुनील गावसकर आणि कपिल देव बाबतही.

एक क्रिकेट रसिक म्हणून आपण भारतीय लोक खेळाचा एकदम पोटभर आनंद लुटतो. अगदी इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये मॅच सुरू असेल, तरी आपण सकाळ सकाळ उठून टीव्हीसमोर बसतोच. पण नुसत्या खेळाच्या मेजवानीनं आपलं पोट भरत नाही, तोंडी लावायला कॉंट्रोव्हर्सीचं लोणचं आपण चाखतोच. 

रणवीर सिंगचा ८३ पिक्चर जसा मार्केटमध्ये आला तसं आणखी एक चर्चा सुरू झाली ती म्हणजे, कपिल देव आणि गावसकरमध्ये खरंच राडा होता का? आता बघायला गेलं तर त्या लय जुन्या गोष्टी झाल्या आणि एका टीममध्ये असताना कधीतरी भांड्याला भांडं लागणारच की. त्यामुळे तो विषय नंतर कधीतरी चघळू, आता गावसकरच्या खऱ्याखुऱ्या भांडणाचा किस्सा सांगतो, जे भांडण कपिल देवच काय कुठल्याही खेळाडूशी झालं नव्हतं, ते झालं होतं कोलकाता शहराशी आणि तिथल्या क्रिकेट फॅन्सशी.

१९८४-८५ चा हा विषय. इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर होता. भारताच्या संघाचं नेतृत्व होतं सुनील गावसकरकडे. वर्ल्डकप जिंकण्याचा ज्वर आता ओसरला होता. त्यातच मागच्या ३१ कसोटी सामन्यात भारताला विजय मिळवता आला नव्हता. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेची भारतानं विजयी सुरुवात केली. दुसऱ्या सामन्यात भारतानं सपाटून मार खाल्ला. तिसरी कसोटी होती कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर.

या मॅचला सुरुवात झाली, तीच वादानं. आदल्या मॅचमध्ये फिफ्टी मारणाऱ्या कपिल देवला संघाबाहेर बसवण्यात आलं. त्यात अशी चर्चा सुरु झाली की, बेजवाबदार फटका मारण्याची शिक्षा म्हणून निवड समितीनं कपिलला बाहेर बसवलं. कपिल खेळणार नाही, हे समजल्यावर ईडन गार्डन्समधल्या फॅन्सनी दंगा सुरू केला. त्यांनी अशाही घोषणा दिल्या की, ‘नो कपिल, नो टेस्ट.’

ईडनची प्रेक्षकक्षमता जास्त आणि तिथले चाहतेही कट्टर. खचाखच भरलेल्या स्टेडियमनं कपिलच्या बाहेर बसण्याला गावसकरला दोषी धरलं. भारतानं जवळपास तीन दिवस बॅटिंग केली, पदार्पण करणाऱ्या मोहम्मद अझरुद्दीननं आणि धमाकेदार रवी शास्त्रीनं शतकं मारली, पण मॅच काहीशी रटाळ झाली. भारतीय भिडू निवांत खेळत होते.

झालं, कोलकात्याची पब्लिक परत एकदा चिडली. त्यांचं म्हणणं होतं गावसकरनं डाव घोषित करायला उशीर केला. मॅच सुरू असतानाच पब्लिक गावसकरच्या विरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली. गावसकरनं स्वतः पुढं येऊन त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तर काही आगाऊ चाहत्यांनी त्याला फळं फेकून मारली, तरीही गावसकर शांत राहण्याचा प्रयत्न करत होता.

मात्र काही फॅन्सनी कळस गाठला आणि स्टॅन्डमध्ये बसलेल्या गावसकर यांच्या पत्नीला फळं मारायला सुरुवात केली. मग मात्र गावसकर खवळला, त्यानं शपथ घेतली की आयुष्यात पुन्हा कधीच ईडन्सवर खेळणार नाही. १९८६ मध्ये जेव्हा भारताचा संघ ईडन्सवर सामना खेळणार होता, तेव्हा गावसकरनं न खेळण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आपला शब्द त्यानं पाळला.

पुढे जाऊन मात्र हा वाद मिटला. गावसकरचा मुलगा रोहन, बंगालच्या रणजी संघातून खेळला. २०१६ च्या टी२० वर्ल्डकपवेळी बंगाल क्रिकेट असोसिएशननं ईडन्सवरच गावसकरचा सत्कारही केला. मात्र ईडन्समध्ये इतर खेळाडूंची भव्य चित्रं असली, तरी गावसकरचं चित्र नसल्याची चर्चा अधूनमधून रंगतेच.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.