शिवसेनेच्या उमेदवाराचा गेम नक्की कोणत्या अपक्ष आमदारांनी केला ? त्याचं उत्तर म्हणजे…

महाराष्ट्रात तब्बल २४ वर्षांनी राज्यसभेची निवडणूक झाली जी आजवरच्या राजकीय इतिहासात  सगळ्यात जास्त गाजली.

मतदानानंतर रात्रभर चाललेल्या ९ तासाच्या हायव्होल्टेज ड्राम्याच्या टाइमलाईननंतर अखेर निकाल लागला. मतांची आकडेवारी आली. महाविकास आघाडीचे ३ उमेदवार तर भाजपचे ३ उमेदवार विजयी झाले.

यात जी चुरस होती ती सहाव्या जागेची, पुरेस संख्याबळ नसतांनाही दुसऱ्या फेरीत ६ व्या जागेवरच्या लढतीत धनंजय महाडिक यांनी संजय पवार यांना हरवलं. भाजपचं जंगी सेलिब्रेशन चालू झालं मात्र महाविकास आघाडी टेन्शन मध्ये आली.

कारण काय तर निकालाची आकडेवारी पाहता अपक्षांची मतं फुटल्याचं स्पष्ट झालं. 

महाविकास आघाडीने ठरवल्याप्रमाणे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सर्व आमदारांची मते मिळाली. मात्र, अपक्ष आणि लहान पक्षांची मते फुटली. त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ उडाली. इतकंच नाही तर आज संजय राऊतांनी फुटलेल्या आमदारांची नावेच जाहीर केली आहेत.

राऊतांनी घेतलेली नावं म्हणजे, संजय मामा शिंदे, देवेंद्र भुयार, आणि शेकापचे श्यामसुंदर शिंदे आणि बहुजन विकास आघाडी. 

राऊतांनी जरी आरोप केले असले तरी ही फुटलेली मते नेमकी कुणाची? शिवसेनेच्या उमेदवाराचा नक्की कोणत्या आमदारांनी गेम केला ? 

महाविकास आघाडीकडे १६९ आमदार आणि MIM पक्षाचे २ आमदार असे एकूण १७१ आमदार होते, दुसरीकडे भाजपकडे मित्रपक्षांचे मिळून ११३ आमदार होते, त्यामुळे महाविकास आघाडीचे ३ आणि भाजपचे २ असे ५ खासदार निवडून येणार हे फिक्स होत, पण सहावी जागा कोणाची असा प्रश्न आला आणि खरी कसोटी चालु झाली.

आता निकाल लागला तेव्हा जे मतदान समोर आल त्याने सगळ्यांना कळून चुकल की महाविकास आघाडीला दगाफटका झाला कारण, पहिल्या फेरीत संजय राऊत ४१ मतं मिळाली, प्रफुल्ल पटेल यांना ४३ मतं मिळाली, इम्रान प्रतापगढी यांना एकूण ४४ मतं मिळाली ,संजय पवार यांना पहिल्या पसंतीची ३३ मते मिळाली, या पहिल्या फेरीतल्या सर्व मतांची एकूण होते १६१. 

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस-शिवसेना-इतर लहान पक्ष व अपक्ष अशी महाविकास आघाडी समर्थक आमदारांची संख्या आहे १७१.

म्हणजेच महाविकास आघाडीची १० मतं फुटली. दुसरीकडे पहिल्या फेरीत भाजपच्या उमेदवारांपैकी पियुष गोयल यांना ४८ मतं मिळाली, अनिल बोन्डे यांना ४८ मतं मिळाली आणि धनंजय महाडिक यांना २७ मतं मिळाली. 

म्हणजे एकूण भाजपच्या उमेदवारांना १२३ मते मिळाली. अर्थात भाजपच्या उमेदवारांना १० अधिकची मतं मिळाली..

आता या सगळ्या समीकरणात सुरुवातीपासून कुणाकडे किती आमदारांचं समर्थन होत ते पाहूया.

