अमिताभ बच्चनने स्वतःला वाचवण्यासाठी व्ही. पी. सिंगांचं अर्थमंत्रीपद घालवलं होतं

आज व्हि. पी. सिंग यांचा स्मृतिदिन.

विश्वनाथ प्रताप सिंग हे अद्भूत व्यक्तिमत्व असलेले राजकीय नेते होते. पण व्ही. पी. सिंगांची ओळख आहे ती काँग्रेस मध्येच राहून राजीव गांधींवर त्यांनी बोफर्स भ्रष्टाचाराचे आरोप केले होते म्हणून. त्यानंतर राजीव गांधींच्या विरोधात जे लाट आली, राजीव गांधी तगच धरू शकले नाहीत आणि या लाटेत व्ही. पी. सिंग पंतप्रधान झाले.

पण या सर्वांत दुर्लक्षित राहिले ते अमिताभ बच्चन. ज्यांना मदत करणं राजीव गांधींना भोवलं होतं.

या सर्व प्रसंगांचे साक्षीदार असलेले वरिष्ठ पत्रकार व माजी खासदार संतोष भारतीय यांच्या ‘व्ही. पी. सिंह, चंद्रशेखर, सोनिया गांधी और मैं’ या पुस्तकात गेल्या तीन दशकांतील राजकारणातील उलथापालथ आणि त्याचे तरंग यांचा आढावा घेतला आहे. यात हा किस्सा आहे.

त्यावेळी राजीव गांधींच्या मंत्रिमंडळात व्ही. पी. सिंग हे अर्थमंत्री होते. व्ही. पी. सिंगांना अशी माहिती मिळाली होती की पंतप्रधानांच्या जवळचे काही लोक टॅक्स वाचवतायत. पंतप्रधानांच्या जवळच्या या व्यक्तींमध्ये अमिताभ बच्चन आणि धीरूभाई अंबानींचं पण नाव होतं. साहजिकच सिंग या दोघांच्या मागे हात धुऊन लागले.

अमिताभ बच्चन यांचा राजीव गांधी यांच्यावर प्रभाव होता. भारताला भेट देणाऱ्या राष्ट्रप्रमुखांबरोबरच्या मेजवानीसही बच्चन उपस्थित असत. राजीव गांधी त्यांची ओळख करून देताना ‘भारतीय चित्रसृष्टीतील महानायक’ अशी ते करून देत. आणि संतोष भारतीय यांच्या माहितीनुसार, विश्‍वनाथ प्रतापसिंग यांची अर्थमंत्रिपदावरून झालेली उचलबांगडी बच्चन यांच्या सांगण्यावरून झाली होती. त्यांच्याकडे डिफेन्स खातं देण्यात आलं.

पण व्ही. पी. सिंग तिकडे ही शांत बसले नाहीत. गांधींच्या सरकारमध्ये संरक्षणमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडताना भारताच्या शस्त्रास्त्रांच्या खरेदीच्या व्यवहारात फार मोठा भ्रष्टाचार होतो, असं त्यांना आढळून आलं. कंपनीने ६० कोटी रुपयांच्या व्यवहारासाठी भारत आणि संरक्षण विभागाच्या काही नेत्यांना, अधिकाऱ्यांना लाच दिली हे आढळून आल्यावर त्यांनी ते कटू सत्य निर्भयपणे जाहीर केले.

पंतप्रधान राजीव गांधींची या प्रकरणात जबाबदारी आहे, हे विश्वनाथ प्रताप सिंग यांनी सांगितल्यावर देशभरात प्रचंड खळबळ उडाली. राजीव गांधी यांनी विश्वनाथ प्रताप सिंग यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले आणि सिंग यांनी देखील काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला.

या बोफोर्स प्रकरणात अमिताभ व बंधू अजिताभ यांची नावे गोवली गेली. तेव्हा अमिताभ खासदारकीचा राजीनामा द्यायला गेले. पण राजीव गांधी यांनी त्यास नकार दिला. असे केल्यास विनाकारण संशय वाढेल, शिवाय अलाहाबादला पोटनिवडणूक झाल्यास व्ही. पी ती जिंकतील, असे गांधी म्हणाले.

परंतु बच्चन यांनी राजीव गांधी यांचा सल्ला मानला नाही. राजीनामा देण्यापूर्वी एक दिवस बच्चन त्यांच्या आई तेजी बच्चन यांच्यासह राजीव गांधी यांना भेटण्यास गेले. या पुस्तकातील माहितीप्रमाणे तेजी बच्चन यांनी राजीव गांधी यांना सांगितले की,

अमिताभ बच्चन यांना परराष्ट्रमंत्री करा.

राजीव गांधी अक्षरशः अवाक्‌ झाले. हे दोघे तिथून बाहेर पडले. बच्चन यांनी परस्पर खासदारकीचा राजीनामा दिला. या प्रसंगानंतर त्यांचे संबंध खालावत गेले. १९८९ मध्ये राजीव गांधी यांचा पराभव झाला.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.