मनमोहन सिंगांवर टीका करताना नारायण मूर्तिंनी राजकारण्यांना लाजवेल अशी पलटी हाणलीये

नारायण मूर्ती… सिरीयस चेहरा, थोडंच पण नेमकंच बोलणं आणि त्यातही शून्यातून उभारलेलं इन्फोसिसचं  हजारो कोटींचं साम्राज्य. भारतीयांनी देवस्थानी बसवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या त्या सर्व नारायण मूर्तींकडे आहेत. त्यामुळे नारायण मूर्तीदेखील नेहमीच चांगल्या कारणांसाठी चर्चेत आले आणि वाहवा मिळवून गेले. 

मात्र सध्या नारायण मूर्ती चर्चेत आलेत ते त्यांच्या देशाच्या अर्थव्यवस्थेवरील कमेंटमुळे.

मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात देशाचे अर्थव्यस्थेची प्रगती खुंटली अशी टीका नारायण मूर्ती यांनी केली आहे. २४ सप्टेंबरला आयआयएम अहमदाबाच्या मुलांशी बोलताना नारायण मूर्ती म्हणाले”

“मी लंडनमध्ये (2008 आणि 2012 दरम्यान) HSBC च्या बोर्डावर होतो. पहिल्या काही वर्षांत बोर्डाच्या बैठकांमध्येचीनचा दोन-तीन वेळा उल्लेख केला जायचा मात्र तेव्हा भारताचे नाव एकदाच घेतले जायचे. ….

मनमोहन सिंग जे एक विलक्षण व्यक्ती आहेत, ज्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे पण यांच्या सरकारच्या काळात भारताचा विकास  भारत ठप्प झाला.

 त्यांनी निर्णय लवकर घेतले गेले नाहीत, सर्व गोष्टींमध्ये विलंब केला आणि मी जेव्हा HSBC सोडले तोपर्यंतजर चीनचे नाव 30 वेळा नमूद केले असेल तर भारताचे नाव क्वचितच एकदाही नमूद केले गेले असेल”

एक बाजूला मनमोहन सिंग यांच्या अर्थव्यवस्था हाताळण्याच्या धोरणावर टीका करत असताना त्यांनी दुसऱ्या बाजूला मोदी सरकारची स्तुती केली आहे. 

सध्याच्या सरकारची आधीच्या यूपीए सरकारशी तुलना करताना नारायण मूर्ती म्हणतात निर्णय घेण्यास झालेल्या विलंबामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे.

‘मेक इन इंडिया’ आणि ‘स्टार्टअप इंडिया’ आणल्याबद्दल केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचे कौतुक करताना ते म्हणाले, “एक काळ होता जेव्हा इतर देशांतील बहुतेक लोक भारताकडे तुच्छतेने पाहत असत, परंतु आज, आता जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेल्या देशाबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर आदर आहे”

नारायण मूर्ती यांच्या या वक्तव्याची देशभर जोरदार चर्चा झाली. मनमोहन सिंगांवर काँग्रेसच्या विरोधी पक्षांकडून येथेच्छ टीका करण्यात आली. मात्र त्याचवेळी नारायण मूर्ती यांनी काँग्रेस सरकारच्या काळात मनमोहन सिंग यांची केलेली स्तुती समोर आली आहे.

२०१९ मध्ये एका लीडरशिप समेटमध्ये बोलताना नारायण मूर्ती एक किस्सा सांगत होते. 

“आम्हाला टेलिफोन कनेक्शन मिळायला सात वर्षे लागली. त्यावेळी सर्वोच्च प्राधान्य सरकारी अधिकाऱ्यांना, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे प्राधान्य निवृत्त सरकारी अधिकाऱ्यांना होते. मला त्या वेळी दळणवळण मंत्री असलेल्या सीएम स्टीफनची एक गोष्ट आठवते. कोणीतरी त्याच्याकडे गेला आणि त्याला सांगितले की माझा  टेलिफोन काम करत नाहीत. त्यांनी त्यांना सांगितले की त्यांच्या टेबलावर एक टेलिफोन आहे त्यातच त्यांना आनंद झाला पाहिजे कारण मॅडम इंदिरा गांधी यांचा टेलिफोन देखील काम करत नाही!”

