नवाब पतौडीच्या चुकीमुळे डाकुंनी “टिम इंडियाचं” अपहरण केलं होतं.

तर झालं असं होत की सत्तरच्या दशकातला काळ होता. तेव्हा टायगर पतौडी म्हणजेच आपल्या लाडक्या तैमुरचे दिवंगत आजोबा नवाब मन्सूर अली खान पतौडी हे भारतीय संघाचे कप्तान होते. त्यांनी एकदा आपल्या गावी एक एक्झिबिशन क्रिकेट मॅच भरवली होती.

भारताच्या टीममध्ये खेळणारे सगळे खेळाडू मैत्रीपूर्ण मॅच खेळायचं आणि कॅप्टनकडून नवाबी पाहुणचारही झोडायचा म्हणून भोपाळला गोळा झाले. तिथे राहण्याखाण्याची बडदास्त करण्यात आली होती. राजवाड्याच्या ग्राउंडवर या खेळाडूना पाहण्यासाठी भरपूर पब्लिक गोळा झाली होती. प्रेक्षकांच्या गजरात सामना चांगला रंगला. सगळे खेळाडू खुश होते.

मॅच संपल्यावर दुसऱ्या दिवशी टायगर सगळ्यांना म्हणाला,

“चला आपण शिकारीला जाऊ.”

पूर्वीच्या काळी राजेमहाराजे शौकसाठी मर्दानी खेळ म्हणून शिकारीला जायचे. शिकारीवर कायद्याची बंधनेही नव्हती. आता स्वतः नवाब टायगर बरोबर शिकारीचा अनुभव मिळणार म्हणून खेळाडू तयार झाले. यात होते दिलीप वेंगसरकर, इरापल्ली प्रसन्ना, गुंडाप्पा विश्वनाथ, भागवत चंद्र्शेखर आणि टीमचे मॅनेजर राजसिंग डुंगरपूर जे स्वतः राजघराण्यातले होते.

पतौडी पॅलेसमधून बंदुका वगैरे घेऊन जय्यत तयारीने टीम इंडियाचे वीर शिकारीला निघाले.

जंगलात काही अंतर गेले असतील नसतील तेव्हढ्यात बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज आले. ही काय भानगड म्हणून सगळे एकमेकांकडे चक्रावून बघू लागले. टायगर पतौडीसुद्धा गोंधळून गेला. काही क्षणातच घोड्यावरून अक्राळविक्राळ दिसणारे डाकू तिथे अवतरले. एवढे दिवस फक्त सिनेमामध्ये पाहिलेले डाकू प्रत्यक्षात बघून सगळ्यांची भंबेरी उडाली.

आपली जरब बसावी म्हणून डाकू हवेत गोळीबार करत होते.

इतक्यात घाबरलेला एकजण तिथून पळण्याचा प्रयत्न करू लागला. डाकूंच्या म्होरक्याने ते पहिले. त्याने रागाच्या भरात आपल्या बंदुकीचा चाप ओढला. पळणारा एका गोळीत गारद झाला.तो दुसरा कोणी नसून जगातला नंबर एकाचा स्पिनर इरापल्ली प्रसन्ना होता. आता मात्र सगळ्यांची फाटली. प्रसन्नाची हालचाल थंडावली होती. तो जिवंत आहे की मेला हे सुद्धा कळायला मार्ग नव्हता.

वेंगसरकर, विश्वनाथ चंद्र्शेखर रडू लागले. त्यांना तिथून नेण्यात आले. डाकुनी सांगितलं त्यांच अपहरण झालं आहे आणि जबर किंमत मिळाल्याशिवाय त्यांना सोडणार नाही. छोट्याशा उंचीच्या गुंडाप्पा विश्वनाथला झाडाला बांधण्यात आले. तो त्यांना रडत रडत मोडक्या हिंदीत आपण कसा देशाचा महत्वाचा खेळाडू आहे हे सांगू लागला.

वेंगसरकर थोडासा चाप्टर होता. त्याने डाकुना सांगितले.

“मै बहोत गरीब आदमी हुं. मै मुंबई मे मोरारजी मिल मी जॉब करता हुं. मुझे वहा सिर्फ तीनसौ रुपये तनखा मिलती है”

असा सगळा गोंधळ सुरु होता. तेवढ्यात टीमचे मॅनेजर राजसिंग डुंगरपूर डाकूंची नजर चुकवून पळाले. वेंगसरकर म्हणाला चंद्रशेखर ला म्हणाला,

“साला खुद को राजपूत बोलता है और देखो कैसे भाग गया.”

वेंगसरकरने हळूच एका डाकुला आपले महागडे घड्याळ देऊन सुटका होते का याचा प्रयत्न केला. पण काही उपयोग झाला नाही. आता उद्याचा दिवस तरी पाहता येईल की नाही याची शाश्वती नव्हती. नवाब पतौडीच्या राजवाड्यातून खंडणीची रक्कम येईल आणि आपली सुटका होईल याच आशेवर सगळे होते.

काही वेळानी मात्र खो खो हसण्याचा आवाज येऊ लागला. राजसिंग डुंगरपूर, टायगर पतौडी हसत हसत तिथे आले. गोळी लागून मेलेला प्रसन्ना सुद्धा त्यांच्यासोबत होता. ते क्रूर डाकू खरं तर नवाबाच्या राजवाड्यातले नोकर होते. टीम इंडियाचे अपहरण झाले नव्हते तर हा त्यांच्या कॅप्टनने केलेला prank होता.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.