भारतातली पहिली मारुती कार आता कुठे आहे?

मारुती ८००. भारतातली पहिली हॅचबॅक कार. मध्यमवर्गाचं स्वतःच्या कारचं स्वप्न या मारुती मूळ प्रत्यक्षात आलं होतं. दोनचाकीवर बसून जाणारं चौकोनी कुटुंब आपल्या पाहुण्यांच्या घरी ऐटीत मारुती मधून जाऊ लागलं. आजही अनेकांच्या दारात आपण घेतलेली पहिली कार म्हणून मारुती अभिमानाने उभी असते.

सत्तरच्या दशकात भारतामध्ये सामन्यांना परवडेल अशी छोटी पीपल्स कार बनवण्याचे प्रयत्न सुरु होते. ते काही प्रत्यक्षात उतरू शकले नव्हते. संजय गांधीनी मारुती उद्योग स्थापन करून पूर्ण भारतीय बनावटीची छोटी कार बनवली सुद्धा होती, पण सँम्पल कार बनवणे आणि पूर्ण क्षमतेने कारचे प्रोडक्शन सुरु करणे या दोन्ही वेगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळे संजय गांधींची आणि इतर अनेकांची कार रस्त्यावर धावू शकली नाही.

आणीबाणी, जनता सरकार या काळात हा प्रोजेक्ट मागे पडला. अशातच संजय गांधीच अपघाती निधन झालं, आता पूर्ण मारुती कारचा प्रोजेक्ट बासनात बांधला जातोय की काय अशी वेळ आली.

अखेर १९८१ साली मारुती उद्योग लिमिटेड म्हणून कंपनी रजिस्टर झाली. १९८२ साली जपानच्या सुप्रसिद्ध सुझुकी कंपनीशी मारुती कार बनवन्याचा करार करण्यात आला. अतिशय धुमधडाक्यात या गाडीसाठी पायघड्या अंथरण्यात आल्या.असं म्हटल जात की इंदिरा गांधी यांच्यासाठी आपल्या मुलाची आठवण म्हणून हा प्रोजेक्ट खूप जवळचा होता. मारुती कार लॉंच करण्या आधी पेट्रोलवरचे करसुद्धा कमी करण्यात आले होते अशी सुद्धा वदंता होती.

पब्लिक मध्ये तर या मारुतीच्या बुकिंगसाठी मारामारी होईल की काय ही वेळ आली होती. अखेर लकी ड्रॉ काढायचं ठरलं. फक्त काही नशीबवान लोकांना ही नवी नवेली मारुती ८०० विकत घेता येणार होती. लकी ड्रॉ मध्ये सगळ्यात पहिलं नाव आलं दिल्लीच्या सरदार हरपाल सिंग यांच.

१४ डिसेंबर १९८३ साली हरयाणा मधल्या गुडगाव मध्ये एक मोठा फंक्शन आयोजित करण्यात आला होता.

हरपाल सिंग ना खुद्द प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या हस्ते चावी देण्यात आली. तेव्हा तिथे स्टेजवर असलेले इंदिराजींचे जेष्ठ चिरंजीव पुढे आले आणि त्यांनी हरपाल सिंगना जोरात मिठी मारली. राजीव गांधी पूर्वी ज्या इंडियन एअरलाइन्समध्ये पायलट होते तिथेच हरपालसिंग कामाला होते.

हरपालसिंग यांना पहिल्या मारुती कारची किल्ली प्रदान करताना पंतप्रधान इंदिरा गांधी

पहिली पांढरी मारुती शान मध्ये झेंडूच्या हारांनी सजवलेल्या गुडगावच्या कारखान्यातून बाहेर आली आणि ग्रीन पार्क दिल्लीला आपल्या घरी थाटात निघाली. दुसऱ्याच दिवशी हरपालसिंग यांनी आपली पत्नी गुलशनबिर कौर ,मोठी मुलगी गोविंदरपाल कौर तिचा नवरा तेजिंदर आणि धाकटी मुलगी सुनिता या सगळ्यांना घेऊन मीरतला ट्रीप काढली. मीरतच्या रस्त्यावर सगळे अचंबित होऊन या गाडी कडे बघत होते. गाडी कुठेही थांबल्यावर लोक गोळा होऊन बॉनेट, डिक्की उघडून बघत होते. सगळ्यांसाठीच ते एक एक छोटं आश्चर्य होतं.

हरपालसिंग यांनी कधीच आपली गाडी बदलली नाही. ते आयुष्यभर हीच पांढरी मारुती ८०० वापरत राहिले.

हि गाडी त्यांनी ४७,५०० रुपयाना मिळाली होती. त्यांचे दुसरे जावई अमरदीप वालिया सांगतात की गाडी हातात आल्यापासून त्यांना अनेकांनी मोठ्या मोठ्या किंमतीची ऑफर दिली मात्र हरपालसिंगनी कधीही हि गाडी विकण्याचा विचार देखील मनात आणला नाही. त्यांच्यासाठी ही सगळ्यात धाकटी बेबी होती.

२०१० साली त्यांच निधन झालं. त्यापूर्वी २००८ ला मारुती सुझुकीच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात ही गाडी शोकेस करण्यात आली होती. हरपालसिंग यांच्या निधनानंतर दोनच वर्षात त्यांच्या पत्नीचही निधन झालं. भारतातली पहिली मारुती कार पोरकी झाली. पुढे अनेक वर्ष हि मारुती उन वारा पावसात गंज खात ग्रीन पार्क मधल्या हरपालसिंग यांच्या घराबाहेर उभी होती.

हरपालसिंग यांच्या पोरी वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्यामुळे त्यांना या गाडीची देखभाल घेणे शक्य उरले नव्हते. २०१५साली मारुती सुझुकी कंपनीवर ही आयकॉनिक कार मरनोप्राय अवस्थेत पडून राहिल्याबद्दल अनेकानी टीका केली . मल्ल्याळम सुपरस्टार मामुटी याने या कारची जबाबदारी उचलण्याची इच्छा व्यक्त केली होती.

आज हि पहिली मारुती कार कुठे आहे माहित नाही. २०१३ साली शेवटची मारुती ८०० विकली गेली. कित्येक पिढ्याच्या आठवणी या गाडी सोबत जोडल्या गेल्या आहेत. या आठवणी जपून ठेवण्याची जबाबदारी देखील आपलीच आहे नाही का?

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.