ज्यावेळी २०१९ ची विधानसभा निवडणूक पार पडली त्यावेळी भाजप व मित्रपक्षांच्या मतांची गोळाबेरीज अशी होती की, भाजपचे १०५ आमदार, राष्ट्रीय समाज पक्षाचे १ आमदार, जनसुराज्य शक्ती पक्षाचे १ आमदार आणि ५ अपक्ष आमदार असे मिळून भाजपकडे ११२ आमदार होते, त्यानंतर पंढरपूरच्या पोटनिवडणूकीत भाजपचा आणखी एक आमदार निवडून आला, यामुळे भाजपचे एकूण आमदार झाले ११३…

आता महाविकास आघाडीबाबत बोलूया…

शिवसेनेचे – ५६ , राष्ट्रवादीचे – ५४ , काँग्रेसचे -४४ , बहुजन विकास आघाडीचे -३, समाजवादी पक्षाचे – २, प्रहार – २, शेकापचा – १, स्वाभिमानी पक्षाचे – १ आणि अपक्ष – ८ असे एकूण १७१ आमदार महाविकास आघाडीच्या सोबत सत्तास्थापनेत सहभागी झाले, मात्र काही दिसवांपूर्वी शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झालं त्यामुळे सेनेचा एक आमदार कमी झाला तर राष्ट्रवादीने आपली पंढरपूरची जागा गमावल्याने त्यांचाही एक आमदार कमी झाला.

त्यानंतर  महाविकास आघाडीच्या आमदारांची संख्या झाली १६९..

सत्तास्थापनेत ज्यांनी तटस्थ भूमिका घेतलेली म्हणजेच जे कुणाकडूनच नव्हते त्यात एमआयएमचे – २ आमदार तर कम्युनिस्ट पार्टीचे २ आमदार आणि मनसेचे १ आमदार यांचा समावेश आहे.

जेव्हापासून राज्यसभा निवडणूकीची चर्चा चालु झाली तेव्हापासून आमदार फुटणार, घोडेबाजार होणार अशा बातम्या येत होत्या. सगळ्या पक्षांच्या आमदारांना वेगवेगळ्या हॉटेलात ठेवण्यात आलं.. पक्षांचे वरिष्ठ नेते तर यात जातीने लक्ष घालून होते, तरीही महाविकासआघाडीला दगाफटका झालाच !

निवडणूकीत ९-१० अपक्ष आमदार फुटले अस बोललं जातंय, एकीकडे शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंनी २ रा उमेदवार उभा करून रिस्क घेतली असं सांगितल तर दुसरीकडे निवडणूकीआधी महाविकास आघाडीचे नेते मात्र आमचे सगळे उमेदवार निवडून येणारच असं छातीठोकपणे सांगत होते..

पण ऐनवेळी दगाफटका कुणी केला हे समजून घ्यायला आपल्याला काही आमदारांची वक्तव्य, त्यांचं गेल्या काही दिवसांतल वर्तन हे पाहायला हवं…

बहुजन विकास आघाडी – हितेंद्र ठाकूर गेल्या काही दिवसांत चर्चेत होते. सत्तास्थापनेच्या वेळी महाविकासआघाडीला पाठिंबा दिला असला तरी त्यांनी राज्यसभा निवडणूकीवेळी भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांची भेट घेतली. 

दूसरीकडे हितेंद्र ठाकूरांनीच महाविकास आघाडीवर १०० % खूष नाही म्हणून आम्ही मतदानाबाबत सावध भूमिका घेत आहे. मतदानादिवशीच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करु अस वक्तव्य केलेलं. बहुजन विकास आघाडीने २०१९ च्या विधानसभा निवडणूकीनंतर भाजपला पाठींबा देवू केला होता. मात्र भाजपची सत्ता येत नाही हे स्पष्ट होताच त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला त्यामुळे तळ्यात मळ्यात असणार्या हितेंद्र ठाकूर यांची ३ मतं  भाजपला गेल्याचा आरोप सध्या होतोय..

