वसंतदादा पाटील आणि एका स्वातंत्र्यसैनिकाची आत्महत्या !

नुकतीच वसंतदादा पाटील यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली होती. लोकमत या दैनिकाच्या वर्धापनदिनानिमित्त जवाहरलाल दर्डा यांनी त्यांचा नागपूरात सत्कार समारंभ ठेवला होता.

स्वागत,प्रास्ताविक, प्रमुख पाहुण्यांचं भाषण झालं. आता लोकमतसमुहातल्या काही विशेष कामगिरी केलेल्या पत्रकारांचा सत्कार समारभ सुरु झाला. मुंबईच्या मराठी पत्रकार संघाने खाडिलकर पुरस्कार दिलेले महावीर जोंधळे यांचं नाव पुकारण्यात आलं.

महावीर जोंधळे स्टेजवर गेले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. त्यावेळी वडीलकीच्या नात्याने वसंतदादांनी त्यांना जवळ घेऊन विचारलं,

“बाळ, तू कोणत्या विषयावर अग्रलेख लिहिला होता?” 

महावीर जोंधळेनी सांगितलं की स्वातंत्र्यसैनिकाची आत्महत्या !

ते शब्द ऐकल्या ऐकल्या वसंतदादांना धक्काच बसला. आपल्या राज्यात एका स्वातंत्र्यसैनिकाला आत्महत्या करावी लागली हे लाजिरवाणी गोष्ट होती. त्यांनी तत्काळ तो अग्रलेख मागवून घेतला.

उस्मानाबाद या जिल्ह्यातील नळदुर्ग येथील एका खेड्यात अण्णाप्पा पिराप्पा कोरे नावाच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्तमजुरीची शिक्षा भोगलेल्या वयोवृद्ध स्वातंत्र्यसैनिकाला पेन्शन मिळत नाही म्हणून झाडाला गळफास लावून आत्महत्या करावी लागली होती.

एरव्ही लोकल बातम्यांच्या कोपऱ्यात दबून गेली जाणारी बातमी महावीर जोंधळे यांनी अग्रलेख लिहून उजेडात आणली. 

वसंतदादा तो अग्रलेख वाचून प्रचंड खिन्न झाले. लालफितीचा कारभार आणि राजकारण यात आपली व्यवस्था एवढी निर्ढावली की एका स्वातंत्र्यसैनिकाला गळफास लावून आत्महत्या करावी लागली यांचे त्यांना दुःख वाटले.

वसंतदादा स्वतः एक स्वातंत्र्यसैनिक होते, त्यांनी ब्रिटीशांच्या गोळ्या झेलेल्ल्या होत्या मात्र ती गोळी खाताना जेवढी वेदना झाली नसेल ती ही बातमी ऐकून झाली. स्वातंत्र्याचा उषकाल झालाच नव्हता.

दादांनी आपल्या स्वीय सहायकाला बोलवून सूचना दिली. ते मुंबईला परत पोचण्याआधी उस्मानाबादच्या त्या खेड्यात सर्व शासकीय मदत पोचवण्यात आली होती. 

महावीर जोंधळे स्वतःला मिळालेले बक्षिसाचे पैसे घेऊन स्वातंत्र्यसैनिक अण्णाप्पा कोरे यांच्या घरी गेले होते, ते त्यांनी त्यांच्या पत्नी कडे सुपूर्द केले. वसंतदादांनी मदत पाठवून दिलेलं त्यांना समजलं. ते म्हणतात,

“इतक्या कामाच्या धबडग्यात वयाने लहान असलेल्या माझ्यासारख्या मुलाने लिहिलेल्या चार शब्दांची दखल घेऊन दादांनी कोरे कुटुंबाला केलेली मदत मी कधीही विसरू शकत नाही. ढेकरांच्या रुपातील अनेक नेते बघितलेले आहेत. उक्ती आणि कृती यांच्यात अंतर पडू न देणारा हा माणूस मला महत्वाचा वाटतो.”

संदर्भ- लौकिक. लेखक महावीर जोंधळे

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.