रामजन्मभूमीसाठी बॉम्बस्फोटाचा प्लॅन करणारा तो, आज काय करतोय..?

निकाल लागला. प्रशासन सर्व काही शांततेत पार पडाव म्हणून प्रयत्न करत आहे. अशा वेळी आपली एखादी चितावणीखोर भाषा देखील या शांततेचा भंग करू शकते. आपल्या समोरच भविष्य अंधकारमय होवू शकतं. यापुर्वी देखील रामजन्मभूमीसाठी नको त्या गोष्टी करणाऱ्या लोकांच भविष्य असच अंधकारमय झालं आहे.

हेच सांगणारी ही गोष्ट. वाचा आणि शांततेच्या मार्गाचा स्वीकार करा.

असं म्हणतात की ६ डिसेंबर १९९२ हा दिवस भारतीय राजकारणाला बदलवणारा ठरला. कारण या दिवशी बाबरी मशीद पाडण्यात आली. यापुर्वीच्या निवडणुका रोटी, कपडा, मकान, बोफोर्स अशा मुद्द्यावर लढली जायची ती आता मंदिर मशीद या मुद्द्यावर लढली जाऊ लागली. सगळ्याच पक्षांच्या सगळ्याच नेत्यांना भाषणे करणे सोपे झाले.

पण ज्यांनी खरोखर मशीद पाडली त्या कार्यकर्त्यांचे पुढे काय झाले?

त्या काळात लालकृष्ण अडवाणीची रथयात्रा जोरात सुरु होती. देशभर फिरून लालकृष्ण अडवाणी लोकांना मंदिर बनवण्यासाठी जागृत करत होते. लाखो कार्यकर्ते कारसेवक म्हणून त्यांना जोडले जात होते. या कारसेवकांमध्ये होता मथुरेचा सुरेश चंद्र बघेल.

वयाच्या अवघ्या तेवीस वर्षांचा हा तरुण सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साही होता.

“जिस हिंदू का खून ना खौला वो खून नही वो पानी है. जो राम के काम न आया वो बेकार जवानी है”

आठवी पास शिक्षण झालेला सुरेश अशा घोषणांमुळे त्याच्यासोबतच्या कारसेवकांचा तो हिरो बनला. भगवान श्रीरामासाठी काहीही करण्याची त्याची तयारी होती. त्याने समविचारी तरुणांची फौज बनवली. आसपासच्या भागातल्या युवकांना रामजन्मभूमीसाठी कारसेवा करण्यासाठी तयार करण्याचे काम तो करत होता.

एक दिवस त्याने बातमी ऐकली की,

अयोध्येमध्ये कारसेवा करण्यासाठी गेलेल्या काही कार्यकर्त्यावर पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सुरेश पेटून उठला. आता रामाच्या जन्मभूमीवर उभी असलेली विवादास्पद वास्तू पाडण्यासाठी जीव गेला तरी बेहत्तर पण स्वस्थ बसायचे नाही हे त्याच्या मनात ठाम झाले.

आणि तो २८ डायनामाइटच्या कांड्या घेऊन अयोध्येला पोहचला.

एकट्यानेच अख्खी मशीद उडवून लावायची असा त्याचा प्लॅन होता. पण त्यात तो यशस्वी ठरला नाही. जिवंत डायनामाइटसह सुरेशचंद्र बघेल पोलिसांना सापडला. साल होत १९९०.

त्याच्यानंतर बरोबर दोन वर्षांनी बाबरी मशीद पाडली गेली.

सुरेशचंद्र बघेल तेव्हा सर्व वर्तमानपत्रांची हेडलाईनवर होता. त्याचे दोन दोन पानी इंटरव्युव्ह छापण्यात आले. मोठे मोठे नेता त्याला क्रांतिकारकाची उपमा देत होते. काही दिवस फैझाबाद जेल मध्ये ठेवल्यानंतर त्याला लखनौला हलवण्यात आलं. मुलायमसिंग यांच्या सरकारने सुरेशला दहशतवादी घोषित केलं. त्याच्यावर एनएसए, टाडा कलमाखाली खटला चालवला गेला. तेरा महिन्यांनी जमिनाखाली त्याची सुटका झाली पण लगेचच परत त्याला जेल मध्ये टाकण्यात आले.

आज या घटनेला जवळपास २६ वर्षे होत आली आहेत.

अनेक वर्षे जेल मध्ये काढल्यानंतर सुरेशचंद्र बघेल जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांचे घर उरले नव्हते. त्यांची पत्नी मुलांना घेऊन आपल्या माहेरी आग्राला राहायला गेली होती. ती कधीच परत आली नाही. आज ते वृंदावन मधल्या एका गोशाळेत संन्यासी बनून राहतात. आजही पन्नासाव्या वर्षीही त्यांना अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, उमा भारती यांची त्या काळातली भाषणे त्यांना पाठ आहेत.

एकेकाळी हिरो असलेल्या सुरेश चंद्र बघेल यांना ओळख दाखवायला ही आज कोणी नेता तयार नाही.

सुरेशचंद्र बघेल आपल्या एकाकी विपन्नावस्थेबद्दल कोणालाही दोष देत नाहीत. पण त्यांची एकमेव खंत म्हणजे ज्या मंदिरासाठी आपलं घरदार आयुष्य वेचलं ते फक्त राजकारणापुरत उरलंय. आजही रामासाठी कोणी हाक मारली तर लढायला जायची त्यांची तयारी आहे.

 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.