राज ठाकरेंचा ”मनसे फॅक्टर” नेमका कोणाला डॅमेज करु शकतो..?

राज्याच्या राजकारणात गेल्या महिन्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना केंद्रस्थानी होता. नवनीत राणांना झालेली अटक, किरीट सोमय्यांवर झालेला हल्ला, तथाकथित राष्ट्रपती राजवटीची चर्चा अशा गोष्टी चर्चेत होत्या.

मात्र जशी जशी राज ठाकरेंची औरंगाबादची सभा चर्चेत येऊ लागली, तसं या बातम्यांचं मुल्य कमी होत गेलं आणि सभेनंतर सर्वत्र राज दिसू लागले. तेही इतके, की सोमय्या असोत की नवनीत राणा यांचा टिआरपी अचानक घसरला आणि राज ठाकरेंनी सर्व स्पेस काबीज केली.

सुप्रीम कोर्टानं कालच दिलेल्या आदेशामुळं राज्यात महापालिका व नगरपालिकांच्या निवडणूकांचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबई, पुणे, औरंगाबाद या शहरांसह इतर प्रमुख शहरांच्या निवडणूका येत्या दोन-तीन महिन्यांत होतील हे आता स्पष्ट झालेलं आहे. 

अचानक राज ठाकरेंनी व्यापलेली विरोधी पक्षाची स्पेस आणि आगामी निवडणूका या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा मनसे फॅक्टर नक्की कोणाला डॅमेज करणार हे पाहणं गरजेचं आहे.

यासाठी आपण इतिहासावर एक नजर मारायला हवी.

इतिहास काय सांगतो, तर मनसेची स्थापना झाली त्यावेळी राज ठाकरेंना कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप-सेना या चारही पक्षांना सोडून महाराष्ट्रात एक राजकीय स्पेस दिसत होती. भाजप-सेनेच्या कट्टर हिंदूत्वाला सोडून आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या पारंपारिक राजकारणाला छेद देऊन स्थानिक मुद्द्यावर हा स्पेस भरून काढता येऊ शकतो असं त्याचं मत होतं.

त्यामुळेच पक्षाच्या झेंड्यात निळ्या सहीत भगवा रंग आणि पक्षाची भौगोलिक मर्यादा स्पष्ट करणारा नावातला “महाराष्ट्र नवनिर्माण” हा शब्द निवडण्यात आला होता.

हा स्पेस राज ठाकरेंनी मराठी मुलांच्या नोकऱ्यांनी भरून काढला. तरुणांचा मनसेला मोठ्ठा पाठींबा मिळू लागला. आंदोलनं झाली, अटक झाली आणि राज ठाकरेंच्या मनसेनं १३ आमदारांसह महाराष्ट्रातला तो स्पेस काबीज करण्यात बऱ्यापैकी यश मिळवलं.

त्यानंतर २०१४ साली नरेंद्र मोदींच्या गुजरात मॉडेलच्या विकासामुळे डेव्हलपमेंटची, ब्लू प्रिंटची ती स्पेस मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप व्यापणार हे स्पष्ट होऊ लागलं. तेव्हा राज ठाकरेंनी गुजरात दौरा केला आणि २०१४ च्या निवडणूकीत नरेंद्र मोदींच्या भाजपला पाठींबा दिला. 

या भूमिकेमुळे मुंबईसह इतर महानगरामंधून राज ठाकरेंची ब्लू प्रिंट, डेव्हलपमेंट यांना आकर्षित झालेले जे तरुण मतदार होते ते भाजपकडे गेले.  २०१४ ची त्यांची राजकीय भूमिका कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या अडचणीची ठरली तर सेना-भाजपच्या सोयीची ठरली..

२०१९ च्या निवडणूकांमध्ये मात्र राज ठाकरेंनी लाव रे तो व्हिडीओ मार्फत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात रान उठवायला सुरवात केली. राज्यात प्रचंड सभा गाजवण्यात आल्या. यावेळी राज यांची भूमिका कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या सोयीची झाली.

आत्ता मुद्दा आहे तो येणाऱ्या निवडणुकांचा आणि राज ठाकरे यांच्या भूमिकेचा..

राज ठाकरेंनी कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेतलेली आहे. राज यांची स्क्रिप्ट भाजपनं दिली आहे अशी टिका देखील करण्यात येत आहे. पण या सगळ्या राड्यात राज ठाकरेंनी भाजपची आणि विरोक्षी पक्षाची संपुर्ण स्पेस काबीज केली आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप हा सामना पुर्णपणे महाविकास आघाडी विरुद्ध राज ठाकरे असा झाला आहे.