आता समाजवादी पार्टी – ज्यात अबू आझमी, शेख रईस हे दोन आमदार आहेत. समाजवादी पक्ष हा भाजपविरोधी राहिलेला असला तरी या पक्षाने सत्तेत सहभागी झाल्यापासूनच आघाडीवर उघड उघड नाराजी व्यक्त केलेली आहे. पण निवडणुकीच्या तोंडावर मात्र अबू आझमी यांनी असं विधान केलेलं कि, “आमची नाराजी दूर झालेली आहे, आम्ही आघाडीला मत देणार असून त्यांनी ठरवावे ते कोणाला द्यायचे.” असं म्हणत त्यांनी भूमिका स्पष्ट केली होती.

प्रहार जनशक्ती पक्ष – बोलायचं तर प्रहारचे २ आमदार आहेत एक बच्चू कडू दुसरे राजकुमार पटेल. बच्चू कडू यांच्याकडे राज्यमंत्रीपद आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून नाराज असलेले मंत्री बच्चू कडू यांनी निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी निर्णय घेणार असल्याचं सांगितलं होतं. मतदान करून त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली कि, मत सांगता येत नसतं, पण महाविकास आघाडीचाच विजय होणार आहे असं ते म्हणलेलले त्यामुळे प्रहारची मतं कुणाकडे गेली हा प्रश्नच आहे.

MIM – महाविकास आघाडीसोबत नसलेली MIM भाजपसोबत जाऊ शकत नव्हती मग महाविकासआघाडीचे MIM साठी प्रयत्न चालु होते. MIM दोन आमदारांचा पाठिंबा महाविकास आघाडीला असेल असं इम्तियाज जलील यांनी जाहीर केलेलं मात्र सोबतच शिवसेनेसोबतचे राजकीय आणि वैचारिक मतभेद कायम राहतील असंही ते सांगायला विसरले नाही.

आता अपक्ष आमदारांच्या भूमिकेबद्दल बोलूया, 

रवी राणा – थेट भाजप समर्थक, आमदार महेश बालदी, – भाजप समर्थक, आमदार राजेंद्र राऊत – भाजप समर्थक, आमदार प्रकाश आवाडे- थेट भाजपला सपोर्ट, विनोद अग्रवाल देखील उघड उघड भाजप समर्थक आहेत.

पण आता आघाडीच्या गोटात असलेल्या अपक्षांचं सांगायचं तर, 

आशिष जैस्वाल ज्यांनी शिवसेनेतून बंडखोरी केली आणि २०१९ ची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली जिंकली, त्यांचा महाविकास आघाडीसोबत सलोखा होता पण राज्यसभेच्या तोंडावर आघाडीवर नाराजी व्यक्त केली. असं असलं तरी ते बैठकीला उपस्थित होते.

राजेंद्र भूयार हे देखील बैठकीला उपस्थित होते पण त्यांच मत फुटल्याचा आरोप राऊतांनी केलाय.

नरेंद्र भोंडेकर हे महाविकास आघाडीला समर्थन देतात. बैठकीलाही उपस्थित होते.

किशोर जोरगेवार, गीता जैन, चंद्रकांत पाटील, मंजुळा गावित देखील बैठकीला उपस्थित होत्या या सर्वांनी आघाडीला समर्थन दिलेलं, राजेंद्र यड्रावकर यांचही महाविकास आघाडीला समर्थन होत, संजय मामा शिंदे महाविकास आघाडी समर्थक आहेत मात्र संजय राऊत यांनी थेट संजयमामा शिंदेंचं मत फुटल्याचा आरोप केलाय…

अशाप्रकारे आम्ही फक्त अपक्ष आमदार आणि छोट्या मोठ्या पक्षांच्या आमदारांची भूमिका सांगितली.

बाकी संजय राऊत यांनी तर ६ आमदार फुटल्याचा आरोप केला, ज्यांनी कुणी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची नावे आमच्याकडे आहेत. आम्हाला माहिती आहे कुणी मतदान केलं नाही. त्यांना आम्ही पाहून घेतो असा सूचक इशारा देखील राऊत यांनी दिलाय..

यातले नक्की कोणते अपक्ष आमदार फुटले असतील ? यावर नक्कीच चर्चा करा आणि आम्हाला तुमची मतं शेअर करा.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.