आता पश्चाताप करत असलेल्या अफगाणींनी एकेकाळी तालिबानचं स्वागत केलं होतं…

आज भारतीय फोटो पत्रकार दानिश सिद्दीकी यांची अफगाणिस्तानमध्ये हत्या झाली, त्यानंतर भारतात पुन्हा एकदा तालिबान चर्चेत आलं आहे. सध्या अफगाणिस्तान प्रचंड भीतीच्या छायेत वावरत आहे. अमेरिकन सैन्यानं बहुचर्चित हवाई अड्डा सोडल्यानंतर अवघ्या आठवडा भरातच तालिबानी आक्रमक झाले आहेत.

तिथल्या अश्रफ गनी सरकारसाठी ही प्रचंड चिंतेची बाब आहे. कारण आठवडाभरातच तालिबानने अनेक जिल्हे हस्तगत केले आहेत. जवळपास १०० जिल्ह्यांवर त्यांचे प्रभुत्व आहे आणि इतरही परिसर काबीज करायच्या ते तयारीत आहेत. सोबतच इराण-अफगाणिस्तान बॉर्डरचा पूर्ण परिसर ताब्यात घेतला आहे. सध्या त्यांची राजधानी काबुल शहराकडे वाटचाल सुरु आहे.

त्यामुळे एकूणच संपूर्ण अफगाणिस्तान सध्या प्रचंड तणावात वावरत आहेत. सोबतच कायम एका पश्चातापामध्ये देखील आहेत. कारण एकेकाळी याच अफगाणी लोकांनी तालिबान्यांच स्वागत केलं होतं.

खरंतर तालिबानच्या स्थापनेची बीज १९८० च्या दशकातील अफगाणिस्तानच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये सापडतात. 

अमेरिकेच्या हस्तक्षेपापूर्वी अफगाणिस्तानात जवळजवळ २० वर्षे युद्धाजन्य स्थिती होती. अफगाणिस्तानात संघर्षाची सुरुवात १९७९ मध्ये झाली, जेव्हा सोव्हिएत सैन्याने त्यांच्या साम्यवादी सरकारला पाठिंबा देण्यासाठी अफगाणिस्तानवर आक्रमण केले.

अफगाणिस्तानच्या गृहयुद्धात अफगाण सरकारच्या वतीने सोव्हिएतच सैन्य अफगाण मुजाहिद्दीन विरुद्ध युद्ध लढत होते. या अफगाण मुजाहिद्दीनला अमेरिका, पाकिस्तान, चीन आणि सौदी अरेबिया सारख्या देशांनी पाठिंबा दिला होता. युद्ध सुरु झाल्याच्या काही वर्षांतच सोव्हिएत सैन्याने अफगाणिस्तानाची राजधानी काबुल ताब्यात घेतली.

पण या युद्धात सोव्हिएत सैन्याचे १५००० हून अधिक सैनिक मारले गेले.

पुढे १९८९ मध्ये सोव्हिएत युनियनने आपल्या अंतर्गत कारणांमुळे अफगाणिस्तानातून आपले सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि १५ फेब्रुवारी १९८९ ला सोव्हिएत सैन्याच्या अखेरच्या पथकानेही अफगाणिस्तानमधून माघार घेतली.

अफगाणिस्तानातून सोव्हिएत सैन्याने जशी का माघार घेतली तसा तिथं तालिबानचा उदय झाला.

तालिबान हा एक पश्तो भाषेतला शब्द आहे, ज्याचा अर्थ ‘विद्यार्थी’ आहे. वस्तुतः तालिबानचा उदय उत्तर पाकिस्तानमध्ये १९९० च्या दशकात झाला. सुरुवातीला हे एक राजकीय आंदोलन मानलं गेलं होतं, ज्याचे सदस्य पाकिस्तान आणि अफगानिस्तानच्या मदरस्यांमध्ये शिकणारे विद्यार्थी होते. 

१९८० च्या उत्तरार्धात सोव्हिएत युनियनने अफगाणिस्तान सोडल्यानंतर तिथल्या अनेक गटांत संघर्ष सुरू झाला. त्यातचं अफगानी लोग बुरहानुद्दीन रब्बानी यांच्या सरकारला आणि शासनाला वैतागले होते आणि तिथली सामान्य लोकही मुजाहिद्दीनमुळे खूप त्रासले होते. त्यामुळे अशा काळात जेव्हा तालिबान उदयास आले तेव्हा अफगाण लोकांनी त्याचे स्वागत केले.