त्याचबरोबर कंपनी उभारण्यास परवानगी घेण्यास, कंप्युटर एक्स्पोर्ट करण्यात शेकडो अडचणी असायच्या मात्र आज ती परिस्थिती नाही. भारतात ज्या आर्थिक सुधारणा झाल्या त्यामुळे भारताची आयटी आणि टेलिकॉम क्षेत्रात भरभराट झाली आहे असंही पुढे नारायणमूर्ती म्हणाले.

आणि या सर्व बदलांचे शिल्पकार आहेत पीव्ही नरसिंह राव, डॉ.मनमोहन सिंग, माँटेक सिंग अहलुवालिया आणि पी. चिदंबरम असं त्यावेळी नारायणमूर्ती म्हणाले होते.

२००९ मध्ये आऊटलूक मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुद्धा नारायण मूर्ती यांनी अशीच मनमोहन सिंग यांची स्तुती केली होती. त्यावेळी अनेक तज्ज्ञ मनमोहन सिंग यांच्या सरकारला पॉलिसी पॅरेलियासीस झाल्याची टीका करत होते. यूपीएच्या काळात निर्णय उशिरा असल्याची हि टीका होती.

मात्र त्यावेळी नारायण मूर्ती यांनी मानमहोन सिंग यांचं तोंडभरून कौतुक केलं होतं. 2009 मध्ये जेव्हा मुलाखतीमध्ये त्यांना तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुकीचे महत्त्व विचारले तेव्हा नारायण मूर्ती म्हणाले होते

 “ही निवडणूक खूप महत्वाची आहे कारण ही निवडणूक देशातील नेत्रदीपक आर्थिक विकासाच्या दहा वर्षांच्या कालावधीनंतर होत आहे.”

त्यानंतर त्या मुलाखतीमध्ये नारायण मूर्ती यांनी मनमोहन सिंग यांचं कौतुक करण्याचा सपाटाच लावला. कसे ते त्यांच्या एक एक वाक्यावरून बघू

“पहिल्यांदाच आमचे पंतप्रधान – ज्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे – ते सर्वसमावेशक विकास साधण्याच्या गरजेवर देशाचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्यासाठी ही एक नवीन गोष्ट आहे; या निवडणुकीत ही एक महत्वाची घटना असणार आहे ”

“राजकारण्यांवर टीका करत असताना आपण हे लक्षात ठेवूया की आपण अलीकडच्या वर्षांत दोन विलक्षण सज्जनांना आपले पंतप्रधान म्हणून निवडले आहे . एक म्हणजे वाजपेयी आणि दुसरे मनमोहन सिंग. हे दोन्ही लोक प्रामाणिक, बुद्धिमान, सभ्य लोक म्हणून परिचित आहेत…”

“आज कॉरोपोरेट लीडर्स पंतप्रधानांशी थेट बोलू शकतात. हे आपल्या पंतप्रधानांबद्दल बरंच काही सांगून जातं.”

आज मनमोहन सिंग हे त्यांच्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर देण्याच्या स्तिथीत दिसत नाही मात्र नारायण मूर्ती यांच्या टीकेनंतर सोशल मीडियावर नारायण मूर्तीनी मनमोहन सिंग यांची केलेली प्रशंसा व्हायरल होत आहे आणि त्यामुळे नारायण मूर्ती यांनी मारलेली पलटी जगासमोर आली असल्याचं काँग्रेस समर्थकांकडून सांगितलं जात आहे आणि मनमोहन सिंग यांच काम पुन्हा आदराने पाहिलं जात आहे.

यावेळी अजून एक गोष्ट सत्यात उतरत आहे ते म्हणजे मनमोहन सिंग यांचं एक वक्तव्य ज्यात ते म्हणाले होते

”समकालीन माध्यमांपेक्षा किंवा संसदेतील विरोधी पक्षांपेक्षा इतिहास माझ्यासाठी अधिक दयाळू असेल, असा माझा प्रामाणिक विश्वास आहे.”

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.