रात्री चमकणारे काजवे अचानक कुठं गायब झालेत ?

असं म्हणतात निसर्गाच्या काठीला आवाज नसतो.  काही नैसर्गिक संकटं येतात अन मनुष्य प्राण्याला त्याची जागा दाखवून देतात. तसंच काहीसं एक आवाज न होणारं संकट आपल्यावर आहे ज्याची आठवण किंव्हा जाणीवही कुणाला झाली नसावी….कोणतं ते संकट ? 

ते म्हणजे रात्री चमकणारे काजवे जे गायब झालेत. 

पूर्वी पावसाळा सुरु झाला कि, ठिकठिकाणी आपल्याला काजवे लुकलुकतांना दिसायचे. गावाकडे गेलं कि खासकरून त्या काजव्यांच्या मागे पळायचो, काही काजवे पकडून त्याला काचेच्या बाटलीत भरून अंधाऱ्या खोलीत ठेवून बाटलीतले ते चमकणारे ते काजवे बघत बसायचो..भारी मज्जा यायची.

पण आजकाल हे काजवे नावालाही दिसेनात. विश्वास बसत नसेल तरी कधीतरी रात्रीला फिरायला जा. रस्त्यात, झाडा-झुडुपात  एखादा काजवा चमकून गेला तरी नशीब म्हणा..

पण हे काजवे गेले तरी कुठं ??? 

हे काजवे कसे काय चमकतात ? आणि त्यांचं भविष्य काय ? आणि काजवे गायब झालेत त्यामागची कारणं तरी काय आहेत ?

तर हा काजव्यांचा प्रकार भुंग्यांच्या कुळात मोडतात. तसं जगभरात काजव्यांच्या एकूण २०० प्रजाती आहेत मात्र भारतात त्यातील ९-१० प्रजाती आढळतात. 

पावसाळ्यात यांची वाढ होते कारण काजव्यांमधील मादी ही पावसाळ्यात जवळपास १०० अंडी देत असते. हे नांदे ही मादी झाडाच्या खोडात, पाणथळ जागी किंव्हा पाला-पाचोळ्यात देते. त्यामुळे रात्रीच्या अंधारात ते लुकलुकतात. या अंड्यातून बाहेर यायला २ आठवड्यांचा काळ जातो. आणि हे काजवे जवळपास एक वर्ष जगतात.   

या काजव्यांची शिकार म्हणजे गोगलगाई, शेतीस नुकसानदायक असलेले कीटक, शेतातील छोटे-मोठे किडे. 

त्यांच्या वाढीत हे काजवे आकार वाढत जातो तेंव्हा कात टाकत जातात. ४-५ वेळेस हे किडे कात टाकत असतात. नंतर फुलपाखरासारखं कोश तयार करतात, हा पिरेड साधारण मे-जून महिन्यातला असतो. एक/दोन पाऊस येऊन गेले कि मग मात्र हे काजवे त्या कोषातून बाहेर पडतात.  यानंतर मात्र त्यांचं आयुष्य फक्त १०-१५ दिवसांचंच असतं. हवेत उडत ते इतर कीटक तर खातातच शिवाय स्वतःच्या जातीचेही किडे खाताना आढळून आलेलं आहे.

याच काळात ही प्रजात पुढील पिढी निर्माण करण्यात बिझी होऊन जातात.

मग आता हे काजवे का दिसत नाहीयेत ?

पूर्वीच्या काळात जागोजागी पाणथळ जमिनी जास्त होत्या, मोठं गवताची कुरणे होती. त्यामुळे जमिनीची आद्रता टिकून असायची. जी या काजव्यांसाठी फायदेशीर असायची. 

मात्र हळूहळू या पाणथळ जमिनी कमी होत गेल्या, गवताळ जागा ओसाड होत गेल्या. त्यामुळे निसर्गाचं चक्र देखील बिघडत गेलं आणि आद्रता टिकून राहत नसल्यामुळे परिणामी काजव्यांच्या अंडीसाठी सुरक्षित जागा मिळेनाशी झाली.

याशिवाय काही वैज्ञानिक कारणं म्हणजे, शेती क्षेत्रात यांत्रिकीकरण आले. रासायनिक खतांचा वापर वाढला. कीटकनाशक फवारण्या वाढल्या. त्यामुळे उपदर्वी कीटक या रासायनिक फवारण्यांमुळे नष्ट होऊ लागली. त्याचा परिणाम काजव्यांच्या अन्न-साखळीवर होतो. 

यात भर घातली ती म्हणजे शहरीकारणाने….

होय आजकाल न दिसणारे काजवे त्याला कारणीभूत ठरलेय वाढते शहरीकरण. विशेष म्हणजे या प्रजातीत फक्त नर काजव्यांनाच पंख असतात, मादी चमकते पण एकाच ठिकाणी बसून चमकते. आपण सुरुवातीला जे बोललो कि, पावसाळ्यात जून महिन्यात यांचा विणीचा हंगाम असतो.

हा पातळ, चपटा, राखाडी, तपकिरी रंगाचा काजवा पंख उघडून लुकलुक करत मिलनासाठी मादीला आकर्षित करतात. मिलनानंतर काही दिवसांनी मादी अंधाराच्या ठिकाणी किंव्हा झाडांच्या सालीत अंडी घालते.  मात्र आता रात्रीच्या वेळी लावलेल्या एल.ई.डी. आणि झगमगाटामुळे त्यांना त्यांचा जोडीदार शोधण्यात अडथळे येऊ लागले. त्यामुळे आधीच कमी होत असलेल्या काजव्यांची संख्या कमी होत गेली.

त्यामुळे आता फक्त जे शहरांपासून लांब असणारी जंगलातील ठिकाणं आहेत तिथेच काय नावाला काजवे उरल्याचं दिसून येतं. 

शहरी लोकं काजव्यांचा नजारा बघायला जंगलात गर्दी करतात. तिथे हे काजवे पाहण्यासाठी कॅम्प, काजव्यांचे शो आयोजित केले जातात. रिसॉर्ट, नाईट ट्रेल, बॅटरी इत्यादी गोष्टींमुळे घनदाट जंगलात देखील काजवे कमीच होत चाललेत. 

पूर्वी मोठ्या संख्येने ज्या झाडांवर काजव्यांची संख्या असायची त्याला काजव्यांची झाडे म्हटले जायचे. पण आता ही काजव्यांची झाडेही टिकत नाहीयेत ना काजवे… हा चमत्कारी स्वयंप्रकाशित कीटक आपल्या अस्तित्वासाठीच झुंजताना दिसतोय.  

फक्त काजवेच नाही तर असे बहुसंख्य कीटक मानवाने संपवले आहेत. ज्याचा परिणाम आपल्याला कधी ना कधी भोगावाच लागणार आहे. 

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.