अर्जुन तेंडूलकरवरुन आठवलं, रोहन गावसकरचं नेमकं काय झालं…?

आपल्या पाठीमागं मोठं आडनाव असणं किंवा लय मोठी बॅकिंग असणं नेहमीच फायद्याचंच ठरतं असं नाही. बऱ्याचदा या आडनावाचं प्रेशर इतकं असतं, की लोकं तुमची छोट्यातली छोटी चूकही पार आयुष्यभर लक्षात ठेवतात. तुम्ही काय चांगलं करता, यापेक्षा जास्त लक्ष तुमचं काय चुकतं याकडेच असतं. तुमची कामगिरी तुमच्या आडनावाप्रमाणंच झाली पाहिजे, याचं प्रेशर सगळ्यात जास्त असतं.

जिथं साध्या दुकानदारांच्या मुलांना, तुमच्या आधी गल्ल्यावर बसणारी माणसं भारी होती. हे सांगण्यात येतं, तिथं सेलिब्रेटींचा विषयच नाही.

सगळ्यात फेमस उदाहरण म्हणजे अभिषेक बच्चन. साक्षात शेहनशहा अमिताभ बच्चनचा मुलगा, वडील बॉलिवूडमधलं सगळ्यात मोठं नाव. अभिषेक बच्चन दिसायलाही चांगला, भावाचा अभिनयही चांगला… पण बच्चनच्या लार्जर दॅन लाईफ इमेजपुढं ज्युनिअर बच्चन चाललाच नाही.

क्रिकेटमध्ये हेच उदाहरण मिळतं, सुनील गावसकर आणि रोहन गावसकर या बाप-मुलाच्या जोडीकडून.

सुनील गावसकर, भारताचे माजी कर्णधार. टेस्ट क्रिकेटमध्ये बॅटिंग कशी करायची याचं मूर्तिमंत उदाहरण. दहा हजार रन्सचा माईलस्टोन गाठणारे पहिले फलंदाज, विशेषणं लावावी तितकी कमीच. गावसकरांनी आपल्या सगळ्या कारकीर्दीतून सगळ्या क्रिकेट विश्वावर अमिट ठसा उमटवला होता.

त्यांचा मुलगा अगदी लहानपणापासूनच चर्चेत आला होता, त्यामागचं कारण होतं… त्याचं नाव. सुनील गावसकरांचे सगळ्यात आवडते प्लेअर होते… विंडीजचे महान बॅट्समन रोहन कन्हाय. त्यांनी कन्हाय यांच्या नावावरुन मुलाचं नाव ठेवलं रोहन.

रोहन गावसकर, महान सुनील गावसकर यांचा मुलगा. त्याच्या नावामागं मोठा वारसा होता. साहजिकच तो जपण्याचं प्रेशरही. रोहन राहिला, वाढला आणि क्रिकेट शिकला ते मुंबईतच. पण मुंबईकडून फर्स्टक्लास क्रिकेट खेळण्याची संधी मात्र रोहनला मिळाली नाही. मुंबईच्या संघात इतके भारी बॅट्समन होते की रोहनला आणखी २-३ वर्ष संधी मिळणं कठीण होतं.

तेव्हा रोहनला संधी मिळाली बंगालकडून. तो बंगालकडून खेळला या मागंही एक डिप्लोमसी होती. एका टेस्ट मॅच दरम्यान गावसकरांनी कपिल देवला संघाबाहेर ठेवल्यानं आणि जरा स्लो खेळल्यानं कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर चाहत्यांनी राडा केलेला.

गावसकर यांच्या पत्नीला फळंही फेकून मारली, त्यामुळं खवळलेल्या गावसकरांनी आयुष्यात परत ईडन्सवर खेळणार नाही, असा पण केलेला. नंतर त्यांचा राग निवळला आणि रोहननं बंगालकडून खेळणं ही डिप्लोमसी ठरली.

रोहननं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली. त्याच्यात आणि सिनिअर गावसकरांमध्ये दोन गोष्टी अगदी विरुद्ध होत्या, रोहन लेफ्टी बॅटर होता आणि काहीसा आक्रमकही. त्याच्या फर्स्ट क्लास क्रिकेटमधल्या कामगिरीच्या जोरावर त्याला भारतीय संघाची दारं उघडली… पण वनडे संघाची.

त्याची आक्रमक स्टाईल वनडेमध्ये शोभणारी होती. मिळालेल्या संधीचं सोनं करण्यात मात्र रोहनला अपयश आलं.

त्याला अकरा मॅचेसमध्ये फक्त १५१ रन्स करता आले, ज्यात हायेस्ट स्कोअर होता ५४ रन्स. दुसऱ्या बाजूला संघात गुणी खेळाडू येत राहिले आणि रोहनची संघातली जागा गेली. भारतीय संघाची दारं पुन्हा उघडावीत यासाठी रोहननं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये जोरदार प्रयत्न केले. 

आकडेवारी बघायची झाली, तर रोहननं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ४४.१९ च्या सरासरीनं ६९३८ रन्स चोपले. पण त्याला आपल्या कामगिरीत सातत्य राखता आलं नाही आणि इथंच गोष्टी गंडल्या.

पुढं रोहन बीसीसीआयच्या विरोधात जाऊन आयसीएल खेळला, २००९ मध्ये त्याला कोलकाता नाईट रायडर्सकडून आयपीएल खेळण्याची संधी मिळाली, मात्र तिथंही त्याची बॅट चालली नाही. नाव मोठं असलं, तरी रोहनच्या बॅटमधून रनांची टांकसाळ उघडली गेलीच नाही.

पुढं रोहननं आपल्या वडीलांप्रमाणेच कॉमेंट्री करायला सुरुवात केली. आजही तो कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसतो, त्याची कॉमेंट्री मात्र ऐकायला भारी आहे. त्याच्याकडे सातत्य असतं… तर भारताला आणखी एक गावसकर क्रिकेटचं मैदान गाजवताना दिसला असता हे नक्की.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.