राज नक्की कोणती स्पेस व्यापणार यावरून दोन मतप्रवाह आहेत.

एक मतप्रवाह म्हणतो. राज ठाकरेंची हिंदूत्ववादी भूमिका ही महाविकास आघाडीच्याच फायद्याची ठरणार आहे. हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून दुरावलेला मतदार हा भाजपऐवजी मनसेकडे जाईल. सातत्याने पवार विरोधी भूमिकेमुळे देखील जे लोक भाजपकडे नव्हते पण महाविकास आघाडी विरोधात होते ती गट देखील मनसेला जोडला जाईल.

मनसे जर येत्या महानगरपालिका निवडणूकीत स्वतंत्र लढली तर भाजपला याचा फायदा कमी व तोटाच जास्त होईल. पण मनसे-भाजप एक झाले तर मात्र हे चित्र पुर्णपणे वेगळे असेल. याबद्दल राजकीय विश्लेषक, जेष्ठ पत्रकार यांना काय वाटतं. हे आम्ही विचारलं.

ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांना विचारलं असता ते म्हणाले,

“महानगर पालिका निवडणुकांचा आदेश जरी देण्यात आला असला, तरी निवडणूका होईपर्यंत साधारण सप्टेंबर-ऑक्टोबर उजाडेल. तोपर्यंत हा भोंग्यांचा विषय कितपत चर्चेत असेल हे बघावं लागेल. राज यांच्या भूमिकेचा भाजपपेक्षा शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता जास्त आहे.

राज यांनी गेल्या तीन सभांमध्ये राष्ट्रवादीवर टीका केली आहे. त्यांनी सभेत शिवसेनेवर टीका केली नसली, तरी ते सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्यानं बाळासाहेबांचा उल्लेख करतायत. बाळासाहेबांच्या भोंग्यांविषयीच्या मूळ भूमिकेपासून शिवसेना दूर जातीये असं त्यांचं सातत्यानं सांगणं आहे. 

त्यामुळं शिवसेनेच्या मतपेढीवर हल्ला चढवणं, हाच त्यांचा मूळ उद्देश आहे. मनसेच्या हातात काही मराठी मतंही आहेत, त्यामुळे सेनेला फटका बसून याचा फायदा मनसे आणि भाजपला काही प्रमाणात होऊ शकतो. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माहाविकास आघाडीला तीन पक्षांनी एकत्र लढण्याचा फायदा जास्त होईल. स्थानिक प्रशासनाचं काम, विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका हे मुद्देही आहेत. महाविकास आघाडीला हातात सरकार असल्याचं निश्चितच ॲडव्हांटेज आहे.

मनसेनं मुद्दा लावून धरला असला, तरी मशिदीवरच्या भोंग्यांसोबतच काकड आरतीसाठीचे भोंगेही उतरवले जाऊ शकतात. तसं झालं तर काही हिंदुत्ववादी लोकं खट्टू होऊन, मनसेचं नुकसान होऊ शकतं. त्यांनी टोलविरोधी आंदोलन केलं, टोल बंद झाले पण त्याचा मतपेटीवर फारसा प्रभाव पडला नाही. त्यामुळं मनसेला संघटनात्मक पातळीवर काम करावं लागेल, सातत्य ठेवलं तर विधानसभा निवडणुकांपर्यंत यश मिळू शकेल.”

तर पत्रकार अद्वैत मेहता बोलभिडू सोबत बोलताना म्हणाले की,

“राज यांनी मुद्दा उचलला आणि लगेचच निवडणूका जाहीर झाल्या. जर नजीकच्या काळात निवडणूका झाल्या, तर मुद्दा ताजा, गरम असल्यानं या सगळ्याचा फायदा निश्चितच मनसे आणि भाजपला होईल. त्यामुळं महाविकास आघाडी सरकार कदाचित ‘थंडा करके खाओ’ असं धोरण बाळगेल आणि निवडणूका सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत लांबतील. भोंग्याचा आवाज कमी व्हायची वाट बघेल.