सुरुवातीला, तालिबान्यांना  लोकप्रियता मिळाली कारण त्यांनी अफगाणिस्तानातला भ्रष्टाचार रोखला, त्यांच्या नियंत्रणाखालील क्षेत्र सुरक्षित केले जेणेकरुन लोक व्यवसाय करू शकतील. पण लवकरच त्यांनी दक्षिण-पश्चिम अफगाणिस्तानात आपला प्रभाव वाढवला.

सप्टेंबर १९९५ मध्ये तालिबान्यांनी इराणच्या सीमेला लागून असलेला हेरात प्रांत ताब्यात घेतला. हळूहळू तालिबान्यांनी अफगाणिस्तानात आपले वर्चस्व वाढवण्यास सुरुवात केली. १९९६ मध्ये बुरहानुद्दीन रब्बानी यांना सत्तेवरुन काढून अफगाणिस्तानाची राजधानी काबुल ताब्यात घेतली. १९९८ पर्यंत तालिबान्यांचे अफगाणिस्तानाच्या जवळपास ९० टक्के भागांवर नियंत्रण होते.

याआधी, तालिबान धार्मिक सभा किंवा मदरशापुरते मर्यादित होते. पण आता त्यांचा राजकीय हस्तक्षेप ही वाढू लागला. या तालिबानला सौदी अरेबिया पैशांचा पुरवठा करत होती. सोबतच पाकिस्तान, संयुक्त अरब अमीरातने देखील तालिबानला मान्यता दिली होती. 

त्यामुळे तालिबानने हळू हळू महिलांसह मुलांवर आणि लोकांवर त्यांनी निर्बंध घालणं सुरु केलं. यांच्यात मुलींना शाळेत जाण्यावर बंदी घातली. महिलांना कामावर जायला बंदी घातली. त्यामुळे लवकरच तालिबान मानवाधिकारांच्या उल्लंघनासाठी जगभरात ओळखला जाऊ लागला. 
अमेरिकेसोबतचा संघर्ष 

२००० पर्यंत तालिबान आणि अमेरिका यांचा सरळ संबंध नव्हता, पण ११ सप्टेंबर २००१ मध्ये न्यूयॉर्कमध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला. त्यानंतर जगाचे लक्ष तालिबान्यांकडे गेले. कारण ओसामा बिन लादेन, ज्याला न्यूयॉर्क हल्ल्यांसाठी दोषी ठरवले होते त्याला आश्रय देण्याचा आरोप तालिबानवर लावण्यात आला.

यानंतर ७ ऑक्टोबर २००१ ला अमेरिकेच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानावर आक्रमण करण्यात आले. अशाप्रकारे अफगाण संघर्षात अमेरिकाही सामील झाली आणि त्यांच्या लष्करी सामर्थ्यामुळे अमेरिकेने कमी वेळात अफगाणिस्तानातून तालिबानी कमी केले. पण तालिबान अगदी समर्थपणे अमेरिकेच्या विरोधात उभा होता.

मात्र पुढे अनेक दिवसांपर्यंत दोघांमध्ये कोणताही शांतता करार होऊ शकला नाही. त्यामुळे दोघांमध्ये हिंसक कारवाया सुरूच होत्या. मात्र २०१६ मध्ये तालिबानचं नेतृत्व हिब्तुल्लाह अखुंजादा याच्या हातात आलं आणि तिथपासूनच तालिबान काहीस कमजोर दिसून येऊ लागलं. मात्र दोघांमधील संघर्ष सुरूच होता.

अमेरिकेची घरवापसी 

फेब्रुवारी २०२० मध्ये अमेरिका आणि तालिबान यांच्यात झालेली चर्चा अयशस्वी ठरली. यानंतर तालिबानने पुन्हा एकदा उचल खाल्ली. हल्ले वाढले, सामान्य लोकांचा जीव लावू लागला. सोबतच आता जो बायडन यांनी ११ सप्टेंबर पर्यंत अमेरिकेने सगळे सैन्य परत बोलवण्याची घोषणा केली आहे तेव्हा पासून तालिबानला पुन्हा एकदा नव्यानं ताकद गवसल्यासारख झालं आहे.

अलीकडेच ताजिकस्तानने म्हंटलं आहे की, १ हजार अफगानी सैनिक तालिबानला घाबरून इकडे शरणार्थी म्हणून आले आहेत. त्यामुळेच आता येत्या काळात तालिबान पुन्हा एकदा ताकदवान होताना दिसून येत आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.