कानपुरमध्ये तणाव वाढला होता तेव्हा ५० हिंदूमुळे एका मुस्लीम मुलींच लग्न सुरक्षितपणे पार पडलं. 

कानपुरच्या बाकरगंज परिसरातील ही घटना. २१ डिसेंबर रोजी बाकरगंजच्या जीनतचं प्रतापगडच्या हुसैन फारूकी सोबत लग्न होणार होतं. दोन्हीकडच्या घरांमध्ये खुशीचा माहौल होता. पण देशातलं वातावरण पुर्णपणे बिघडलं होतं. ठिकठिकाणी CAA व NRC विरोधात आंदोलन सुरू होतं. मात्र लवकरच वातावरण शांत होईल आणि लग्न मोठ्या उत्साहात पार पडेल असं दोन्हीकडच्या कुटूंबांना वाटत होतं. 

मात्र वातावरण शांत होण्याची चिन्ह नव्हती. उत्तरप्रदेशात ठिकठिकाणी विरोधात चाललेय्या मोर्चांनी उग्र स्वरुप धारण केलं. पोलीसांना गोळीबार करावा लागला. ठिकठिकाणी जाळपोळ होवू लागली. कानपूरमध्ये असं वातावरण तयार झाल्यानंतर दोन्हीकडच्या कुटूंबांना चिंता वाटू लागली. 

नवरा मुलगा प्रतापगढ वरुन कानपूर येथे लग्नासाठी येणार होता. पण अशा वातावरणात “बारात” घेवून कानपूरमध्ये येणं शक्य नव्हतं. त्यातही लग्न कुठल्या अडचणीशिवाय पार पडेल याची शंका होती. अशा वेळी लग्नाची तारिख पुढं ढकलण्याशिवाय पर्याय नव्हता. 

लग्नाची तारिख पुढे ढकलण्याची सुरवात झाली आणि ही बातमी झिनतची मैत्रीण असणाऱ्या विमल चपाडिया हीला समजली.

विमल ही झिनतची घराशेजारची मैत्रीण. विमलने ही माहिती गल्लीतल्या इतर लोकांना दिली. झिनतचे लग्न वातावरण तंग असल्याने पुढे ढकलण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर झिनतच्या कुटूंबाच्या शेजारी राहणारे शेजारधर्म पाळण्यासाठी पुढे आले. 

जात, धर्म सोडून आपण नवऱ्यामुलाच्या “बारात” ला संपुर्ण सुरक्षा देवू असा शब्द झीनतच्या घरच्यांना देण्यात आला. नवऱ्या मुलाच्या घरी बिंनधास्त कानपूरमध्ये त्याच तारखेस येण्यास सांगण्यात आलं.

२१ डिसेंबर रोजी ठरल्याप्रमाणे प्रतापगढवरून बारात निघाली. कानपूरच्या हद्दी बारात येताच गल्लीतील ५० हून अधिक हिंदू तरुणांनी या बारातला संरक्षण दिलं आणि कानपूरच्या बाकरगंज परिसरात ही बारात आणली. 

जश्ने शादी मोठ्या उत्साहात व कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडली. शादी नंतर त्याचं तरुणांनी सर्व पाहूण्यांना सुरक्षित ठिकाणी सोडलं. 

काही दिवसांनंतर वातावरण शांत होताच झिनत आपल्या माहेरी अर्थात कानपूरला आली. आल्या आल्या ती आपली मैत्रीण विमलला भेटायला गेली. प्रसारमाध्यमांसोबत बोलताना झिनत म्हणाली, 

मला वाटतं होतं आत्ता माझं लग्न होवू शकणार नाही. पण विमल आणि विमलच्या भावांमुळे शेजारधर्म पाळला गेला. त्यांनी मिळून असंभव गोष्ट संभव करून दाखवली. मी आयुष्यभर विमलचे उपकार विसरु शकणार नाही.

 हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.