पण या मुद्याचा मोठा फायदा राज ठाकरेंना होईल असं वाटत नाही ,पण थोडाफार नक्की होईल. त्यांना चांगला प्रतिसादही मिळालाय. मात्र त्यांनी सध्या हिंदुत्वाचा मुद्दा घेतलाय पण मराठीचा मुद्दा सोडलाय की अजून ठाम आहेत? हे कळत नाहीये. शिवसेनेप्रमाणंच दोन्ही दगडांवर पाय ठेवलाय का? हे समजायला मार्ग नाही. त्यांनी मराठीच्या मुद्द्यावरची आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. पत्रकार परिषदेत त्यांनी हिंदीमधून बाईटही दिला.

मराठी-अमराठीचा मुद्दा हा मुंबईमध्ये जास्त आहे, तिथं अमराठी लोक जर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतदान करणार असतील, तर फर्स्ट चॉईस भाजपचा उपलब्ध असेल, तर लोक भाजपच निवडतील. जर मनसे-भाजप युती झाली किंवा फ्रेंडली फाईट करुन भाजपनं मनसेसाठी जागा सोडली, तर मनसेला फायदा होईल.

मनसेच्याही अस्तित्वाची पुनर्जीवनाची लढाई आहे. मराठी हिंदू मतं कुठं जाणार हे पहावं लागेल. मात्र राज ही मतं आपल्याकडे खेचू शकतात. ज्याचा तोटा साहजिकच शिवसेनेला होईल. पण युती न होता मनसे भाजपची मतं घेणार का? हे आत्ताच सांगणं कठीण आहे.

भाजपचाही मनसेमुळे शिवसेनेची मराठी हिंदू मतं फुटावी असा होरा असणार. मुंबईत भाजपकडे आश्वासक चेहराही नाही, त्यामुळं भाजपला मनसेची थेट किंवा अप्रत्यक्ष मदत होऊ शकते. भाजप-मनसे युती होणार का हे स्पष्ट झाल्यावर चित्र क्लिअर होईल.

सध्या शिवसेनेकडे मुख्यमंत्री, मुंबई महानगर पालिका, एमएमआरडीए अशी ३ पॉवर हाऊस आहेत. तरीही आगामी निवडणूक ही शिवसेनेसाठी टफ तर आहेच, पण सन्मानाचीही आहे. सेनेचा जीव मुंबई पालिका या पोपटात आहे.

मुंबईत निवडणूक भाजप विरुद्ध सेना अशी आहे, तिथं मनसे-भाजप युती होणार का? हे महत्त्वाचं आहे. तर पुण्यात मनसेचं फारसं अस्तित्व नाही, तिथं सामना भाजप-विरुद्ध राष्ट्रवादी असा आहे. जर निवडणूका लवकर झाल्या, तर या भोंग्यांच्या मुद्द्याचा फायदा मनसेला होऊ शकेल, पण तो जसा आधी १३ आमदार निवडून आणणं, पुण्यात विरोधी बाकांवर बसणं, नाशिकमध्ये सत्ता मिळवणं असा झाला होता, त्या प्रमाणात होईल का हे आत्ताच सांगता येणार नाही.”

बोल भिडूनं ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक जयदेव डोळे यांच्याशी संपर्क साधला ते म्हणाले,

“आजच्या बातम्या पाहिल्या, तर राज यांनी सभा घेऊन आवाहन करूनही औरंगाबादमध्ये काही विशेष झालं असं नाही. लोकांनी महागाई, दैनंदिन आयुष्यातले प्रश्न या सगळ्या गोष्टींमुळं या मुद्द्याकडे दुर्लक्ष केलंलं दिसतंय. 

आगामी निवडणुकांबद्दल बोलायचं झालं, तर राज्यात जेव्हा अशांत किंवा अस्थिर परिस्थिती असते, तेव्हा लोक सध्याच्या सरकारलाच प्राधान्य देतात. कारण समाजमन तसं असतं. 

राज यांच्या भूमिकेचा फारसा फरक पडणार नाही, कारण सेना सरकारमध्ये आल्यावर तोल सांभाळून वागतीये. औरंगाबाद पुरतं बोलायचं झालं, तर इकडची शिवसेना हिंदुत्व बाळगून आहे, त्यामुळं लोक सेनेला डावलतील आणि मनसेकडे जातील असं मला वाटत नाही.”

त्यामुळं आता राज यांचं भोंगा बंद आंदोलन त्यांच्या मतपेटीचा आवाज वाढवणार, की भाजप किंवा महाविकास आघाडीपैकी कोणाच्या मतपेटीचा आवाज कमी करणार, हे येणाऱ्या काळात समजेलच.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.